सेवाकार्याची 'समृद्धी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2021   
Total Views |


milind naik_1   
 

‘कोविड’ महामारीचा काळ समाजातील मजूरवर्गापासून ते अगदी मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वांचीच परीक्षा पाहणारा ठरला. या कठीण काळात जवळची माणसे जग सोडून गेली, अनेकांच्या हातचे काम हिरावले, तर काहींना वेतनकपातीचा फटका सहन करावा लागला. या सगळ्या बिकट परिस्थितीत गरजूंना मदतीचा हात देण्याचे काम मिलिंद नाईक यांनी केले आणि सामाजिक बांधिलकी जपली. त्यांचे हे कार्य खरोखरच इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
 
 
 
सेवाकार्याची ‘समृद्धी’ मिलिंद यांची ‘समृद्धी कन्सल्टंट’ नावाची ‘प्रोप्रायटर फर्म’ आहे. ‘इनकम टॅक्स प्रॅक्टिशनर’ म्हणून ते गेल्या २४ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी दि. १ सप्टेंबर, १९९७ साली प्रथम या व्यवसायात पाऊल टाकले. कल्याणमधील नामवंत वकील निशिकांत बुधकर यांच्याकडे त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. बुधकर यांच्याकडे नऊ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नोकरीला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. मिलिंद यांना बुधकर आपला मानसपुत्रच मानत होते. मिलिंद यांनी एके दिवशी बुधकर यांना आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बोलून दाखविली. त्यावर बुधकर यांनी मिलिंद यांना नवीन कार्यालय उघडून देतो, असे सांगितले. “बुधकर यांच्या नवीन कार्यालयात काम केले, तरी आपण एक नोकरदारच राहणार,” असे मिलिंद यांनी त्यांचे गुरू निशिकांत बुधकर यांना सांगितले. “मला प्रयत्न करू द्या, या प्रयत्नात यशस्वी झालो नाही तर पुन्हा तुमच्याकडे येईन,” असे त्यांनी बुधकर यांना सांगितले. नोकरी सोडून त्यांनी व्यवसायात पहिले पाऊल टाकले. बुधकर यांनीदेखील एक वर्षभर मिलिंद यांची जागा रिकामी ठेवली होती. पण, सुदैवाने मिलिंद यांचा व्यवसायात चांगलाच जम बसला होता. त्यामुळे पुन्हा मागे वळून पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. मिलिंद हे एक गोष्ट नेहमी सांगतात, “मी व्यावसायिक क्षेत्रात जो काही प्रगतिपथावर आहे, तो माझ्या गुरूमुळेच आहे आणि ते आदरणीय गुरू म्हणजे निशिकांत बुधकर साहेब.”सध्या ते कल्याणमधील ‘कल्याण जनता सहकारी बँके’च्या संचालकपदावर कार्यरत आहेत. ही त्यांची दुसरी टर्म आहे. ‘टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन’चे ते खजिनदार आहेत, तसेच ‘समृद्धी ह्युमन वेल्फेअर सोसायटी, कल्याण’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव आहेत.


