किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना नुकताच ‘पद्मविभूषण’ हा बहुमान जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या सृजनशील कार्याचा परिचय करून देत आहेत त्यांचे वरिष्ठ शिष्य व युवा पिढीतील सुप्रसिद्ध गायक डॉ. अतींद्र सरवडीकर...
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील ‘ख्याल’ या घाटात (संगीत प्रकार) राग सादरीकरणाच्या संदर्भात काळानुसार बदलत गेलेल्या विचारांच्या बीजांमधून विविध घराण्यांचे वृक्ष फोफावत राहिले. आज अशी अनेक घराणी प्रचलित आहेत. अशा परिस्थितीत सर्वस्वी निराळ्या व नव्या घराण्याचा उगम शक्य आहे का? असा विचार केला असता, डॉ. प्रभा अत्रे यांचं नाव प्रामुख्याने समोर येतं. ‘घराणी’ म्हणजे वंश परंपरा असं सामान्यपणे समजलं जातं. मात्र, संगीतामध्ये घराणं म्हणजे सम्यक दृष्टिकोन, नजर, सौंदर्यदृष्टी असं मान्य केलं तर, नव्या घराण्यांच्या उगमांच्या अनंत शक्यता दिसतात. त्यामुळेच आज प्रचलित असलेल्या घराण्यांचा अस्तित्वाच्या आणि अवस्थेच्याही पातळ्या आढळतात. स्वर-लयीसारख्या सांगीतिक घटकांचा समन्वय, त्यांचे उपयोजन, प्रतिभावान सृजन, अन्य संगीत शैलींपासून घेतलेली प्रेरणा, त्याचबरोबर अनेक परिस्थितीजन्य घटकांचा परिणाम, यामुळे नवीन घराण्यांच्या शक्यता मान्य कराव्या लागतात. या अर्थाने घराणे मरत नसतेच, पण अनंत शक्यतांनी पुन्हा पुन्हा जन्म घेऊ शकते हे सहजच पटते. डॉ. अशोक रानडे म्हणतात त्याप्रमाणे “घराणे म्हणजे केवळ आवाज लावण्याची पद्धत नव्हे. ठरावीक राग सातत्याने ठरावीक पद्धतीने गाणे, वाजवणे नव्हे. प्रत्येक कलाविष्कारास समग्र कला क्षेत्राचे परिणाम देणे आणि कला क्षेत्राचे असे सम्यक आकलन करणे की, त्यात संगीत क्षेत्रातल्या आवश्यक त्या सर्व घटकांना निश्चित जागा आणि नि:संदिग्धपणे मिळतील त्यास ‘घराणे’ म्हणतात. ‘घराणे’ म्हणजे सम्यक दृष्टिकोन असतो.”
वर्तमानकाळात ज्यांच्या संगीत विचारांमधून अथवा प्रत्यक्ष कला प्रस्तुतीमधून असा संगीत विषयक सम्यक दृष्टिकोन आढळतो, प्रत्येक सांगीतिक प्रकारासाठी स्वतःची स्वतंत्र व तार्किक भूमिका आढळते, अशा कलाकार म्हणजे डॉ. प्रभा अत्रे. ज्या कलाकारांनी नवा सांगीतिक दृष्टिकोन पुढे ठेवला, जाणकार आणि सामान्य रसिकांनी त्याला मान्यता दिली, त्या दृष्टिकोनाला त्या कलाकाराचे नाव न देता, तो कलाकार ज्या गावचा रहिवासी होता, त्या गावाचं नाव दिलं गेलं. जसं ‘ग्वालियर’, ‘आग्रा’, ‘जयपूर’, ‘किराणा’ इत्यादी उस्ताद अमीर खान यांच्या गायकीला ‘इंदौर घराणे’, तर पंडित कुमार गंधर्वांच्या गायकीला ‘देवास घराणे’ असे त्यांच्या हयातीचा संबोधले जाऊ लागले होते. डॉ. प्रभा अत्रे यांची संगीतविषयक तर्कसंगत, वैज्ञानिक भूमिका, सृजनशीलता यात कुठे बसणारी आहे! म्हणूनच डॉ. प्रभा अत्रे यांच्या चिंतनामधून, कला सादरीकरणाच्या शैलीमधून नव्या घराण्याचा जन्म झाला, असे निश्चितपणे म्हणता येईल.
