मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवड्यावरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. नवाब मलिकांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी असे खुले आव्हानच भाजपाने दिले आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलंय की, नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत. जर नवाब मलिकांकडे याचे पुरावे असतील तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी. सध्याच्या घडीला महाविकास आघाडी सरकारनं दोषारोप करणं थांबवावं आणि कठीण काळात स्वत:चं काम करावं. असा सल्लाच उपाध्ये यांनी ट्विट करत मालिकांना दिला आहे. त्याचसोबत हा राज्य सरकारचा अधिकृत पवित्रा आहे का? तसे असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढे येऊन वस्तुस्थिती स्पष्ट करायला हवी किंवा मंत्र्यांना असे बेजबाबदार आणि निराधार आरोप करण्यास रोखले असेही केशव उपाध्ये म्हणाले.
केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार देत आहेत, असे नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटले आहे. तसेच रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्र शासनानं सांगूनही औषधांचा पुरवठा करण्यात आलेला नाही. केंद्रानं यासंबंधीचे निर्देश दिले असून, महाराष्ट्राला औषधांचा पुरवठा केल्यास तात्काळ कारवाई करु असा इशाराही दिला आहे, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला. केंद्रानं ही काय परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे हा थेट सवाल उपस्थित करत, या औषधांच्या विक्रिला परवानगी द्या नाहीतर महाराष्ट्राच्या भूमीवर असणाऱ्या या औषधांच्याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेत एफडीएच्या मंत्र्यांच्या मदतीने पाऊल उचलत कारवाई करत कंपन्या सील करु आणि औषधांचा जनतेला पुरवठा करु असा थेट इशारा त्यांनी दिला.