मुंबईतील पूलबांधणी प्रकल्पांचा आढावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2021   
Total Views |

BRIDGE_1  H x W

मागील दोन भागांमध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील रहिवाशी बांधकामे आणि महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचा आपण सविस्तर आढावा घेतला. आजच्या भागात मुंबई महानगरातील पूलबांधणी प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे, त्याची माहिती घेऊया.

मुंबई महानगरप्रदेशातील काही महत्त्वाच्या पुलाची कामे टाळेबंदीमुळे वा अन्य कारणांमुळे गेल्या काही काळापासून रखडली होती. परंतु, आता वाहतूक-सुलभतेकरिता ही कामे वेगाने सुरु करणे महत्त्वाचे आहे. मुंबई महानगर प्रदेशात पालिका, रस्ता व सरकारी पूल खाते, ‘एमएसआरडीसी’, ‘एमएमआरडीए’, रेल्वे इत्यादी सरकारी/अर्ध-सरकारी संस्था पूल बांधण्याच्या व पूलदुरुस्तीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. पण, त्यांच्याकडूनही वाहतुकीतील महत्त्वाचे पूल रखडले आहेत आणि नजरचुकीने वा योग्य तो समन्वय न झाल्याने या प्रकल्पाच्या कामांना विलंब होत आहे. या रखडलेल्या कामामुळे काही रस्त्यातील वाहतुकीला लांबचा वळसा वा पल्ला घ्यावा लागतो व त्यामुळे कामांना दिरंगाई होत आहे.पूल मुख्यत: तीन प्रकारांत मोडतात. पादचारी पूल, वाहन पूल व मिश्र (वाहन व पादचारी) पूल. काही पूल नदी, खाडी, रेल्वेलाईन ओलांडणे, उड्डाण पूल, स्कायवॉक पूल, जड वा हलक्या वाहनांसाठी, दुचाकी वाहनांसाठी, रेल्वे पूल, मेट्रो पूल, तात्पुरत्या वळणासाठी असे पुलांचे अनेक प्रकार आहेत. पुलाचा पाया कसा असावा व स्थानिक गरजेनुसार पुलाची रुंदी, लांबी व उंची किती असावी तेदेखील ठरवून संरचनेत तशी योजना करावी लागते. शिवाय सिमेंट काँक्रीटचे, स्ट्रक्चरल स्टीलचे, गंजू नये म्हणून स्टेनलेस स्टील वापरून, प्री-कास्ट, प्री-स्ट्रेस्ड, प्री-मोल्डेड आदी प्रकारही विचारात घेऊन वापरात आणावे लागतात.

महापालिकेवरच्या नियंत्रणाकरिता विकासाकरिता काढल्या जाणार्‍या निविदा अन्य महापालिकांप्रमाणे ११ जूनपासून ‘महा-ई-टेंडर’वर प्रसिद्ध होणार आहेत. अशा बदलामुळे गोपनीय माहितीचा धोका टळणार आहे. महापालिकेकडून ‘सॅप’ प्रणाली अद्ययावत बनविली गेली आहे. मुंबई महापालिकेत दरवर्षी हजार कोटींहून जास्त रकमेची विकासकामे होतात व त्याकरिता ‘ई-निविदा’ काढली जात होती. पालिकेच्या कामात सर्वच राजकीय पक्षांना रस असल्याने प्रशासकीय यंत्रणेत हस्तक्षेप असल्याचे आरोप केले जात होते. पण, यापुढे निविदा थेट राज्य सरकारच्या नियंत्रणात आणल्याने राजकीय हस्तक्षेप वाढण्याचीच शक्यता वर्तविली जात आहे.‘जीएमएलआर’ (गोरेगाव-मुलुंड लिंक रोड) प्रकल्पाकरिता महापालिकेची पहिली निविदा ‘महा ई-टेंडर’वर अपलोड झाली आहे. या प्रकल्पात भूमिगत बोगदे, बॉक्स टनेल, जोडरस्ते यांसह विविध कामे केली जाणार आहेत.बोरिवली स्थानक परिसरातील उड्डाणपुलाने लिंक रोड, एस. व्ही. रोड व पश्चिम महामार्ग जोडले जाणार आहेत. पालिकेच्या नियोजनाप्रमाणे ८६० मी. रस्त्याच्या विस्ताराने कोराकेंद्र जंक्शन येथील हजारो गाड्यांची वाहतूककोंडी कमी होईल, असा पालिकेचा कयास आहे. अनेक वाहने एस. व्ही. रोडवरील कोराकेंद्र जंक्शनवरून न जाता, दोन नवीन उड्डाणपुलांवरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर जातील. परंतु, बांधकामाचा खर्च १६० कोटींवरून ६५० कोटींहून अधिक होईल.