राग संदर्भातील भूमिका
राग निर्मिती करताना नियमांच्या चौकटीत राहूनच मळलेल्या वाटेने न जाता, वेगळीच वाट शोधत राग स्वरुप उलगडताना जाणवणारी रसिली वृत्ती, स्वरांच्या नाद गुणांबरोबरच, भावनेचा स्पर्श, स्वर वाक्य तयार करताना वापरलेले कण - स्वर, मींड यांचे निराळेपण, रागाला व ख्याल घाटाला साजेसा प्रचलित, नवीन, अप्रचलित, सोप्या वाटणार्या तरीही कठीण स्वर वाक्यांचा शोध असे डॉ. प्रभा अत्रे यांचे काही निराळे विचार दिसतात. त्यामुळे त्यांची राग प्रस्तुती ठळकपणे उठून दिसते. राग नाम, शास्त्र आणि प्रस्तुतीकरण यांचा एकमेकांशी संबंध असायलाच हवा, या भूमिकेतून एक सुंदर रागरुप उभे राहाते. उदा. ‘मारुबिहाग’, ‘श्याम कल्याण’, ‘जोगकौंस’, ‘जयजयवंती’ इत्यादी रागांची डॉ. प्रभा अत्रे यांची प्रस्तुती अन्य कलाकारांपेक्षा वेगळी आहे. राग संगीतातील कलाकाराला मिळालेली अभिव्यक्ती आणि विचारस्वातंत्र्यामुळे रागांच्या तपशिलात विविधता येते. मात्र, रागाचा मान्यताप्राप्त स्वरुपापेक्षा वेगळं काही मांडताना त्यामागे विचार, सबळ कारणमीमांसा, तर्कसंगती आणि सातत्य असणे आवश्यक असतं. डॉ.प्रभा अत्रे आपल्या विचारांमागे, प्रस्तुतींमागे ठामपणे नेहमी उभ्या असतात. ‘मारुबिहाग’ रागाची डॉ. प्रभा अत्रे यांची ध्वनिमुद्रिका आज जवळजवळ ५० वर्षांनंतरही लोकप्रिय आहे. ‘मारुबिहाग’मध्ये फक्त तीव्र माध्यमाचा प्रयोग केला आहे. ‘जोगकौंस’ रागात जो गंगाचा तुकडा घेतात, जसे, ग, म, प, नी, प, ‘श्याम कल्याण’ रागात रे, म (तीव्र) प, म (तीव्र), ग, रे, म (तीव्र), ध, म (तीव्र)नी, ध, म, ग, म, रे, नि, रे, असे ‘कल्याण अंग’ दाखवतात. ग, म ( शुद्ध मध्यम) रे, या स्वर वाक्यामधला शुद्ध मध्यम इतका पुस्तक केला जातो की, त्यामुळे कल्याण अंग ठळकपणे दिसून येतं. हे प्रस्तुतीकरण प्रत्यक्ष ऐकून समजून घ्यायला हवं.
