मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं, मात्र मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
शनिवारी पहाटे १ वाजता मुंबई पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. शेफाली यांचा मृतदेह अंधेरी येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत्यूमागचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. रुग्णालयातील रिसेप्शन स्टाफच्या माहितीनुसार, ४२ वर्षीय शेफाली यांना त्यांच्या पती पराग त्यागी आणि इतर तीन व्यक्तींनी बेलेव्यू रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता.
आज सकाळी पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने अंधेरी येथील त्यांच्या घरी तपास सुरू केला आहे. पराग त्यागी यांना रुग्णालयातून निघताना पाहिलं गेलं, त्यावेळी ते खूपच भावुक आणि खचलेले दिसले. शेफाली जरीवाला यांनी केवळ २० व्या वर्षी 'कांटा लगा' या म्युझिक व्हिडिओमधून प्रसिद्धी मिळवली होती. त्यानंतर त्यांनी अनेक म्युझिक अल्बम्स आणि चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी 'नच बलिये ५' आणि 'नच बलिये ७' या डान्स रिअॅलिटी शोजमध्ये पती परागसोबत सहभाग घेतला होता. त्याचबरोबर बिग बॉसच्या १३ व्या पर्वातही त्या सहभागी झाल्या होत्या.
शेफाली यांचा पहिला विवाह २००४ मध्ये हरमीत सिंगसोबत झाला होता, मात्र २००९ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी अभिनेता पराग त्यागीशी विवाह केला होता. सध्या त्यांच्या आकस्मिक निधनामुळं मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली असून, अनेक कलाकार आणि चाहते सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.