बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे राष्ट्रवादावरील विचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2021   
Total Views |
bakim_1  H x W: 
 
 
 
‘बंगालमधील राष्ट्रवादाचे उद्गाते’ या लेखमालेच्या आजच्या पहिल्या भागात कवी, कादंबरीकार, इतिहासकार, निबंधकार, समीक्षक असलेल्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या राष्ट्रवादाविषयीच्या विचारांचे चिंतन केले आहे. ‘राष्ट्रवाद’ हा एक अमूर्त विचार होता. पण, ‘स्वप्नाळू राष्ट्रवाद’ न मांडता बंकिमचंद्रांनी ‘वास्तवादी राष्ट्रवाद’ मांडला, हे त्यांचे आधुनिक राष्ट्रवादी विचारवंतांमध्ये मोलाचे योगदान आहे.
 
 
गालमध्ये विसाव्या शतकातील उत्तरार्ध हा ‘प्रबोधनपर्व’ म्हणून ओळखला जातो. हेमचंद्र बॅनर्जी हे प्रबोधनाचे कवी, राजकृष्ण बॅनर्जी हे प्रबोधनाचे इतिहासकार, अक्षयचंद्र सरकार, ताराप्रसाद चटर्जी आणि चंद्रनाथ बसू हे प्रबोधनाचे निबंधकार होते आणि स्वतः कवी, कादंबरीकार, इतिहासकार, निबंधकार, समीक्षक अशा विविध पैलूंचा समुच्चय असलेले बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे या प्रबोधनपर्वाच्या केंद्रभागी नि संघटक होते. बंकिमचंद्रांनी १८७२ला सुरू केलेले ‘बंग-दर्शन’ हे मासिक या प्रबोधनपर्वाचे मुखपत्र होते.(Pal, Bipin Chandra. Memories of My Life Times, Modern Book Agency, १९३२, , पृष्ठ २२६) महाराष्ट्रात ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांचे जे स्थान आहे तेच स्थान बंगालमध्ये ‘बंग-दर्शन’ आणि ‘तत्त्वबोधिनी पत्रिका’ वृत्तपत्रांचे होते. ‘आनंदमठ’ या सुप्रसिद्ध कादंबरीतून ‘वंदे मातरम्’ हा मूलमंत्र देणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय या प्रबोधनाचे प्रणेते होते.
 
 
 
‘आनंदमठ’ या कादंबरीवरून असे जाणवते की, बंकिमचंद्रांना मातृभूमीची निःस्वार्थ सेवा करणारे देशभक्त अपेक्षित होते आणि त्यासाठी शक्ती नि सामर्थ्याचे स्रोत म्हणून कालीदेवता कल्पिली होती. इतिहासकार रमेशचंद्र मझुमदार यांनी नमूद केल्याप्रमाणे, ‘बंकिमचंद्रांनी देशभक्तीचे धर्मात आणि धर्माचे देशभक्तीमध्ये रूपांतर केले’(Majumdar, R C., British Paramountcy Indian Renaissance- Volume १०- Part २, Bharatiya Vidya havan, १९६५, पृष्ठ ४९६)बंकिमचंद्रसुद्धा हिंदू राष्ट्रवादाच्या विचारांना आपल्या लिखाणातून उत्तेजन देत होते. १८७२ला प्रसिद्ध झालेल्या "Disgrace of Bharat- Why she lost her freedom"?(भारताची मानहानी- तिने तिचे स्वातंत्र्य का गमावले?) या बंगाली लेखात बंकिमचंद्रांनी राष्ट्रवादासंबंधी स्वतःचे आकलन सविस्तर उद्धृत केले आहे. त्याचा हा स्वैर अनुवाद-
 
 
 
“मी हिंदू आहे, तुम्हीही हिंदू आहात, राम हिंदू आहे व असे अनेक लाखो हिंदू आहेत. जे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे ते माझ्यासाठीही उपयुक्त आहे, जे त्यांच्यासाठी अपायकारक आहे, ते माझ्यासाठीही अपायकारक आहे. म्हणून सर्व हिंदूंना जे उपयुक्त आहे तेच मी करायला हवं आणि कुठल्याही हिंदूला अपायकारक होईल अशापासून मी लांब राहायला हवं. खरोखर प्रत्येक हिंदूने असेच वागायला हवे. तसे असेल तर प्रत्येक हिंदूचे हे कर्तव्य आहे की, त्याने एकमेकांशी चर्चा करून आणिसहमतीने एक विशिष्ट धोरण ठरवून संयुक्त कृतीची दिशा निश्चित करावी. ही राष्ट्रवादाची अर्धी संकल्पना आहे.जगात हिंदूंच्या व्यतिरिक्त अनेक राष्ट्रं आहेत, जे त्यांच्यासाठी उपयुक्त असेल ते आपल्यासाठीही उपयुक्त असेलच असे नाही. बहुतांशी वेळी जे त्यांच्यासाठी उपयुक्त असेल ते आपल्यासाठी अपायकारक असेल.
 