आपल्या भूमिकेबाबत डॉ. प्रभा अत्रे सांगतात, “मी स्वतः काही राग वेगळ्या प्रकारे गाते. कारण, त्याचं स्वरुप मला वेगळ्या तर्हेने भावतं. मी त्या रागाच्या नियमांकडे राग स्वरूपाच्या चौकटीतच वेगळ्या दृष्टिकोनातून बघते. पण, मी जे करते, त्याचं संपूर्ण भान मला असतं. त्यामध्ये अनाठायी स्वातंत्र्य घेण्याचा किंवा आपल्या लहरीप्रमाणे गाण्याचा भाग अजिबात नसतो. हा एक जाणीपूर्वक घेतलेला निर्णय असतो. उदा. ‘मारुबिहाग’ रागात शुद्ध मध्यम आगंतुकपणे शिरु पाहतो, म्हणून त्याला बाहेरच ठेवले. आलापीमध्ये उगीचच केव्हातरी तो डोकावताना दिसतो. पण, तानेमध्ये मात्र गायब होतो. शुद्ध मध्यमा खेरीजही ‘मारुबिहाग’ आपला स्वतंत्र राग आत्मविश्वासाने पुढे ठेवतो. ज्या स्वराचा विशेष उपयोगाचा नाही, त्याला बाजूला ठेवलं एवढचं. ‘मारुबिहाग’ गाताना मी शुद्ध मध्यम वर्ज करीत असले तरीही शुद्ध मध्यमाखेरीज तो प्रभावीपणे आपल्या वैशिष्ट्यांसह उभा राहातो. तसा गाताना त्याची ‘मारुबिहाग’ म्हणून असलेली ओळख कायम राहाते. तसेच ‘श्याम कल्याण’मध्येरागाची चौकट न मोडता मी कल्याण अंग जाणिवेने पुढे ठेवते नाहीतर त्याचा ‘शुद्ध सारंग’ होतो. ‘जोगकौंस’ गाताना कोमल निषेधाचा प्रयोग मी जोगसारखा करते. ‘जोगकौंस’ रागातल्या प्रसिद्ध बंदिशीच्या ( हे सुगर.....) मुखड्यातच प, ध, नी, या स्वर वाक्यात कोमल निषेधाचा प्रयोग केला जातो. हा प्रयोग कोणत्या आधारावर आहे, हे अजूनही मला कळलेलं नाही. वेगळ्या विचारांनी मांडलेल्या या रागांना जाणकारांची मान्यता मिळाली आहे आणि ते प्रस्थापित झाले आहेत, याबद्दल मला समाधान वाटलं. रागाचं नाव, सादरीकरण आणि संबंधित शास्त्राचा संबंध असायला हवा की नको? अनेक रागांची नावं तीच राहिली असली तरीही काळाच्या ओघात त्यांच्या प्रस्तुतीकरणात मौखिक परंपरेमुळे नकळत बदल होत गेले आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. काळाच्या ओघात बदललेल्या संगीत स्वरूपाबरोबर शास्त्र हे बदलायला हवं, ते तसं होताना दिसत नाही. म्हणूनच गोंधळ आहे, वाद आहेत. वर्तमान कलाविष्काराला भरत नाट्यशास्त्र, शारंग देवाचं संगीत रत्नाकर आणि भातखंडे यांचे संगीतशास्त्र यांसारख्या ग्रंथांचा आधार घेताना अनेक गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. विनाकारण बेजबाबदारपणे टीका करू नये. या ग्रंथांत मधल्या त्या त्या काळाच्या सादरीकरणाला शास्त्रबद्ध केले आहे. आजच्या कला प्रस्तुतीकरणाला या ग्रंथांचा आधार (ज्यामध्ये त्या त्या काळाच्या कला प्रस्तुतीकरणाला संदर्भ घेऊन विश्लेषण केलेला आहे) घेतल्यामुळे गोंधळ निर्माण होतो.”
