जसे एखाद्या चांगल्या गोष्टीतून तसे वाईटातूनही माणूस, संस्था आणि व्यवस्थापन सातत्याने धडा घेत असते. तेव्हा, कोरोना महामारीचे संकटही गेल्या दोन वर्षांच्या काळात कर्मचारी आणि कंपनी व्यवस्थापनाला बरेच काही शिकवून गेले. तेव्हा, कोरोनाने उद्योगजगताला दिलेली शिकवण भविष्यातही नेटाने जोपासणे तितकेचे गरजेचे आहे.
2020-2021 या कोरोनादरम्यानच्या सलग दोन वर्षांनंतर नव्याने सुरु झालेल्या 2022 या नववर्षासाठी उद्योग-व्यवसाय नव्याने व नव्या दमाने वाटचाल सुरु करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. व्यवसायवाढीला चालना मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे कर्मचारी-कंपन्यांमध्ये विश्वासाचे वातावरण होत असतानाच, काही बाबींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असून, नव्या संदर्भांसह नवीन वर्षात व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांनी खालील मुद्द्यांवर विशेष विचार आणि त्यानुसार कार्य करण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाच्या सुमारे दोन वर्षांच्या काळात समाजाच्या सर्व स्तरांवर संवेदनशीलतेचा अनुभव सर्वत्र आला. समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रांप्रमाणे उद्योग-व्यवसाय क्षेत्रही याला अपवाद नव्हते. बर्याच कंपन्यांनी अचानक उद्भवलेल्या व्यावसायिक स्थितीतही व कारखाने-व्यवसाय दीर्घकाळ बंद असूनही कामगार कपात कटाक्षाने केली नाही. त्याचवेळी अधिकांश कामगार-कर्मचार्यांनी वेतन कपात व प्रसंगी विनावेतन काम करुनसुद्धा आपली कर्तव्यनिष्ठा स्पष्ट केली.
कंपनी-कर्मचार्यांच्या प्रामाणिक व निरपेक्ष सहकार्याचे दर्शन यानिमित्ताने संस्थांमध्ये घडले. प्रदीर्घ तास काम करणारे कर्मचारी, बदलते उत्पादन व व्यवसायानुरुप काम करण्याची सुरु झालेली नवीन कार्यपद्धती, अधिकाराला जबाबदारीची उभयपक्षी साथ, कंपनीच्या कर्मचार्यांना कोरोना झाल्यास त्यांचे उपचार व असा त्रास न होण्यासाठी लसीकरणाद्वारे प्रतिकार, कोरोनानुरुप कर्मचार्यांसाठी आवश्यक ती धोरणे व मुख्य म्हणजे व्यावसायिक गरजांनुरुप लवचिकतेचा अवलंब करण्याची नवी सकारात्मक कार्यपद्धती यादरम्यान विकसित झालेली दिसते.
कंपनीमधील कर्मचार्यांना त्यांच्या गरजांनुरुप उत्स्फूर्तपणे सहकार्य करण्याची उदाहरणे या दरम्यान प्रकर्षाने दिसून आली. यामध्ये सुधारित व व्यापक वैद्यकीय उपचार-सेवांपासून कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांशी संवादासह समुपदेशन, आवश्यक उपचारांची व्यवस्था, गरजेनुरुप विशेष आर्थिक मदत, नव्या व व्यापक कोरोना-विमा योजनांची त्वरीत अंमलबजावणी इत्यादीचा यासंदर्भात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.संवेदनशील प्रशासनाची ही प्रस्थापित परंपरा नवीन वर्षात सुरु ठेवणे सर्वस्वी फायदेशीर ठरेल.
बदलती व्यावसायिक परिस्थिती व आव्हानांनुसार काम आणि कामकाज यामधील बदल ही यापुढे आवश्यक बाब ठरणार आहे. सद्यस्थितीत केवळ काम चालू ठेवणे ऐवढेच पुरेसे नव्हे, तर त्याला उत्पादक बनविणेसुद्धा तितकेच आवश्यक ठरले आहे. यासाठी कंपनी आणि कर्मचारी या उभयतांनी लवचिकता बाळगणे तेवढेच आवश्यक ठरते. गरज व आवश्यकतेनुसार कर्मचार्यांना धरुन काम करणे, हा पर्याय सर्वांनी पडताळणे व त्याचा अवलंब करणे जरुरी आहे.
काम आणि कामाच्या स्वरुपातील हे बदल आत्मसात करण्यासाठी कंपनी-कर्मचारी या उभयंतांनी सहकार्यासह सामंजस्य दाखविणे अर्थातच अपरिहार्य आहे. ग्राहकांच्या सेवा आणि अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी हे आता अटळ आहे. यासंदर्भात कर्मचार्यांच्या कामाला पूरक असल्यास अद्ययावतपणा व तंत्रज्ञानाची जोड व्यवस्थापनाने सुरु केली आहेच. हीच प्रक्रिया नववर्षात नव्या संदर्भात पुढे चालविल्यास अनेक गोष्टी सुलभ होतील व नवीन वर्षात व्यवसायचक्र केवळ चालणारच नाही, तर निश्चितपणे गतिमान सुद्धा होईल.
