रहस्य उडणार्‍या सरड्याचे

    26-Apr-2021
Total Views | 227
southern flying lizard _1


पश्चिम घाटामध्ये अधिवास करणार्‍या अनेक दुर्मीळ जीवांपैकी एक जीव म्हणजे उडणारा सरडा. साधारण मध्य आणि दक्षिण पश्चिम घाटामध्ये आढळणार्‍या या सरड्याची नोंद आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातूनही करण्यात आली आहे. जाणून घेऊया या रहस्यमयी उडणार्‍या सरड्याविषयी...


दोडामार्ग (संजय सावंत) -  महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर दोडामार्ग तालुक्यात वसलेले तिलारी धरणाच्या खोर्‍यातील जंगल हे पश्चिम घाटातील ‘अ‍ॅमेझॉन’ म्हणून ओळखले जाते. विविध दुर्मीळ सस्तन प्राण्यांपासून ते दुर्मीळ पशुपक्ष्यांनी संपन्न असलेला तिलारी परिसर हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. सह्याद्रीच्या कुशीतील वाघांचे प्रजनन केंद्र असो वा गजराजाचा अधिवास किंवा ‘मायरिस्टिका स्वॅम्प’ सारखी हजारो वर्षे जुनी गोड्या पाण्यातील परिसंस्था, तिलारी ही महाराष्ट्राच्या सह्याद्रीमधील जैवविविधतेची खाण आहे. ‘तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र’ घोषित झाल्यानंतर पर्यावरण अभ्यासकांना एक नवीन पर्वणीच लाभली. दोडामार्ग तालुक्यातील या जैव खजिन्याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी आणि माहिती संकलनासाठी ‘तिलारी बायो नॅचरल अ‍ॅण्ड कॉन्झर्वेशन टीम’च्या माध्यमातून आम्ही संजय सावंत, तुषार देसाई, विनायक देसाई,अक्षय धाऊसकर,संजय नाटेकर,अनुराग प्रभूसिनारी सतत कार्यरत आहोत.
 
 
 
 
पावसाळ्यातील ‘बायोलुमिनन्ट फंगी’च्या (चकाकणारी बुरशी) अभ्यासानंतर तिचे छायाचित्रणाचे पुरावे आम्ही गोळा केले. आता आम्हाला तिलारी मुख्य धरणाच्या जवळच्या भागात आणि जैवविविधतेची खाण असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील केर या गावात उडणार्‍या सरड्याच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. यापूर्वी या सरड्याची शास्त्रीय नोंद वन्यजीव अभ्यासक अनिष परदेशी आणि छायाचित्रकार मकरंद कुलकर्णी यांनी दोडामार्ग तालुक्यातून केली आहे. हा सरडा सामान्यपणे गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशपर्यंत आढळतो. दोडामार्ग तालुका हा उडणार्‍या सरड्याचे पश्चिम घाटामधील उत्तरेकडील शेवटचे आढळक्षेत्र असण्याची शक्यता आहे. इंग्रजी भाषेत याला ‘फ्लाइंग लिझार्ड’ आणि स्थानिक भाषेत ‘उडणारा सरडा’ असे म्हणतात. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला ‘ड्रेको ड्युस्यूमेरी’ असे म्हटले जाते. त्याचे शरीर करड्या तपकिरी रंगाचे सडपातळ असते. त्याची लांबी आठ ते दहा इंच असते. सरड्याच्या पुढच्या पायापासून मागच्या पायापर्यंत पातळ त्वचेचा पडदा असतो. याच पडद्याच्या आधारे हवेच्या मदतीने चारही पाय रुंद करून एका झाडावरून दुसर्‍या झाडावर स्वसंरक्षणासाठी किंवा भक्ष्य पकडण्यासाठी तो उडी मारू शकतो.
 
 
 
 
‘ड्रेको ड्युस्यूमेरी’ किंवा भारतीय उडणारा सरडा ही ‘अ‍ॅगॅमिड’ सरड्यांची एक प्रजाती आहे, जे एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर उडून जाण्यासाठी सक्षम असतात. ही प्रजात पूर्णपणे झाडावर राहणारी आहे. पुढच्या पायापासून मागच्या पायापर्यंत असलेल्या आपल्या पातळ त्वचेच्या पडद्याचा ते पंखासारखा उपयोग करतात. त्यांच्या शरीराचा रंग हा झाडांच्या खोडांशी मिळताजुळता असल्याने शिकारी जीवांपासून त्यांचा बचाव होतो. उडणारा सरडा हा दिनचर असून प्रामुख्याने कीटकांवर तो अन्नग्रहण करतो. रात्री सहसा सपाट पृष्ठभागावर झोपतो. फेब्रुवारी ते एप्रिल हा या सरड्यांचा प्रजनन हंगाम असतो. या काळात ते आपले छोटे परिक्षेत्र तयार करतात आणि मादीशी मिलन करण्यासाठी उत्सुक असलेल्या इतर नर सरड्यांना त्यापासून दूर ठेवतात. यांचा मिलनाचा कालावधी हा प्रामुख्याने सूर्योदयापासून दुपारपर्यंत असतो. नर आपल्या मानेवरील मोठा पिवळा रंगाचा पडद्यासारखा अवयव उभा करुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात, तसेच शरीराचा रंग चांदीसारखा राखाडी करतो.
 
 
मिलनाच्या कालावधीत नर मादीचा पाठलाग करतो. विविध हालचाली करुन तो मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. संभोगादरम्यान नर मादीच्या शरीरावर चढतो आणि तिची मान पकडून ठेवतो. या संभोगादरम्यान प्रतिस्पर्धी नराने घुसखोरीचा प्रयत्न केल्यास संभोग करणारा नर आपली त्वचा फुगवून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. हे सरडे आपले संपूर्ण आयुष्य झाडावर घालवत असले, तरी यशस्वी मिलनानंतर मादीला अंडी घालण्यासाठी जमिनीवर उतरावे लागते. पावसाळ्याच्या दरम्यान मादी ही मातीमध्ये अंडी घालते. यावेळी ती साधारण चार अंडी घालते, ज्यामधून साधारण 50 दिवसांनंतर पिल्लं बाहेर पडतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे सरडे झाडांवरील कॅनॉपीमध्ये विश्रांती घेतात आणि सायंकाळच्या सुमारास पुन्हा आपल्या दिनचर्येला सुरुवात करतात. या उडणार्‍या सरड्यांचे बरेच शिकारी आहेत. ‘गोल्डन ओरिअल’ आणि ‘ब्लॅक-कॅप्ड किंगफिशर’ हे दोन पक्षी त्यांना खातात. ‘लायन-टेल्ड’ माकड त्यांना खात असल्याची नोंद आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121