भातखंडे यांच्या परंपरेमधले पंडित के.जी. गिंडे यांसारखे विद्वान डॉ. प्रभा अत्रे कृत या बदलांचे व राग स्वरुपाकडे पाहाण्याच्या निराळ्या दृष्टिकोनाचे स्वागत करताना दिसतात. ते म्हणतात, “जीवन सतत बदलत असते. अलीकडच्या काळात तर ते जास्त झपाट्याने बदलत आहे. अर्थात आपले संगीतही बदलत जाणे अपरिहार्य आहे, नाहीतर तानसेन जगात होते ते आणि तेवढेच आपण आजही गात राहिलो असतो. आजचे आघाडीचे कलाकार डोळसपणे गाण्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अशा कलाकारांत डॉ. प्रभा अत्रे या नामवंत गायिकेचा समावेश होतो. गुणीदासांनी आपली मुळची राग ‘कौंस’ची संकल्पना देवधरांशी चर्चा करून ‘जोगकौंस’ अशा जोड रागाच्या स्वरुपात साकार केली. प्रभाताईंनी माझ्या स्मरणाप्रमाणेहा राग गाताना जोग अंगाला प्राधान्य देऊन या रागस्वरुपाची एक नवी शक्यता मांडली आहे.” शास्त्राच्या दृष्टिकोनातून राग, नाम आणि प्रस्तुतीकरण यांच्यामध्ये मेळ असायला हवा. यासाठी डॉ. प्रभा अत्रे काही बदल सुचवतात, जसे -
१) गोरख कल्याण रागाला- ‘गोरख’, कारण त्यात कल्याण अंग नाही
२) ‘श्याम कल्याण’ रागाला - ‘सारंग कल्याण’,कारण त्यात श्याम असे कोणतेही स्पष्ट राग स्वरुप आढळत नाही
३) ‘रामकली’ रागाला - ‘रामकली भैरव’, कारण त्यात भैरव दिसतो
४) ‘वसंत मुखारी’ रागाला- ‘मुखारी भैरव’, कारण त्यात बसंत अजिबात नाही इत्यादी.
डॉ. प्रभा अत्रे म्हणतात, “अनेकदा आमच्या घराण्यात हा राग असाच गातात असं म्हटलं की, बाकीच्या लोकांनी गप्प वेगवेगळ्या घराण्यात एकाच रागाची वेगवेगळी रुपं समोर येतात, हे कसं शास्त्र आहे? त्यासाठी सर्व जाणकारांनी एकत्र येऊन त्या रागाचे स्वरूप निश्चित करणे आवश्यक आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी हे सगळ गोंधळात टाकणार आहे. प्रत्येक रागाचे नियम आणि स्वरुप लवकरात लवकर निश्चित होणं फार जरुरीचे आहे. राग समय, राग रस, राग संकल्पना अमूर्त असल्यामुळे तिला मूर्त करण्याचे प्रयत्न झाले. अमृताला सामोरं जाणं कठीण असतं. म्हणून राग समय, राग रस, राग माला चित्र, ध्यानमंत्र, अशा गोष्टींचा राग संगीतात प्रवेश झाला आणि तो समज घट्ट होत गेला. विशिष्ट परिस्थितीत एखाद्या गोष्टीबद्दल काही धारणा निर्माण होते, परंपरा निर्माण होते आणि ती परिस्थिती बदलली तरी तो समज, ती परंपरा चालूच राहाते. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा माणूस चार भिंतींमध्ये कोंडला गेलेला आहे. त्याला वेळेचे भान आहे का? अमूर्त राग आणि विशिष्ट रस यांची सांगड कशी घालू शकतो? प्रस्तुती करण्याच्या वेळी कलाकारांची मानसिक अवस्था असते, त्याला अनुरूप भाव त्याचा राग प्रस्तुतीमध्ये त्याला जाणवत असतो. माझा प्रत्येक श्रोता स्वतःच्या मानसिक अवस्थेनुसार भावनिर्मितीचा आनंद घेत असतो. त्यामुळे विशिष्ट रागाला, विशिष्ट रस असे विधान धाडसाचं वाटतं. कोणताही कला प्रस्तुतीमध्ये आनंदानुभूती हेच अंतिम ध्येय असतं आणि उत्तम कलाकृती हाच एक निकष असायला हवा.” राग रस व राग समय या संकल्पनांमध्ये शास्त्र, वस्तूनिष्ठपणा यापेक्षा सवयीचा व संस्कारांचा भाग जास्त दिसतो. आजच्या विज्ञानयुगात या संकल्पना तपासून घेणे जरुरीचे आहे. डॉ. प्रभा अत्रे यांनी त्यांचे पुस्तक ‘सुस्वराली’ यामध्ये याबाबत सविस्तर चर्चा केली आहे.