‘कोविड-19’च्या परिणामी सन 2020 व 2021 यादरम्यान, अनेकांच्या घरी आरोग्याविषयक प्रश्न व आव्हाने निर्माण झाली. अनेकांना आरोग्याविषयक व इतर गंभीर समस्यांपासून प्रसंगी जीवघेण्या प्रसंगांना देखील सामोरे जावे लागले. अनेकांना आपले प्रियजन गमवावे लागले. हे नुकसान भरुन येणारे कदापि नाही. मात्र, हे वा असे नुकसान पुन्हा होऊ नये, यासाठी व ते टाळण्यासाठी यापुढेसुद्धा प्रयत्न मात्र करावे लागतील.
याची जाणीव व्यवस्थापन व व्यवस्थापकांपासून कंपनी-कर्मचार्यांपर्यंत सार्यांनीच बाळगावी लागणार आहे. कर्मचार्यांना त्यांच्या आरोग्य रक्षणासाठी त्यांच्यामध्ये सतत जाणीव व जागृती निर्माण करण्याच्या जोडीलाच, त्यांच्या आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण गरजांची पूर्तता करणे याला व्यवस्थापनाचे 2022 चे प्रयत्नपूर्वक प्राधान्य असायलाच हवे. कर्मचार्यांच्या आरोग्य रक्षणाला त्यांची वैद्यकीय तपासणी, गरजेनुरुप उपचार, प्रसंगी वाढीव विमा सुविधा व सल्ला-संवाद यांसारख्या बाबी सुरु ठेवाव्यात लागतील.
अनिश्चिततेवर निश्चितणे मात करणे
व्यवसाय आणि उद्योगात किती व्यापक प्रमाणात अनिश्चितता असू शकते, याचे प्रत्यंतर सरकारपासून ते कंपनी-कर्मचारी, ग्राहक या सर्वांनी नुकतेच व दीर्घकाळापर्यंत घेतले. या क्षेत्रात यासारखी वा याहून अधिक अनिश्चितता येणार नाही, हे निश्चित.
उद्योगजगताने यापूर्वी आर्थिक मंदी, जागतिक स्पर्धा, तंत्रज्ञानविषयक मर्यादा, नोटबंदी, बदलती सरकारे व त्यांची आर्थिक धोरणे, क्वचित येणारी नैसर्गिक संकटे वा औद्योगिक अशांतता इत्यादीमुळे उत्पन्न अस्थिरता पाहिली आहे. या सर्व समस्यांवर यशस्वीपणे मातही केली आहे. मात्र, कोरोना व नंतरच्या अनिश्चिततेचे सुरुवातीपासूनचे आव्हान व स्वरुपच वेगळे होते. आरोग्यामुळे निर्माण झालेल्या या अनिश्चिततेमुळे सर्वांपुढे व्यवसाय-रोजगाराचेच नव्हे, तर अक्षरश: जीवन-मरणाचे संकट उभे ठाकले. यावर पण नवीन वर्षात कृती आणि कारवाई होणे आवश्यक व अपेक्षित आहे.
कोरोनाच्या विविध टप्प्यांदरम्यान निर्माण झालेली स्थिती, समस्या व आव्हानांनी जनसामान्यांना अनपेक्षितपणे आलेल्या तीव्र संकटांवर मात करण्याची शिकवण आणि क्षमता दिली आहे. या कसोटीवर इतर भारतीयांप्रमाणेच आपले उद्योग-व्यवसाय-कामगार कसोटीवर खरे उतरले आहेत. आर्थिक प्रगतीची गती पूर्वीप्रमाणे ठेवणेच नव्हे, तर त्यामध्ये सुधारणा हे देखील याचेच साधार प्रमाण आहे.
कोरोनाच्या शिकवणुकीमुळे आपल्या सगळ्यांचाच कस लागला. शासन-प्रशासन, सामाजिक- राजकीय, आर्थिक-औद्योगिक सर्वच क्षेत्रांना यामुळे काही ना शिकायला मिळाले. हे शिक्षण व त्यातून मिळालेली शिकवणूक नव्या वर्षातच नव्हे, तर यापुढे दिशादर्शक ठरणारी आहे. व्यवस्थापन-व्यावसायिकांनी याकडे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच जागृत व जागरुक राहाणे हे निश्चितपणे सर्वांच्या भल्याचे ठरेल. या नव्या शिक्षणाला यानिमित्ताने आलेल्या अनुभवांची जोड दिल्यास कोरोनाकाळाच्या प्रदीर्घ पार्श्वभूमीवर सुरु होणार्या नववर्ष 2022ची सुरुवात व्यावसायिक व वैयक्तिक यशासह होऊ शकेल.
थोडक्यात म्हणजे कोरोना काळात आरोग्यासह समाजजीवन व उद्योग-व्यवसाय क्षेत्रात जे विपरित परिणाम झाले, या प्रक्रियेवर तोडगाच नव्हे, तर यशस्वी व स्थायी उपाययोजनेची सुरुवात झालेली दिसते. या प्रक्रियेला व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनी- कर्मचार्यांनी गेल्या दोन वर्षांत दाखविलेल्या संयमित धैर्य व साहसपूर्ण प्रयत्नांसह गती दिल्यास, नवे वर्ष सर्वांसाठी समाधानाचेच नव्हे, तर सफलतेचे पण राहील, हे निश्चित!
(लेखक एचआर-व्यवस्थापन व सल्लागार आहेत.)