पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ‘वारकरी भक्तीयोग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योग आणि वारकरी परंपरेच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विविध स्तरांतील मान्यवर, पदाधिकारी, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थिती नोंदवली.
२१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. याच दिवशी संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे मुक्कामी आगमन झाल्यामुळे, या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, तसेच पुणे शहर व ग्रामीण भागातील आमदार, पदाधिकारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमात योगासने, वारकरी परंपरेतील अभंग गायन, भजन तसेच मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली होती. सहभागी प्रतिनिधींनी कार्यक्रमानंतर संवाद साधला.
या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे महामंत्री राजेश पांडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमाची रूपरेषा पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने निश्चित करण्यात आली होती.