गोवंडी-मानखुर्द व जुईनगर-तुर्भे रेल्वे स्थानकाजवळच्या दोन पुलांची रुंदी (चार पदरीवरून आठ पदरी) वाढविण्याचे काम रखडले आहे. काम पूर्ण होण्याची अंतिम मुदत डिसेंबर २०२० होती. पण, कोरोना टाळेबंदीमुळे मनुष्यबळ कमी पडल्यामुळे काम बंद पडले. काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा अवधी लागणार आहे. या पुलांचा खर्च अनुक्रमे ३०.४४ कोटी व ६३.८४ कोटी राहणार आहे.मुलुंडकरांसाठी तिसरा उड्डाणपूल - मुलुंड स्थानकाच्या दोन्ही टोकांना दोन उड्डाणपूल आहेत. आता मध्यभागी तिसरा उड्डाणपूल होणार आहे. येथे प्रस्तावित भुयारी मार्ग तयार होणार होता, पण तो रद्द झाला आहे. या बदलीच्या प्रस्तावामुळे नागरिक व वाहनचालक दोघांनाही फायदा मिळेल. त्याजागी रेल-ओव्हर ब्रिज होणार आहे. कारण, भुयारी मार्गात पाणी तुंबते. या तिसर्‍या पुलाला तांत्रिक सल्लागार समितीने मंजुरी दिली आहे.दादर येथील लोकमान्य टिळक पुलासह दक्षिण मुंबईतील चार पूल केबलवर उभारून बांधण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १४ धोकादायक पूल म्हणून जाहीर केलेल्यांपैकी चार पूल पाडून झाल्यावर केबल आधारित ते करावे असे ठरु शकते. सँडहर्स्ट रोडवरील हँकॉक पूल गेले सहा वर्षे रखडला आहे. रे रोड रेल्वेमार्ग, लोकमान्य टिळक पूल व भायखळा येथील सीताराम सेल्वन व्हाया ब्रिज अशा तीन नवीन पुलांसाठी साधारणपणे अनुक्रमे १४७ कोटी, ३७५ कोटी व २०० कोटी (एकूण ७२२ कोटी) खर्च येणार आहे. घाटकोपर येथील रेल्वेमार्गावरील कामही याच पद्धतीने केले जाणार आहे.

कल्याणचा पत्रीपूल

कल्याण पूर्व व पश्चिम भागांना जोडणारा १०२ वर्षांचा जुना पत्रीपूल धोकादायक ठरल्याने नोव्हेंबर २०१८ मध्ये तोडण्यात आला. नवीन पुलाची योजना बनली. परंतु, रखडलेल्या पुलाचे काम जून २०२० पासून वेगाने सुरू करण्यात आले आहे. ११० मी. लांबीच्या या पुलाचा ७६ मी. लांबीचा बसविला जाणारा गर्डर हा रेल्वेच्या इतिहासातील पहिला लांब गर्डर ठरणार आहे. नोव्हेंबरमध्ये पुलाचे दोन्ही गर्डर टाकण्यात आल्यानंतर काँक्रीट जोडरस्त्याची कामे वेगाने करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन ‘ऑनलाईन’ होणार असून हा पूल २५ जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या पूलप्रकल्पाला आतापर्यंत ३४ कोटी रुपये खर्च आला आहे.

अंधेरी-घाटकोपर जंक्शन उड्डाणपूल

पूर्व द्रुतगती महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेला हा १२ मी. रुंदीचा व ६९३ मी. लांबीचा पूल नोव्हेंबर २०२० मध्ये खुला करण्यात आला. या जंक्शनवर मोठ्या वाहतूककोंडीच्या तक्रारी येत होत्या. या कामाचे कंत्राट ‘एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.’ व ‘काशेक इंजिनिअर्स’ यांच्याकडे दिले होते. अडीच वर्षे रखडलेले हे काम त्यांनी वेगाने पुरे केले. निविदेची किंमत ३३.०४ कोटी होती.

