महसूल हवा असेल, तर सरकारने सवलत देण्याची मागणी
ठाणे: कोरोनाने ठाणे जिल्ह्याला घातलेल्या विळख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे हॉटेल्स, बार अॅण्ड रेस्टॉरंट यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची वार्षिक फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आणि त्याशिवाय बार अॅण्ड रेस्टॉरंट चालविणे शक्य नसल्याने ठाण्यातील सर्वच बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारपासून मद्यविक्री बंद करण्यात येत आहे. सरकारला महसूल हवा असल्यास त्यांनी सवलत द्यावी. असा डोस ‘ठाणे हॉटेल असोसिएशन’च्या वतीने सरकारला देण्यात आला आहे.
सन २०२० हे वर्ष जवळपास कोरोनाच्या सावटाखाली गेले. अनेक महिने हॉटेल्स, बार अॅण्ड रेस्टॉरंट बंद राहिल्याने मद्यविक्री करणार्या हॉटेलमालकांकडे उत्पादन शुल्क विभागाची वार्षिक फी भरण्यासाठी पैसे उरले नाहीत. परवाना नूतनीकरण केल्याशिवाय बार अॅण्ड रेस्टॉरंट बेकायदेशीर चालविणे योग्य नसल्याने ठाण्यातील तब्बल ४१८ हॉटेल, बार अॅण्ड रेस्टॉरंट यांनी शुक्रवार, दि. २ एप्रिलपासून मद्यविक्री बंद करण्याचे ठरवले आहे. उत्पादन शुल्क विभागाची फी सहा लाख ३६ हजार एवढी असून, ती शासनाला महसूलरूपी आगाऊ देण्यात येते. मात्र, परवाना नूतनीकरण करताना तब्बल सात ते साडेसात लाखांचा भुर्दंड बार व रेस्टॉरंटचालकांना पडतो.
दरम्यान, २०२० वर्ष कोरोनात गेल्याने आणि अनेक महिने रेस्टॉरंट बंद राहिल्याने नव्या वर्षाच्या परवाना नूतनीकरणासाठी रेस्टॉरंटमालकांकडे पैसेच राहिले नाहीत. त्यात नव्या आर्थिक वर्षात पुन्हा कोरोनाची घरघर लागल्याने रेस्टॉरंट हे रात्री ८ वाजताच बंद करण्यात येतात. ग्राहक येण्याच्या वेळेसच रेस्टॉरंट बंद करावी लागत असल्याने धंदा होत नाही. त्यात कर्मचारी यांचा पगार, वीजबिल, यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाची शुल्क भरणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे सरकारने एकतर परवाना नूतनीकरण करण्यासाठी भरावा लागणारा महसूल हा टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी असोसिएशनद्वारे करण्यात आली. मात्र, सरकार मागणीला प्रतिसाद देत नसल्याने अखेर ठाण्यातील बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
परवाने नूतनीकरणासाठी तगादा
वर्षभर कोरोनामुळे बार अॅण्ड रेस्टॉरंट बंद आहेत. आता सुरू झाली आहेत, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाने नूतनीकरणासाठी तगादा लावला आहे. हे शुल्क सहा लाखांपेक्षा अधिक आहे. त्यातमध्येच रात्री ८ वाजताच बार अॅण्ड रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश आहेत. जर व्यवसाय झाला नाही तर लाखो रुपये शुल्क भरणार कुठून? सरकारने परवाना नूतनीकरणाची फी तीन टप्प्यांमध्ये भरण्याची सवलत द्यावी म्हणून मद्यविक्री बंद करण्यात आलेली आहे. सरकारला महसूल हवा आहे तर बार अॅण्ड रेस्टॉरंट मालकांना सवलत आणि सुविधा द्यावी.
- शैलेंद्र मोर्य, सदस्य, ठाणे हॉटेल्स असोसिएशन