 
 
अशावेळी ते उपयुक्त करण्यापासून परावृत्त होतील, अशी कृती आपण करायला हवी. जर यासाठी दडपशाही आवश्यक असेल तर त्यापासून आपण मागे हटू नये. त्याचप्रमाणे जे आपल्यासाठी उपयुक्त असेल ते त्यांच्यासाठी वाईट असू शकेल. तरीही आपण आपले राष्ट्रहित करणे थांबवू नये. जर त्यामुळे दुसर्‍या राष्ट्राचे अहित होत असेल, तर आपण तेही करावे. हा उर्वरित अर्धा राष्ट्रवाद होय.”‘राष्ट्रवाद चांगला असो की वाईट, जे राष्ट्र त्याचा अंगीकार करेल ते त्याप्रमाणात इतरांपेक्षा अधिक बलशाली होईल. आज युरोपात राष्ट्रीय जागृती खूप प्रबळ आहे आणि ती अनेक राज्यक्रांतींना कारणीभूत होत आहे. त्याने इटलीचे एकीकरण केले. जर्मन साम्राज्याचा तर तो पाया आहे. अजून काय घडामोडी होतील, हे कोणीच सांगू शकत नाही.’ (Majumdar, R C., History of The Freedom Movement in India- Volume १, Firma K L Mukhopadhyay, १९७१, पृष्ठ २९६-२९७).
 
 
 
येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाव दिलेल्या सद्गुण-विकृतीची आठवण होते. परराष्ट्रहित व सहिष्णुता हे गुण असले तरी हे गुण सापेक्ष आहेत, निरपेक्ष नव्हेत, (Conditions apply or according to Conditions only) या गुणांचा अतिरेक झाल्यास ते सद्गुण ‘विकृत’ ठरतात आणि हिंदूंच्या या आत्मघाती वृत्तीला सावरकरांनी ‘सद्गुण-विकृती’ असे नाव दिले आहे. बंकिमचंद्रांनी राष्ट्रवाद सांगताना केवळ स्वराष्ट्रहितच डोळ्यासमोर ठेवून परराष्ट्रधोरण आखावे आणि त्यानुसार वाटचाल करताना अपरिहार्यपणे स्वराष्ट्रहितासाठी परराष्ट्रअहित करावे लागले तरी ते करावे, असे सांगितले आहे. अर्थात, त्यांनी यासाठी ‘स्वराष्ट्रहित’ हा मापदंड दिला आहे, त्यात कुठल्याही प्रकारे स्वहित म्हणजे वैयक्तिक हित टाळावेच किंवा वैयक्तिक हित करूच नये.
 
 
 
येथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, बंकिमचंद्र असे स्पष्ट सांगतात की ‘जे त्यांच्यासाठी उपयुक्त असेल ते आपल्यासाठी अपायकारक असेल, अशावेळी(च) त्यांना उपयुक्त करण्यापासून परावृत्त होतील अशी कृती आपण करायला हवी.’ म्हणजे जर एखादे दुसरे राष्ट्र स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या राष्ट्राचे पर्यायाने आपल्या जनतेचे अहित करत असेल, तरच आपल्या जनतेचे संरक्षण करणे हे कुठल्याही राष्ट्राचे प्रथम कर्तव्य असल्यामुळे त्या अहित करणार्‍या राष्ट्राला रोखणे/परावृत्त करणे म्हणजे त्या राष्ट्राला त्यांचा फायदा करून घेण्यापासून साम, दाम, दंड, भेद हे उपाय वापरून रोखणे यात काय चूक आहे? पाकिस्तान त्यांच्या फायद्यासाठी काश्मीरप्रश्न धगधगत ठेवत असेल आणि त्यामुळे भारताचे, भारतीय जनतेचे अहित होत असेल, तर भारताने साम, दाम, दंड, भेद वापरून पाकिस्तानला काश्मीरप्रश्न धगधगत ठेवण्यापासून परावृत्त करणे आपले कर्तव्य नाही का?
 