रचनाकार
भारतीय संगीत रचनाकारांमध्ये डॉ. प्रभा अत्रे यांनी आपले विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. गेली अनेक वर्षे डॉ. प्रभा अत्रे आपल्या सादरीकरणात स्वतःच्या रचना गात आल्या आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात रसिकांची, जाणकारांची मान्यता मिळाली आहे. “पण, जुन्या, पारंपरिक बंदिशीचं भांडार उपलब्ध असताना नवीन बंदिशीची काय गरज? असं नेहमी म्हटलं जातं. त्या जुन्या बंदिशी कुठून आल्या? तर त्या त्या काळात गरजेनुसार प्रत्येक पिढीने नवीन बंदिशीची भर घातली, हे लक्षात घ्यायला हवे. आजच्या काळाला आणि माझ्या शैलीला साजेशी बंदिश असणं हे माझ्या कलाविष्कारासाठी आवश्यक आहे, म्हणून बंदीश बांधायला सुरू केली,” असे डॉ. प्रभा अत्रे म्हणतात. शब्दांची नादमयता राग, घाट, यांचं नेमकं सुस्पष्ट दर्शन, विचार, कर्नाटकी शैलीशी गमक आणि सरगमचा अनोखा प्रयोग अशा अनेक गोष्टी डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशीमध्ये दिसतात. ‘ख्याल’, ‘तराना’, ‘ठुमरी’, ‘दादरा’, ‘गीत’, ‘गझल’ इत्यादी संगीत प्रकारांच्या ५५० हून अधिक रचना त्यांनी पुस्तकरुपाने प्रसिद्ध केल्या आहेत. सरगम स्वर वाक्य आणि लयीची चाल त्यामधील वैविध्य, तराना बंदिशीमध्ये जागोजागी जाणवतं. तसेच चतुरंगाची निराळी बांधणी, त्यात मृदंग या दाक्षिणात्य वाद्यावरील बोलांचा समावेश किरणा शैलीत शिक्षण झालेल्या कलाकारांकडून प्रथमच बांधलेला हिंदी भाषेतला टप्पा, ‘भैरवी’ रागात ‘ओम नमः शिवाय’ यासारख्या केवळ एकाच ओळीतून उभी केलेली संपूर्ण बंदिश असे अनेक संपूर्णतः नवीन पैलू डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींना आहेत. डॉ. प्रभा अत्रे स्वतः आपल्या प्रस्तुतीमध्ये या रचना गातात. पण, आज अनेक कलाकार आणि विद्यार्थी त्यांच्या रचना गातात. विशेष म्हणजे, या रचना नृत्य, नाटक, ‘फ्युजन’ वगैरेसाठी वापरल्या जातात. बंदिशींमधील त्यांचे योगदान पाहता त्यांना ‘वागग्येयकार’ संबोधन अधिक योग्य ठरेल, असे वाटते.