 
मिलिंद नाईक यांचे वडील हे संघ परिवाराशी जोडलेले होते. त्यामुळे मिलिंद हेदेखील संघाशी आपोआपच जोडले गेले. मिलिंद यांचा संघाचे बाबा जोशी (आत्मारामजी जोशी) यांच्याशी परिचय झाला. मिलिंद यांची बाबा यांच्याकडे पाहूनच सामाजिक कार्याची गोडी वाढत गेली. डोळखांब येथील वनवासी मुलांचा पालनपोषण आणि शैक्षणिक खर्च संघाच्या माध्यमातूनच केला जातो. पाचवी ते दहावीची मुले तिथेच राहतात. त्यांच्या जेवणाची, राहण्याची सोयदेखील करण्यात आली आहे. त्या ठिकाणाहूनच मुले शाळेत जातात. सामाजिक कार्यासाठी आपण बरेचदा पैसे देतो आणि मोकळे होतो. पण, बाबांनी प्रथम भेटीतच, “तुम्ही सोबत या, आम्ही काय काम करतो ते आधी पाहा,” असे सुचविले. तसेच बाबा जोशी यांनी, “आम्ही प्रत्येक वनवासी महिलेला एक साडी आणि खाऊचा डबा देत होतो. २० महिलांपासून सुरू केलेले काम आता दोन हजार महिलांपर्यंत जाऊन पोहोचले आहे,” असे सांगितले. दरवर्षी भाऊबीजेच्या निमित्त शहापूर येथील वनवासी पाड्यांमध्ये हा उपक्रम राबवला जातो. आता ५० जण एकत्र काम करतात. दोन तुकड्यांमध्ये कार्यकर्ते त्या ठिकाणी जातात. वनवासी पाड्याच्या कार्यापासून मिलिंद यांच्या सामाजिक कार्याला बाबा जोशींमुळे सुरुवात झाली.
 
 
milind naik 1_1 &nbs
 
 
परराज्यातून आलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी ‘लॉकडाऊन’मुळे कोणताही मार्ग नव्हता. अनेकांचा रोजगार बंद झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला होता. ही परिस्थिती पाहता, कल्याण-डोंबिवलीच्या ‘ब’ प्रभागातील प्रभाग अधिकार्‍यांशी संपर्क साधला. आम्हाला ‘लॉकडाऊन’मुळे अडचणीत असलेल्या व्यक्तींना मदत करण्याची इच्छा बोलून दाखविली. ती मदत कोणत्या स्वरूपात करावी, यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी आम्हाला अन्नधान्याची वस्तूंची यादी दिली होती. ‘टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, कल्याण’च्या बैठकीत हा विषय मांडून काय करायचे हे ठरविले. त्यावेळी ५०० ते एक हजार पॅकिट्स दिले. शासन पातळीवर काम सुरू होतेच. पण, प्रत्येकाला आपणही मदत करण्याची इच्छा होती. त्यानुसार आम्ही आमच्या परीने मदतीचा हात दिला. अत्यावश्यक सेवेतील प्रभाग अधिकार्‍यांनी जे गरजू येतील त्यांना हे द्यायचे, असे ठरविले होते. अनेक गरजू महापालिका कार्यालयाकडे यायचे. प्रभाग अधिकारी त्या गरजूंना ते पॉकीट देत होते.
 
 
‘कोविड’ झालेल्या रुग्णावर ‘प्लाझ्मा थेरपी’ खूपच फायदेशीर ठरत होती. त्यामुळे ‘कोविड’ रुग्णांना ‘प्लाझ्मा’ मिळवून देण्यासाठी मिलिंद नाईक प्रयत्नशील होते. मिलिंद यांचे अनेक डॉक्टरांशी घनिष्ट संबंध आहेत. त्यापैकीच त्यांची एक शालेय मैत्रीण डॉ. वैशाली देसले-अरज, या आयुर्वेद वैद्य आहेत. ‘कोविड’ महामारीच्या काळात नागरिकांना मानसिक बळ देण्याचे काम त्या करीत होत्या, त्यांचीही नाईक यांना रुग्णांचे समुपदेशन, मार्गदर्शन करताना मोठी मदत झाली.सुरुवातीच्या काळात पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात ‘कोविड’ची लागण झाली होती. मिलिंद यांच्या पत्नीच्या मामांना म्हणजेच जानुसिंग पवार (क्राईम ब्रांच) यांनादेखील ‘कोविड’चा संसर्ग झाला होता. त्यावेळी मिलिंद त्यांना मानसिक बळ देण्यासाठी फोन करीत असत. मामांना भेटायला जात होते. पण, मामांनी कधी भेटायला दिले नाही. मानसिक आधार हा त्या काळात खूप महत्त्वाचा भाग होता. अशाप्रकारे मिलिंद यांनी कितीतरी लोकांशी त्यावेळी संवाद साधून त्यांना मानसिक आधार दिला. त्यांचे हेच म्हणणे होते की, “जर एक महिन्याचे बालक आणि १०० वर्षांची महिला बरी होऊ शकते, तर तुम्ही का नाही?”
 
