प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मुलांना नरकयातना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2021   
Total Views |

kamathipura_1  
मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर; मात्र अद्याप उत्तर नाही

देहविक्री करणार्‍या महिलांच्या पाल्यांसाठीचे ‘शेल्टर होम’ बंद
 
मुंबई : कामाठीपुरा भाग तसा मुंबईकरांना परिचित आहे. वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रियांची वस्ती म्हणून कामाठीपुरा ओळखले जाते. या महिलांच्या पाल्यांना रात्रीचा निवारा देण्यासाठी सेवाभावी संस्थांच्या वतीने बांधण्यात आलेले ‘शेल्टर होम’ (निवारा घर) मागील अनेक दिवसांपासून कोरोनामुळे बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोवळ्या वयातील मुला-मुलींना देहविक्री सुरू असणार्‍या घरात रात्री राहावे लागते आहे, ही वस्तुस्थिती आहे.
वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रियांच्या मुलांच्या व्यथांचा विचार कोण करणार? असा सवाल आता निर्माण झाला आहे. त्यामुळे, “या मुलांचे ‘शेल्टर होम’ सुरू करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही महिन्यांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्यापि त्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर आलेले नाही,“ अशी माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.
 
“देहविक्री करणार्‍या महिलांच्या पाल्यांसाठी कामाठीपुरा पॉकलंड रोड येथे काही सेवाभावी संस्था ‘शेल्टर होम’ चालवतात. २०२०-मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे या ‘शेल्टर होम’वर सरकारतर्फे निर्बंध लावण्यात आले आणि पर्यायाने तेव्हा त्या ‘शेल्टर होम’ला टाळे लावण्यात आले. पर्यायाने नाइलाजास्तव ‘शेल्टर होम’मधील मुलांना देहविक्री व्यवसाय असलेल्या वस्तीत वास्तव्यास जावे लागले. काही मुलांना न्हाणीघर किंवा शौचालयात बसून रात्र काढावी लागते. काही मुलं रात्रभर घराबाहेर थांबतात. नशेबाज लोकांची वर्दळ वस्तीत असल्यामुळे मुलांना नशेचे व्यसन लागण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळेत किंवा ‘शेल्टर होम’मध्ये राहिल्यामुळे या वस्तीतील मुली कुणाच्या दृष्टीत पडत नसत.
मात्र, आता या मुलीही आईसोबत घरीच रात्र काढत असल्यामुळे त्यांचेही शोषण होण्याची शक्यता वाढली आहे,“ अशी भीती काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. कोरोना नियमावलीमध्ये शोषितांपेक्षाही शोषित असलेल्या या वस्तीतील निष्पापांचा विचार प्रशासनाने केला असता, तर देहविक्री करणार्‍या महिलांच्या पाल्यांची कोरोनाकाळातली ही दुर्दक्षा झाली नसती, हे वास्तव आहे. त्यामुळे या वस्तीतले आम्हाला रात्रीचा निवारा देणारे ‘शेल्टर होम’ कधी सुरू होतील? आणि आमची दररोजच्या नरकयातनेतून कधी सुटका होईल? असा हृदयद्रावक प्रश्न आता हे चिमुकले विचारू लागले आहेत.


 





@@AUTHORINFO_V1@@