मालिकांनी तारले म्हणून...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2021   
Total Views |

maratahi_1  H x
टीआरपी’च्या मूळ संकल्पनेवर आधारलेल्या मालिकाविश्वाला मधल्या काळामध्ये उतरती कळा लागेल, अशी एक चर्चा रंगली होती. कारण, मालिकांवर मनोरंजनासाठी अवलंबून असलेला मोठा प्रेक्षकवर्ग हा नव्या माध्यमांशी जोडला गेला आणि अल्पावधीतच तो या नवमाध्यमांशी तितकाच समरसही झाला.


मालिकांचे चित्रीकरण ‘लॉकडाऊन’ काळात बंद पडल्याने प्रेक्षकांनी आपला मोर्चा ‘ओटीटी’कडे वळवला. पण, गेल्या काही महिन्यांत मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी मिळाल्याने जुन्या मालिकांबरोबर नवीन मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आणि प्रेक्षकवर्गानेही या मालिकांना पूर्वीसारखाच प्रतिसादही दिला. कारण, माहिती प्रसारणाची जी माध्यमे आज भारतामध्ये सर्वसामान्यांकडे सर्रास वापरली जात आहेत, त्यामध्ये दूरदर्शन आणि खासगी वाहिन्यांचा समावेश होतो. प्रारंभी मालिकांमधील विषयांमध्ये कमी-अधिक प्रमाणात साम्य असले तरी हळूहळू त्यात विषयवैविध्यही डोकावू लागले. मालिकाविश्वात सध्या ऐतिहासिक कथा, सामाजिक विषयांवर भाष्य करणार्‍या मालिकांचाही भरणा असल्याने त्याकडे प्रेक्षकवर्ग वळलेला दिसतो. ‘टीआरपी’च्या पायावर उभे असलेले मालिकाविश्व सध्या एकूणच आशयाबाबत तितकेच सजग झाल्याचे दिसते. चित्रपटक्षेत्रामध्ये नाव कमविण्यासाठी अभिनयाचा नाटक, मालिका आणि मग चित्रपट असा ढोबळमानाने होणारा प्रवास. परंतु, सध्या मालिकांमधील कलावंतांना मिळणार्‍या प्रसिद्धीमुळे आज चित्रपटक्षेत्रातील प्रथितयश अभिनेते-अभिनेत्रींची पावले देखील मालिकाक्षेत्राकडे वळलेली दिसतात. त्याचे कारण म्हणजे ‘छोटा पडद्या’च्या प्रसिद्धीची वाढलेली व्यापकता. त्याचबरोबर कोरोनाकाळामध्ये आणि नंतरही चित्रपटांच्या चित्रीकरणाची प्रक्रिया पूर्ववत न झाल्याने मोठ्या पडद्यावरील कलाकारांनीही आपला मोर्चा मालिकांकडे वळवला. एखादा कलाकार मालिकाक्षेत्र का निवडतो, याबाबत एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले म्हणाले होते की, “मालिका क्षेत्राकडे मी नोकरीसारखे बघतो. कारण, मालिकाक्षेत्र आर्थिक गणितांमुळे कलाकारांना जगविते.” त्यामुळेच टाळेबंदीनंतर आता विविध वाहिन्यांवर श्रेयस तळपदे, अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे, उमेश कामत, विजय कदम आदी सिनेकलाकार मालिकांमध्ये पुन्हा झळकलेले दिसतात. त्यामुळे आगामी काळातही टाळेबंदीसदृश माध्यमांमध्ये मनोरंजनक्षेत्राला व प्रेक्षकांनाही मालिकांचा आधार घ्यावा लागणार आहे.
बदललेली निर्मितीची गणिते...

भारतामध्ये ज्या झपाट्याने माध्यमांचा विकास होत गेला, त्याच वेगामध्ये माध्यमांवरील कलाकृतीची गणितेसुद्धा बदलत गेली. कलाकृती निर्मितीमागील उद्देश हा त्याची प्रसिद्धी हाच असतो आणि प्रसिद्धीच्या बाबतीत सध्या विविध माध्यमांची भर पडल्यामुळे निर्मितीची गणितेसुद्धा बदलली. सरकारी वाहिन्यांपासून भारतामध्ये माध्यमक्षेत्राची सुरुवात झाली. पण, आज खासगी वाहिन्यांच्या आर्थिक गणितांचा विचार करून कार्यक्रमांची निर्मिती सुरू झाल्याचे चित्र आहे. माध्यमांच्या खासगीकरणामुळे वाहिन्यांवरील मालिकांचा दर्जा ठरविण्याची जी मापन पद्धती आहे, त्यानुसार त्यातील रोजगाराच्या संधी तयार होत गेल्या. परंतु, सध्या ‘टीआरपी’पेक्षा माध्यमांतील दृश्य मापन पद्धतीमुळे (किती लोकांनी तो कार्यक्रम पाहिला, ही संख्या) निर्मितीची व व्यवसायाची समीकरणेच बदलून गेली.नुकताच युट्यूबवरून ‘ओटीटी’ माध्यमाकडे वळलेला वर्ग हा त्याच्याशी समरस होताना दिसतो. कारण, त्यामधील विषयांच्या वैविध्यामुळे व तेच तेच पणाच्या अभावामुळे ‘ओटीटी’ किंवा युट्यूबसारखी माध्यमे मोठी झाली. ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट’मध्ये कोणती मालिका किती काळ बघितली जाते, यावरून त्याचे आयुष्यमान संबंधित निर्मिती संस्था ठरविते. त्यानुसारच त्यावर अवलंबून असणार्‍या कलाकारांना आर्थिक फायदा किंवा तोटाही सहन करावा लागतो.सध्या मनोरंजनक्षेत्रामध्ये व्यावसायिक यश मिळण्यासाठी निर्माते दृश्य मापन आणि ‘टीआरपी’चा प्रामुख्याने विचार करताना दिसून येतात. कारण, ‘प्राईम टाईम’साठी सिनेमागृहामधील होणारी ओढाताण आता नव्या माध्यमांमुळे मागे फेकली जाणार आहे, यात शंका नाही. कारण, चित्रपटगृहातील मनोरंजनावर अवलंबून असणारी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात निर्मिती संस्थांकडून प्रसिद्धीच्या विविध व्यासपीठांचा अभ्यास करून त्याद्वारे कलाकृती प्रसिद्ध करण्यावर भर दिला जाणार आहे. कारण, प्रसिद्धीची बदललेली माध्यमे हीच निर्मिती प्रक्रियेवर प्रभाव टाकताना दिसतात. त्यामुळे ‘नेटफ्लिक्स’, ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’सारखे कित्येक स्थानिक भाषांमधील ‘ओटीटी’ प्लॅटफार्म्सही प्रेक्षकांच्या भेटीला आले. कारण, सध्या मनोरंजनक्षेत्रातील निर्मितीची पारंपरिक गणितेही प्रसिद्धी माध्यमांच्या व्यापकतेवर अवलंबून आहेत.







 
 
 
 

 
@@AUTHORINFO_V1@@