डॉ. प्रभा अत्रे यांच्या रचनाकुशलतेबाबत पंडित भीमसेन जोशी म्हणतात, “आजच्या वरिष्ठ गायकांमध्ये डॉ. प्रभा अत्रे यांचे वेगळे स्थान आहे. सौंदर्यवादी दृष्टिकोन, रसिकता आणि विजेसारखी बुद्धिमत्ता या त्रिवेणी संगीतामध्ये आपली वेगळी वाट शोधण्यामध्ये त्या नेहमीच कार्यरत आहेत. संगीतशास्त्र आणि सुंदरता हे त्यांच्या बंदिशींचे वैशिष्ट्य आहे. त्यांची सहज सुंदर बंदिश कला मर्मज्ञांबरोबर साधारण श्रोत्यांनाही संमोहित करते. संगीतामध्ये निरंतर येणार्या बदलांमुळे नवीन बंदिशींची आवश्यकता आहे. यादृष्टीने मी डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींचे पहिले पुस्तक ’स्वरांगिनी’ याचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देतो.”. प्रभा अत्रे यांच्या रचनांमध्ये एकाच रागातील ख्यालात विलंबित आणि द्रुत बंदिशी गाताना दोन्ही रचनांत एकच विषय, एकाच भावनेचा पाठपुरावा केलेली शब्द रचना आढळते आणि त्यामुळे त्यागाचा भाव टिकून राहतो. उदा. विलंबित- ‘हे जोगिया मोरे मितवा तुम बिन भई मे जोगनिया’, ‘द्रुत -अजहून आए सजनी’, जोगी करत मनमानी काही रागांच्या बंदिशीमध्ये राग नामांचा उल्लेख सापडतो. जसे, राग चारुकेशी -जगत जननी चारुकेशी.. डॉ. प्रभा अत्रे यांचे शिक्षण किराणा घराण्यात झालं. तेथील रागसंच मर्यादित स्वरूपाचा व प्रचलित रागांचा आढळतो, तसेच तालामध्येही फारशी विविधता दिसत नाही. डॉ. प्रभा अत्रे यांनी मात्र अनेक नवनवीन राग व ताल समर्थपणे हाताळले आहेत.
विलंबित ख्यालाचा अंतरा गाळणं, रागांचा अमूर्तपण जपायचं असेल तर आवश्यक तितकीच बंदिशीची लांबी हवी, ‘प्रबंध’, ‘अष्टपदी’, ‘ध्रुपद धमार’ या घाटांमध्ये बंदिशींची लांबी कमी कमी का होत गेली, त्याचा विचार व्हायला हवा. कलेमध्येही आवश्यक असेल तेवढेच टिकतं. जितकी लहान बंदिश तितके शब्द कमी, तितकी स्वरांना शब्दापासून व शब्दार्थांपासून मुक्तीख्यालामध्ये बंदिशीची लांबी हा घाट उभारणीचा किंवा राग रुप साकार करण्याचा आवश्यक घटक होऊ शकत नाही. कमीत कमी अर्थवाही शब्द वापरुन म्हणजेच विलंबित ख्यालाची नुसती स्थायी वापरून ख्यालाचं आपलं अमूर्तपण जपणे शक्य होतं. खरंतर तालाच्या एका आवर्तनाचा मुखडा वापरून उभारणी किंवा राग विस्तार समर्थपणे होऊ शकतो.प्रत्यक्षातही अधिक तर केवळ मुखड्याच्या मदतीनेच प्रस्तुतीकरण होत असतं. प्रत्येक वेळी संपूर्ण बंदिश गायली जात नाही. काहीशी विवादात्मक आणि त्यामुळेच डॉ. प्रभा अत्रे यांची ओळख बनलेली ही भूमिका आहे.