 
 
‘जर त्या राष्ट्राच्या हितात आपलेही हित असेल तरीही त्या राष्ट्राचे अहित करा,’ असे कुठेही बंकिमचंद्र म्हणालेले नाहीत. त्याचप्रमाणे ‘जे आपल्यासाठी उपयुक्त असेल(पण) त्यामुळे दुसर्‍या राष्ट्राचे अहित होत असेल तर आपण तेही करावे’ असेही ते सांगतात, म्हणजे दुसर्‍या राष्ट्राचे अहित करण्याचे उद्दिष्ट नाही. पण, स्वराष्ट्राचे हित करताना अपरिहार्यपणे परराष्ट्राचे अहित होत असेल तर आपण तेही करावे, असा मथितार्थ आहे. दुसर्‍या राष्ट्राच्या अहितातच आपल्या राष्ट्राचे हित आहे, असा नापाक विचार त्यांना अभिप्रेत नाही. अखिल जगताने एकमेकांच्या कल्याणाचा विचार करून कृती केली तर बर्‍याच समस्या सुटतील. पण, वास्तवात तसे होत नाही, म्हणूनच प्रत्येक राष्ट्राने अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपापल्या हिताचा विचार करणे वास्तववादाचा आणि व्यावहारिकतेचा विचार करता आवश्यक आहे.नुसत्या भौतिक शक्तीने राष्ट्राची प्रगती होणार नाही, याची त्यांना पूर्ण जाणीव होती तसेच भौतिक शक्तीच्या उणिवांची आणि मर्यादांचीही त्यांना कल्पना होती.
 
 
 
कारण, भौतिक शक्तीने युरोप पादाक्रांत केलेल्या तर्तरांना सांस्कृतिक विकास साधता आला नव्हता. बंकिमचंद्रांच्या दृष्टीने भौतिक शक्ती म्हणजे केवळ शारीरिक शक्ती नव्हे, शारीरिक शक्तीसोबत ऊर्जा, एकता, शौर्य आणि चिकाटी म्हणजे भौतिक शक्ती. त्यांनी राष्ट्राच्या भौतिक शक्तीचे समर्थन केले होते, व्यक्तीच्या भौतिक शक्तीचे नव्हे. सामर्थ्यशाली राष्ट्र हेच त्यांचे स्वप्न होते. राष्ट्राच्या प्रगतीला हानिकारक शक्तींच्या विरोधात म्हणजेच राष्ट्रसंरक्षणार्थ राष्ट्राच्या भौतिक शक्तीची जोपासना अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. राष्ट्राच्या प्रगतीसाठी सांस्कृतिक विकास अत्यंत आवश्यक असतो. राष्ट्राच्या सामर्थ्याला सुसंस्कृततेची जोड नसेल, तर लवकरच ते राष्ट्र एकतर हुकूमशाहीकडे जाईल किंवा त्या राष्ट्रात झुंडशाही अथवा अनागोंदी माजेल. अध्यात्मापेक्षा भौतिक शक्तीला आणि भौतिक शक्तीपेक्षा जनमताला त्यांनी प्राधान्य दिले होते. राष्ट्राची सामाजिक आणि राजकीय प्रगती ही जनमतानेच घडलेली आहे.
 
 
मनुष्यात जसे पशुत्व असते, तसेच एक निःस्वार्थ बुद्धी असते व केवळ जनमतानेच ती जागृत होते. ते हे मान्य करतात की, सद्यःस्थितीत भारत भौतिक शक्ती उपयोग आणू शकत नाही व तसे करणे योग्यही होणार नाही. सध्याच्या सामाजिक दडपशाही व जुलूमशाहीला जनमत हेच उत्तर आहे. बहुतांशवेळी भौतिक शक्ती जेव्हा अमलात आणली जाते, त्यामागे जनमताचाच रेटा कारणीभूत असतो. राष्ट्राचे सामर्थ्य उच्चवर्गाच्या शारीरिक पराक्रमापेक्षा रयतेच्या शक्तीवर अवलंबून असते. म्हणून बंकिमचंद्रांच्या लेखनात शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारण्याविषयी आस्था दिसून येते.(Majumdar, B B. History of Political Thought From Rammohun to Dayananda (१८२१-८४)- Volume १- Bengal, University of Culcutta,पृष्ठ ४३६-४३७ व ४४१).
 
