पुणे महापालिकेचा गोंधळात गोंधळ इतका चालू आहे की, जनता, लोकप्रतिनिधी आणि खुद्द अधिकारीदेखील काय करायला पाहिजे, याबाबत संभ्रमात पडल्याचे दिसते. मे महिन्यातच पाऊस महानगरात जोरदार बरसल्यानंतर येथील लोकप्रतिनिधींनी महापालिकेत जाऊन आधीचे आयुक्त राजेंद्रे भोसले यांच्या समवेत आणि आताचे आयुक्त नवल किशोर राम तसेच, संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यासमवेत बैठका घेतल्या.
मान्सूनपूर्व कामांना गती देण्याचे निर्देश किंवा सूचनाही पालिकेने दिल्या. यातून पुण्याचे लोकप्रतिनिधी सजग आहेत. हे सिद्ध होत असले, तरी मनपातील अधिकार्यांकडून मात्र पावसाने महानगरातील अवस्था दयनीय झाली. प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी पावले उचलली नसल्याचेच दिसून आले. कोणत्याही भागात काम एकतर व्यवस्थित झाले नाही अथवा झालेलेच नाही, अशी सध्याची महानगराची अवस्था! आता आयुक्तांना पाणी तुंंबते, त्या भागासाठी नवा एकात्मिक पावसाळी आराखडा तयार करण्याच्या आणि पथविभागाने तातडीने कार्यवाही सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यंत्रणा हाले तेव्हा कामे होतील, असे नेहमीचेच अनुभव.
लोकप्रतिनिधींना हे प्रशासन जुमानत नाही, हे यातून सिद्ध होते. पुण्यात दोन हजार किमी लांबीचे रस्ते आहेत. मात्र, पावसाळी गटारे 300 किमी लांबीच्याच मार्गावर आहेत. ही तफावत लक्षात घेतली, तर कामे न करणे आणि नागरिकांना होणार्या त्रासाचा अंदाज सहज करता येतो. सध्या महानगरात पाणी तुंबण्याची अनेक कारणे आहेत. काही ठिकाणी गटारे स्वच्छ केली जात नाहीत, कचरा त्यात महिनोन्महिने अडकलेला आहे. मेट्रो, दुभाजकांची आणि उड्डाणपुलांची कामे सुरू असल्याने पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नाही.
एका आकडेवारीनुसार, 2007 साली पावसाळी गटारांची पाणी वाहन क्षमता प्रतितास 45 ते 65 मिमी एवढी होती. आता ती 104 ते 129 मिमी गृहीत धरली जात आहे. आता 2025 साल सुरू आहे. महानगराचा विस्तार वाढत आहे. हद्दीत अनेक गावे समाविष्टदेखील झाले आहेत. त्यामुळे कामे झपाट्याने कशी करायची, मनुष्यबळ कुठून आणायचे, तेवढा निधी कसा मिळवायचा, असे अनेक प्रश्न प्रशासनासमोर असल्याने हा गोंधळ सुरूच राहील की काय, अशी चिन्हे दिसत आहेत.
सावळा गोंधळ
पुणे महानगरात जशी वाहतुककोंडी आणि अतिक्रमणे नित्याची आहेत, तसे प्राप्त सोयीसुविधा नागरिकांना पुरविण्यात यंत्रणा जो काही सावळा गोंधळ घालीत आहेत, तो पुण्यनगरीची शोभा करणाराच म्हणावा लागेल. हिंजवडी परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रस्त्यांना आलेले वॉटरपार्कचे स्वरूप असो की, ‘पीएमपीएमएल’च्या शहर वाहतूक बसेस रस्त्यात ठिकठिकाणी बंद पडण्याचा प्रकार असो, अथवा नर्हे, हडपसर, कोंढवा, मुंढवा, येरवडा, विमाननगर, बिबवेवाडी, सुखसागर धनकवडी, स्वारगेट, पेठांचा काही भाग वडगाव, सिंहगड आदी भागात नागरी सोयीसुविधांचा अभाव असो. यामुळे प्रशासकीय यंत्रणांवर कामाचा बोज आहे की, त्यांना जनतेची कामेच करायची नाहीत, असा प्रश्न उद्विग्नपणे उपस्थित करावासा वाटतो. अलीकडेच मनपाच्या एका हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील कार्यपद्धतीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला.
या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी ज्या पद्धतीने काम करीत आहेत, त्यावरून मनपात अक्षरशः कामाचा सावळा गोंधळच प्रत्ययास आला आणि त्यावर आयुक्तांचे नियंत्रण नाही, असेच निदर्शनास येते. या कार्यालयातील पथ, पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा निर्मूलन आणि अन्य विभागांत सकाळी 10 वाजता मोजकेच अधिकारी कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसते. काही विभागांत तर कोणीच अधिकारी उपस्थित नसल्याचेही यात आढळून आले आहे, तेथील कर्मचार्यांनी ‘साहेब अजून आले नाहीत’ आणि ‘साहेब येत नाहीत’ असेच सांगून टाकल्याने नोकरशाही किती मुजोर झाली आहे, याचा प्रत्यय यानिमित्ताने येतो. हडपसर-मुंढवा भागात सर्वसामान्य नागरिकांच्या वसाहती अधिक आहेत. त्यामुळे त्यांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे वारंवार लोकप्रतिनिधी सांगतात. तथापि, ते आणि नागरिक घेऊन जात असलेल्या तक्रारींना कोणताही अधिकारी-कर्मचारी जुमानत नसल्याचे दिसून येते. हा सावळागोंधळ दूर व्हावा, अशी नागरिकांनी अपेक्षा केली, तर त्याच चुकले कुठे? मात्र, प्रशासनाकडे कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही, ही वस्तुस्थिती आणि भीषण वास्तव आहे, हे येथे अधोरेखित करावेच लागेल.