गरज कार्यशैली बदलाची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2021   
Total Views |

CRPF_1  H x W:
 
 
 
एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ‘सीआरपीएफ’च्या जवानांचे प्राण जात असतील, तर ‘सीआरपीएफ’च्या अधिकाऱ्यांना त्याविषयी जबाबदारीने प्रश्न विचारणे आणि सुधारणा करणे हेदेखील केंद्रीय गृहमंत्रालयाने करण्याची आता गरज आहे. यामध्ये कुठेही ‘सीआरपीएफ’चे जवान अथवा अधिकाऱ्यांच्या शौर्याचा उपमर्द करणे अथवा त्यांच्यावर शंका घेण्याचा उद्देश नाही.
 
 
छत्तीसगढमध्ये नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) २२ जवान हुतात्मा झाले. त्यामुळे साहजिकच देशभरात संतापाची लाट पसरली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. जखमी जवानांसोबत संवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री, पोलीस आणि ‘सीआरपीएफ’च्या उच्चाधिकाऱ्यांशी सविस्तर बैठकीत या घटनेचा आढावाही घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा नक्षलवादाविरोधात केंद्र अथवा राज्य सरकार नरमाईचे धोरण अवलंबणार नाही, अशीही ग्वाही देण्यात आली.
 
 
अर्थात, अशी ग्वाही यापूर्वी अनेकदा आणि अनेक सरकारांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या काही वर्षात छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भागात आतपर्यंत जाण्यास सुरक्षादलांना यश आले आहे, हे महत्त्वाचे आहेच. मात्र, त्याचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षादलाच्या जवानांचे हौतात्म्य हा अतिशय चिंतेचा विषय आहे. आता नक्षलवाद्यांचा हल्ला झाला की सर्वात प्रथम राजकीय धुळवडीला प्रारंभ होतो. कोणी म्हणतात की, निवडणुका आल्यावरच असे हल्ले होतात, कोणी म्हणतो की, हे केंद्र सरकारचे अपयश आहे, मग कोणीतरी राज्य सरकारवर खापर फोडायचा प्रयत्न करतात. मात्र, हे सर्व होत असताना नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या ‘सीआरपीएफ’ आणि अन्य तुकड्यांच्या कार्यशैलीमध्ये बदल करण्याची गरज आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही. तसा प्रश्न कोणी उपस्थित करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर टीका केली जाते. मात्र, हा मुद्दा टीका करण्याचा नाही किंवा सुरक्षादलांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचाही नाही. नक्षलवाद्यांचा खात्मा करताना आपल्या जवानांचे हौतात्म्य होऊ नये, ही साधी इच्छा त्यामागे आहे.
 
 
आता दि. ४ एप्रिल रोजी नेमके काय झाले, ते एकदा समजून घेण्याची गरज आहे. छत्तीसगढमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांचा कुख्यात कमांडर हिडिंबा लपून बसल्याची खबर ‘सीआरपीएफ’ला मिळाली होती. त्याचा खात्मा करण्यासाठी ‘सीआरपीएफ’ आणि अन्य सुरक्षादलांच्या तीन हजार जवानांनी ३ एप्रिल रोजी नियोजनबद्ध पद्धतीने शोधमोहिमेस प्रारंभ केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले आणि ४ एप्रिलला मोहीम संपवून हे जवान पुन्हा आपल्या तळांवर परत येत होते. त्याचवेळी रस्त्यात त्यांच्यावर लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला आणि त्यात २२ जवान हुतात्मा झाले. ३१ जवान जखमी झाले आणि एका जवानास नक्षलवाद्यांनी आपल्यासोबत ओलीस म्हणून नेले. नक्षलवाद्यांनी ‘यू’ आकारात हा हल्ला केला म्हणजेच सुरक्षादलाच्या जवानांना त्यांनी तिन्ही बाजूंनी घेरले होते. आता गेल्या दोन दशकात ‘रेड कॉरिडॉर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागामध्ये सुरक्षादलांवर असे असंख्य हल्ले झाले आहेत. मात्र, त्यातील बहुतांशी हल्ले अशावेळी झाले ज्यावेळी सुरक्षादले मोहिमांवर नव्हते. त्यामुळे तळांवर असे हल्ले करणे तुलनेने नक्षलवाद्यांना सोपे झाले होते.
 
 
आता यासाठी आपल्याला सैन्य सिद्धांताचा विचार करणे आवश्यक आहे. त्या सिद्धांतानुसार सैनिक जेव्हा एखाद्या मोहिमेमध्ये सक्रिय असतात तेव्हा आराम करीत असतानादेखील सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते. सैनिकी नियमानुसार मोहीम क्षेत्रामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना प्रथम तो मार्ग पूर्णपणे सुरक्षित करण्याची काळजी घेतली जाते. त्यासाठी असलेली स्वतंत्र तुकडी अगोदर पुढे जाते. ही तुकडी मार्गात जर काही धोके असतील तर ते प्रथम समाप्त करण्याचे काम करते, जर तो धोका दूर करणे त्या तुकडीस शक्य नसेल तर मुख्य तुकडीस बोलावले जाते आणि त्याचा सामना केला जातो. भारतीय सैन्य अशा प्रकारच्या कार्यशैलीचा अवलंब करते. जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत भारतीय सैन्यालाही दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागतो. अनेक मार्ग तर पाकिस्तानच्या सीमेला अगदी लागून आहेत. मात्र, अशा रस्त्यांना भारतीय सैन्याने सैनिकी तंत्रानुसार सुरक्षित केलेले असते. त्यामुळे तेथे अशाप्रकारे सैन्याच्या तुकड्यांना घेरून दहशतवादी हल्ला करूच शकत नाहीत. आता नक्षलवादाविरोधात लढण्यासाठी भारतीय सैन्याचा वापर केला जाणे शक्य नाही, हे वेळोवेळी राजकीय आणि सैन्य नेतृत्वाने स्पष्ट केले आहे आणि ते योग्यच आहे. मात्र, नक्षलवादाविरोधात लढणाऱ्या ‘सीआरपीएफ’, पोलीस दले आणि अन्य सुरक्षादलांच्या कार्यशैलीचे सखोल विश्लेषण सैनिकी तज्ज्ञांमार्फत करणे आणि त्यात आवश्यक ते बदल घडविणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे.
 