 
 
बंकिमचंद्रांनी राष्ट्र व राज्य किंवा शासन यातील फरक भारतीय मानसिकता लक्षात घेऊन सुरेख शब्दांत मांडला आहे. ते म्हणतात, “जर भिन्न समुदाय बराच काळ एका साम्राज्याखाली राहिले, तर त्यांची विलक्षण विभिन्नता लोप पावते. जसे विविध नद्यांचे पाणी सागराला मिळाल्यावर एकमेकांपासून वेगळे काढता येत नाही, तसेच एकाच साम्राज्याखाली राहणारे विविध राष्ट्रीय समाज आपली विभिन्नतेची लक्षणे गमावतात. ते त्यांची विभिन्नता गमावतात. पण, ऐक्य संपादू शकत नाहीत. रोमन साम्राज्याखालील राष्ट्रीय समाजांच्याबाबतीत अशीच घटना घडली होती व अशीच हिंदूंच्या बाबतीत वर्तमानात घडत आहे. त्यांना सुशासन हवं होतं. पण, स्वातंत्र्य नाही. त्यांची वृत्ती शासन शक्तीविषयी निरुत्साहाची होती. सत्तेवर कोणीही आलं तरी शेतजमिनीचा सारा बंद होणार नव्हता. तर मग राष्ट्रीय राजासाठी लढून काय चांगलं होणारे? ‘स्वातंत्र्य’ व ‘राष्ट्रवाद’ या कल्पना भारताला नवीन आहेत व त्या इंग्रजांनी भारतीयांना शिकवल्या आहेत.” (उपरोक्त, पृष्ठ ४१५-४१६).
 
 
 
राष्ट्र पारतंत्र्यात असताना राज्यकर्त्या शत्रूवर प्रेम करून त्याच्याशी लढणे अशक्य असते, क्रूर व दडपशाही करणार्‍या राज्यकर्त्यांविषयी वैरभाव उत्पन्न करूनच त्याच्याशी लढता येते, अशी बंकिमचंद्रांची धारणा होती. अक्षयचंद्र सरकार संपादित ‘सधाराणी’ (डरवहरीरपळ- १८७४) या साप्ताहिकातून व बंकिमचंद्रांनी स्वतः १८७२ला सुरू केलेल्या ‘बंग-दर्शन’ या मासिकातून त्यांनी अशाप्रकारचे विचार मांडून राष्ट्रवादाच्या वाढीस मोलाचा हातभार लावला. बंकिमचंद्र म्हणतात, “हरलेल्यांनी जेत्यांचा आदर करणे किंवा त्यास निःस्वार्थी उपकारकर्ता मानणे व जेत्यांना शारीरिक शक्ती वापरण्यापासून माघार घेण्यास सांगणे हा मनुष्यस्वभाव नाही. जरी आम्ही सध्या गौण असलो तरी आम्हाला आमच्या भूतकाळाचे स्मरण आहे. इंग्रजांसोबत आमची समानता प्राप्त होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष आम्हाला प्रभावित करत राहो, अशी आम्ही मनापासून प्रार्थना करतो.” (British Paramountcy Indian Renaissance, पृष्ठ २४३).
 
 
 
“हा तात्पुरता लढा आहे व समता प्राप्त होताच व स्वातंत्र्य मिळताच वैरभाव नष्ट होईल,” असे बंकिमचंद्र म्हणतात. पण, ती समता प्राप्त होत नाही, तोपर्यंत शत्रूवर प्रेम करा, या भंपक विचाराऐवजी शत्रूविषयी वैरभाव ठेवला तरच आपण लढू शकू, असा त्याचा मथितार्थ आहे.बंकिमचंद्रांनी राष्ट्रवादाचा तात्त्विक अभ्यास करून आपल्या विविध लेखातून आणि ग्रंथ-कादंबरीतून ते मूलगामी चिंतन प्रगट केले होते. ‘राष्ट्रवाद’ हा एक अमूर्त विचार होता. पण, ‘स्वप्नाळू राष्ट्रवाद’ न मांडता त्यांनी ‘वास्तवादी राष्ट्रवाद’ मांडला, हे त्यांचे आधुनिक राष्ट्रवादी विचारवंतांमध्ये मोलाचे योगदान आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@