उपशास्त्रीय व सुगम रचना
‘ठुमरी’ आणि ‘दादरा’ याबद्दल विचार व्यक्त करताना डॉ. प्रभा अत्रे म्हणतात की, “हे दोन्ही घाट तालामुळे वेगळे ठरत नसून लय या घटकामुळे वेगळे होतात; जसं ‘बडा ख्याल’ आणि ‘छोटा ख्याल’ एका तालात असू शकतात. परंतु, त्यातील लयीचा वापर वेगळा असतो. त्यालाच या सादरीकरणात ‘बडा ख्याल’नंतर ‘छोटा ख्याल’ गायला जातो.” त्याच धर्तीवर प्रभाताईंनी एकाच रागात ‘ठुमरी’ आणि त्यानंतर ‘दादरा’ पेश केला आहे. या नव्या प्रयोगाचे रसिकांनी स्वागत केले आहे. ‘चैती’, ‘कजरी सावनी’, ‘झूला’, ‘बसंती’, ‘होरी’, ‘बारमासा’ इत्यादी हे वेगळेवेगळे उपशास्त्रीय संगीत प्रकार केवळ वेगळे काव्यप्रकार आहेत. याची गायकी ‘ठुमरी’, ‘दादरा’ यांच्यासारखीच आहे. अशा तर्हेचा विचार प्रथमच पुढे आला आहे. गझलवरती प्रभाताईंचं खास प्रेम आहे आणि त्यांनी ती मांडलीदेखील स्वतःच्या अनोख्या ढंगात! अनेक गीतं व गझली त्यांनी स्वतः लिहिलेल्या आहेत. प्रभाताईंनी ‘टप्पा’, ‘टप्पा-ख्याल’, ‘ठुम-ख्याल’ यांच्याही रचना केल्या आहेत. “कोणत्याही ‘खान’ प्रकाराच्या स्वतः बंदिशी बांधल्या म्हणजे त्या गाणं प्रकाराच्या खोलात जाऊन अनेक बाजूंनी विचार करावा लागतो, त्यातलं वैशिष्ट्य समोर आणावा लागतं, म्हणूनच ‘ध्रुपद-धमार’, ‘चतुरंग’, ‘त्रिवट’ या संगीत प्रकारांमध्ये मी बंदिशी केल्या आहेत,” असं प्रभाताई म्हणतात.
नवीन राग
डॉ. प्रभा अत्रे यांनी ‘मधुरकौंस’, ‘शिवकली’, ‘अपूर्व कल्याण’, ‘दरबारी कौंस’, ‘मल्हार’, ‘शिवानी’, ‘कौशिक भैरव’ इत्यादी असे काही नवीन राग रचले आहेत. त्या म्हणतात, “नवीन राग निर्माण करणे फारसे कठीण नाही. पण, प्रस्थापित रागात नाविन्य आणणं अतिशय कठीण आहे.” या प्रस्तुतीकरणातील विविधता पाहिल्यानंतर त्याची प्रचिती येते. भारतीय संगीतात प्रत्यक्ष कलाप्रस्तुती करण्याचे फारच थोड्या कलाकारांनी आपले विचार लिखित स्वरूपात समर्थपणे आणि नेमके मांडले असतील. प्रभाताईंनी संगीतावर लिहिलेल्या पुस्तकातील भारतीय संगीत वाड्.मयात अमूल्य भर घातली आहे. त्या पुस्तकांची भारतात आणि भारताबाहेरही अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. बदलत्या कलाविष्काराचं परंपरेशी नातं तपासणारे त्यांचे तर्कसंगत व सुस्पष्ट विचार वाचकांवर प्रभाव टाकल्याशिवाय राहात नाही. त्या संबंधात खुल्या मनाने विचार करणारे मात्र फार थोडे दिसतात.
राग मांडणी
‘ख्याल’ मांडताना डॉ. प्रभा अत्रे आलाप, सरगम व तान या प्रकारांच्या प्रामुख्याने उपयोग करतात, असे दिसते. ‘बोल-उपज पद’ किंवा ‘बोल-तान’ त्या फारशी वापरताना दिसत नाही. याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. प्रभा अत्रे म्हणतात, “ ‘बोल-उपज’ माझ्या गाण्यात नसते. याचं कारण वैयक्तिक आवड ते तर आहेच. पण, अनेकदा शब्दांची मोडतोड आणि त्यातील भावनेची गळचेपी होते असं जाणवतं. अर्थवाही शब्द असल्यामुळे रागांच्या अमूर्तपणालाही धक्का पोहोचतो. शब्दांमध्ये भाव जपून त्यांची तोडफोड न करता मोलाचं काम करणारे कलाकार विरळचं!”