 
मिलिंद यांच्या गाडीचे रिपेअरिंग जावेद नावाचा मुलगा करीत असे. ‘लॉकडाऊन’च्या काळात सगळेच बंद असल्याने त्याच्याकडे खाण्यासाठी पैसेही गाठीशी नव्हते. त्याने मिलिंद यांच्याकडे मदत मागतिली. अनेकांनी जावेदला मदत करण्यास नकार दिला होता. पण, मिलिंद यांच्याकडे मदत मिळणार, हा जावेद याचा विश्वास होता. त्यानुसार मिलिंद यांनी जावेदला मदत केली. मिलिंद यांनी या काळात बर्‍याच गरजूंना आर्थिक मदत देऊ केली. मिलिंद यांच्या वडिलांकडे दातृत्वाचा गुण होता. तोच गुण मिलिंद यांनाही वारशाने मिळाला. त्यांच्या वडिलांचा प्रत्येक धर्माचा अभ्यास होता. प्रत्येकाला ते मदत करीत असत. अनेकांना महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला होता. ज्या काळात प्रवेशासाठी फी द्यावी लागत होती. ते प्रवेश त्यांनी करून दिले होते. त्यांच्या वडिलांच्या खिशात किती पैसे आहेत, हे ते कधी पाहत नव्हते. एखादा गरजू आल्यावर ते त्याला मदत करीत असत. लहानपणी हेच संस्कार मिलिंद यांच्यावर होत होते. त्यातून मिलिंद यांच्याकडे सामाजिक दातृत्वाचा गुण असा उपजतच होता.
 
 
‘कोविड’काळात ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन मिळविण्यासाठी गणेश शेळके यांची त्यांना खूपच मदत झाली. गणेश हे मिलिंद यांचे पार्टनर आणि जीवलग मित्र. लोकांच्या मदतीला धावून जाणे, हा गणेश यांचा स्वभाव. शिवाय गणेश हे ‘कल्याण केमिस्ट असोसिएशन’चे सचिव आहेत. गणेश यांची ‘कोविड’काळात मिलिंद यांना खूप मदत झाली. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळवून देणे, ऑक्सिजनची व्यवस्था बघणे, अशी विविध प्रकारची कामे त्यांनी ‘कोविड’काळात केली. तसेच डॉक्टर वसंतराव नाईक यांनीही ‘रेमडेसिवीर’ मिळविण्यासाठी भरपूर सहकार्य केले.
 
 
नागरिकांना मिळणार्‍या मदतीचे स्वरूप मोठे असावे, यासाठी प्रत्येक जण पैसे जमवून मदत करीत होता. त्यासाठी चार ते पाच जणांचा ग्रुप केला होता. तसेच मिलिंद यांना त्यांच्या घरातूनही ‘कोविड’काळात सहकार्य मिळाले. मिलिंद घराबाहेर फिरत होते. पण, ‘तुमच्यामुळे आम्हाला ‘कोविड’ होईल,’ असे म्हणूून त्यांना कुटुंबीयांनी हिणवले नाही.कधी कधी मदत करताना मिलिंद यांच्याकडेच पुरेसे पैसे नसायचे. हेच या काळातील मिलिंद यांच्यासमोर एक मोठे आव्हान होते. म्हणजे त्यांची मदत करायची खूप इच्छा होती, पण, खिशात तेवढे पैसे नसायचे. पण, यावरही मिलिंद यांनी मात केली.अशा या कोविड योद्धा देवदूत ठरलेल्या मिलिंद नाईक यांच्या कार्याला सलाम!
@@AUTHORINFO_V1@@