 
आता पुन्हा एकदा ‘सीआरपीएफ’च्या त्या मोहिमेकडे येऊया. ‘सीआरपीएफ’चे डिजी कुलदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेमध्ये ४०० नक्षलवादी असल्याची माहिती होती आणि त्यांचा बिमोड करण्यासाठी दोन हजार जवान पाठविण्यात आले होते. त्याचप्रमाणे ‘सीआरपीएफ’ला ड्रोन आणि अन्य साधनांद्वारे आवश्यक त्या सूचनादेखील वेळोवेळी पोहोचविण्यात येत होत्या. तरीदेखील एवढ्या मोठ्या प्रमाणात जवानांचे हौतात्म्य हा चिंतेचे विषय आहे. याचे एक कारण म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे सैनिकी तंत्राचा अवलंब न करणे हे असू शकते. सैन्याचा एक महत्त्वाचा उद्देश असतो, तो म्हणजे आपले कमीत कमी नुकसान होऊ देणे आणि शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करणे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये राखीव तुकडी ठेवणे. जर बिजापूरमध्येही ‘सीआरपीएफ’ने अशाच प्रकारचे तंत्र वापरले असते तर कदाचित एवढी मोठी जीवितहानी टळली असती.
 
 
छत्तीसगढच्या नक्षलग्रस्त भागाचा अभ्यास असणाऱ्या माजी भारतीय सैन्यातील एक अधिकारी यांनीदेखील तसेच मत व्यक्त केले. त्यांच्या मते, ज्यावेळी सैन्यामध्ये अधिकाऱ्यांची भरती केली जाते, त्यावेळी त्यांचे मनोबल नेमकेपणाने समजून घेण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे सैन्याधिकारी कोणत्याही मोहिमांची आखणी करताना सैन्यतंत्रांचा वापर करतात. त्यामुळे सैन्याच्या मोहिमा या अपयशी होण्याचे अथवा नुकसान होण्याचे प्रमाण हे अतिशय नगण्य असते. त्यामुळेच तशाप्रकारेच ‘सीआरपीएफ’मध्ये नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले अथवा ‘सीआरपीएफ’च्या सध्याच्या तंत्रामध्ये बदल घडविण्यात आले तर अधिक प्रभावीपणे नक्षलवादाविरोधात कारवाई करणे शक्य होणार आहे.
 
 
त्याचप्रमाणे जबाबदारीची निश्चिती होणे अत्यंत गरजेचे आहे.कारण, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ‘सीआरपीएफ’च्या जवानांचे प्राण जात असतील, तर ‘सीआरपीएफ’च्या अधिकाऱ्यांना त्याविषयी जबाबदारीने प्रश्न विचारणे आणि सुधारणा करणे हेदेखील केंद्रीय गृहमंत्रालयाने करण्याची आता गरज आहे. यामध्ये कुठेही ‘सीआरपीएफ’चे जवान अथवा अधिकाऱ्यांच्या शौर्याचा उपमर्द करणे अथवा त्यांच्यावर शंका घेण्याचा उद्देश नाही. मात्र, ‘सीआरपीएफ’च्या नक्षलवादविरोधी कार्यशैलीचे सकारात्मक मूल्यमापन करणे आणि आवश्यक त्या सुधारणा करणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे.
 
 
रक्तपिपासू कवी आणि त्याचे चाहते शांत
 
 
नक्षलवादी हल्ला झाला की, त्याचा निषेध संपूर्ण देश एकसुरात करताना दिसतो. त्यावेळी जात, धर्म, पंथ अथवा राजकीय विचारसरणीस कोणीही महत्त्व देत नाही. मात्र, नक्षलवाद्यांचे समर्थक जे कवी, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, वकील असा बुरखा पांघरून असतात, ते कधीही अशा घटनांचा निषेध करताना आढळत नाहीत. उलट असे काही घडले की, नक्षलवाद्यांना ‘कव्हर फायरिंग’ करण्यात हीच मंडळी आघाडीवर असतात. नक्षलसमर्थक आणि एल्गार परिषद -कोरेगाव-भीमा प्रकरणातील संशयित आरोपी वरवरा याचेच उदाहरण घेऊया. हा व्यक्ती अगदी निर्लज्जपणे नक्षलवाद्याचे समर्थन करीत असतो आणि स्वत:ला कवी वगैरे म्हणवून घेतो. मात्र, त्याची आणि त्याच्यासारख्या अनेकांची खरी ओळख ही ‘रक्तपिपासू’ अशीच आहे. आता गेल्या काही वर्षांत असे शहरी नक्षलसमर्थकही समाजासमोर उघडे पडले आहेत. त्यामुळे सुरक्षादले नक्षलवाद्यांचा बिमोड करतीलच. मात्र, सर्वसामान्य जनतेने या शहरी नक्षलसमर्थकांना वेळोवेळी त्यांची जागा दाखवली पाहिजे.
 
@@AUTHORINFO_V1@@