सरगम
सरगमविषयी प्रभाताई म्हणतात की, “सरगमकडे मी वळले, याचे मुख्य कारण आलाप, तान, बोल, यापेक्षा वेगळा परिणाम त्यातून साधता येतो. लयीचे प्रकार अधिक वेधक होतात आणि अनुस्यूत भावनेला जपता येते. शिवाय आलाप, तान त्यासारखी सरगम ही एक शुद्ध सांगीतिक सामग्री आहे. बंदिशीतले अर्थवाही शब्द आम्ही जवळ करतो तर मग अमूर्ताला जपणारी, वेगळा परिणाम साधणारी सरगम का नको? त्याचे समर्पक उत्तर कोणीच देत नाही.” डॉ. प्रभा अत्रे यांच्या सरगम प्रस्तुतीचे अवलोकन केले असता, केवळ उस्ताद अमीर खान नाही, तर इतर सरगम गाणार्या सर्व कलाकारांपेक्षा त्यांची सरगम प्रस्तुती अगदी वेगळी आणि स्वतंत्र आहे. त्यात कलाविचार आहे, चमत्कृती नाही. स्वरनाम उच्चारण्याच्या विशिष्ट ढंग व त्यात जपली जाणारी भावनिकता व रसीलेपण, दोन स्वरांना जोडताना वापरलेली विशिष्ट लखब, तिन्ही सप्तकातील स्वरांची एकचं वाक्यात सुंदर गुंफण, अमूर्त रागाला मूर्त करणारी सरगम अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे डॉ. प्रभा अत्रे यांची सरगम वेगळी आणि लोकप्रिय ठरते.
तान
डॉ. प्रभा अत्रे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व स्वतंत्र ढंगाच्या तानेचं वर्णन करायचं झालं तर स्पष्ट, वजनदार, मोहक, आकृतिबंधात विविधता असणारी, जिच्यात गतिमानतेबरोबर सौंदर्यभाव आणि गोडीदेखील अबाधित राहते असा करावा लागेल. डॉ. प्रभा अत्रे यांच्या तानांमधील काही स्वरवाक्य, आकृत्या अधिक नावीन्यपूर्ण असून आकर्षक आहेत.
अष्टपैलू संगीतकार
आपल्या बैठकीस डॉ. प्रभा अत्रे ख्यालापासून ठुमरी, भक्तिगीत, भावगीत, गझल, नाट्यपद असे अनेक प्रकार हाताळत आल्या आहेत. प्रत्यक्ष मंच प्रस्तुती बरोबरच संशोधन, लेखन, रचना, कवित्व अशा अनेक पैलूंकडे गांभीर्याने पाहाण्यास सुरुवात करणार्या कलाकारांपैकी डॉ. प्रभा अत्रे या एक आहेत. विज्ञान आणि कायद्याची पदवी, संगीतात डॉक्टरेट, डॉक्टरेटचा विषय - ‘सरगम एक सशक्त सांगीतिक सामग्री’. प्रभाताई म्हणतात, “संगीतातलं कोणतंही शोधकार्य संगीताचं प्रकटीकरण आणि प्रस्तुतीकरण समृद्ध करणारं असावं.” आपल्या सादरीकरणात हे गान प्रकार प्रभाताई गातात, त्याला चिंतनाची जोड असते, आवाज लावल्यापासून ते सादरीकरणापर्यंत तो एक संपूर्ण स्वतंत्र आविष्कार असतो. डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायकीवर प्रेम करणारा वर्ग खूप मोठा आहे. देश-विदेशातील अनेक संगीत रसिक त्यांची गायकी आणि कला विचार यांचा आदर करतात
वंदे गानप्रभा स्वरयोगिनी,
नादरुप अनूप बखानी।
स्वर लय ताल सरस कहाई,
रागरूप बहुरूप दिखायी,
कला विद्या सकल गुण ग्यानी,
सृजन कहन सब ही जग मानी।
- डॉ. अतींद्र सरवडीकर
९८२३६२६४८०