कलानगर उड्डाणपुलाची कोंडी फुटणार

या ठिकाणच्या वाहतूककोंडी सुलभतेसाठी तीन मार्गिकांच्या उड्डाणपूल कामाला २०१७ मध्ये मंजुरी मिळाली होती. ऑक्टोबर २०२० पर्यंत या पुलाचे ७३ टक्के काम पुरे झाले होते. काही महत्त्वाच्या घटकांचा पुरवठा वेळेत होऊ न शकल्याने काम संपविण्याचे ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यात विलंब झाला आहे. मे २०२१ मध्ये या पुलाचा शेवटचा गर्डर बसविण्यात आला, असे ‘एमएमआरडीए’च्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

वाशीच्या रखडलेल्या तिसर्‍या खाडीपुलाचे काम सुरू

शहराच्या प्रवेशद्वाराजवळ वाहतूककोंडीवर उपाय म्हणून नियोजित असलेल्या तिसर्‍या खाडीपुलाचे ५५९ कोटींचे काम सुरू करण्याचे आदेश ‘एमएसआरडीसी’ने ‘एल अ‍ॅण्ड टी’ कंत्राटदाराला दिले आहे. हे ३६ महिन्यांचे काम आहे व ४८ महिन्यांचा हमीकाळ आहे. या प्रकल्पात तीन मार्गिकांचे दोन पूल (एक रेल्वे पुलाच्या बाजूला व दुसरा जुन्या पुलाच्या बाजूला) बांधावयाचे आहेत. दोन्ही पुलाची लांबी १,८३७ मी. व रुंदी १२.७० मी. असणार आहे. सुरुवातीला कांदळवनाचा अडथळा आला होता व ते तोडण्याची परवानगी मिळत नव्हती. तेवढेच कांदळवन दुसर्‍या ठिकाणी लावण्याच्या अटीवर वनखात्याने मंजुरी दिली आहे. हा पूल झाल्यानंतर टोलवसुलीसाठीही अतिरिक्त तीन-तीन मार्गिका वाढविण्यात येणार आहेत.

लोअर परळ उड्डाणपूल

या उड्डाणपुलाचे काम धोकादायक ठरल्याने हा पूल जुलै २०१८ साली वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पायलिंगचे व अन्य काम नोव्हेंबर २०१९ पासून सुरू आहे. रेल्वेहद्दीतील काम पालिकेकडून रेल्वेला निधी मिळाल्यावर मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणार. पालिका हद्दीतील गर्डर बसविण्याचे १६ पैकी आठ गर्डरचे काम पुरे झाले आहे. पुढील वर्षी हे काम पुरे होण्याची चिन्हे आहेत.

मिठी नदीवरील कामाची रखडपट्टी

कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदीवरील काम अद्याप रखडलेले आहे. कंत्राटदारावर कोणतीही कारवाई न करता हे काम ‘एमएमआरडीए’कडे सोपविण्याचे पालिकेच्या विचाराधीन आहे. आधी साडेतेरा कोटी दिल्यानंतर आणखी ५१ कोटी पालिका ‘एमएमआरडीए’ला देणार आहे. हे काम आणखी रखडण्याचीच शक्यता आहे.
घाटकोपर-मानखुर्द या जोडरस्त्यावरील पूलउभारणीला अडीच वर्षे विलंब; खर्चात वाढ होऊनही कंत्राटदाराच्या कारवाईबाबत पालिकेचे मौन. ७१४ कोटी एकूण खर्च.

रखडलेले पादचारी पूल

मुंबईत पालिकेच्या हद्दीत एकूण ३१४ पूल आहेत. शहर विभाग ८१, पूर्व उपनगर ९० आणि पश्चिम उपनगर १४३ पूल आहेत. यातील २३ स्कायवॉक ‘एमएमआरडीए’ने हस्तांतरित केलेले आहेत. २९६ पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. त्यातून २९ पूल धोकादायक, १०६ पुलांची छोटी दुरुस्ती, ८७ पुलांची मोठी दुरुस्ती करण्याचे ठरले (४८ कामे हाती घेतली आहेत व १४ मोठी कामे पूर्ण, ७० छोटी कामे पूर्ण आणि ७४ पूल चांगल्या स्थितीत असल्याचे समजले.).

दक्षिण मुंबईतील हिमालय व हँकॉक पूल नव्या वर्षात सेवेत येण्याची आशा निर्माण झाली आहे व मुंबई महापालिकेकडून त्याची पूर्तता केली जाणार आहे. त्यासाठी त्यांनी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. तेव्हा, उर्वरित रखडलेल्या मुंबई महानगरातील पुलांची कामे मार्गी लागल्यास नक्कीच मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होण्यास मदत होईल.

@@AUTHORINFO_V1@@