ट्रम्पची ‘सोशल’ वापसी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2021   
Total Views |

trump_1  H x W:
 
 
 
यंदाची अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ही अतिशय वादळी ठरली. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत वापसी करणारच, असा विश्वास त्यांच्यासह अनेकांना होता. मात्र, कोरोना संसर्गाने अमेरिकेची, अमेरिकन व्यवस्थेची, अमेरिकन प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. त्याचाही मोठा फटका ट्रम्प यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला. अर्थात, त्यानंतरही ट्रम्प यांनी सत्ता सोडण्यास नकार दिला. त्यानंतर सो कॉल्ड लोकशाहीचे उद्गाते वगैरे म्हणवणाऱ्या अमेरिकेमध्ये चक्क दंगली झाल्या. सुरुवातीला मतमोजणीमध्ये गोंधळ झाला. जवळपास आठेक दिवस त्यातच गेले. मग पराभव दिसू लागल्यावर कथित ट्रम्प समर्थकांनी थेट कॅपिटल हिलवर हल्ला केला आणि अमेरिकन लोकशाहीचा खून पाडला. त्यानंतर मग लोकशाहीचे एकमेव संरक्षणकर्ता असा आव आणणाऱ्या ट्विटर या समाजमाध्यमाने ट्रम्प यांची ट्विटरसह फेसबुक, इन्स्टाग्राम खाती रद्द केली. असे करण्यामागे ट्रम्प यांची लोकशाहीविरोधी वागणूक कारणीभूत असल्याचा जावईशोध लावला गेला. मात्र, त्याचे खरे कारण वेगळेच असल्याचा संशय आहे. कारण ट्रम्प यांनी जरी राडा घातला असला तरीदेखील अमेरिकेतील एक मोठा वर्ग त्यांच्यामागे आहे. त्यातही जनभावना कशी ओळखायची आणि जनमत आपल्या बाजूने कसे वळवून घ्यायचे, त्यांच्या भावनांना कसा हात घालायचा, हे त्यांना चांगलेच अवगत आहे. त्यामुळे भविष्यात ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या मार्गातील अडथळा बनणार हे अमेरिकन लिबरल झुंडीला माहिती होते. त्यामुळे त्यांना सोशल मीडियातून काढून टाकणे आणि पारंपरिक मीडियामधून बहिष्कार टाकण्याचे प्रकार करण्यात आले.
 
 
मात्र, हे सर्व करत असताना ट्रम्प शांत बसतील असे लिबरल झुंडीला वाटले. मात्र, पैशांच्या राशीत अक्षरश: लोळणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. ट्रम्प यांचे राजकीय सल्लागार जेसन मिलर यांनी अमेरिकेतील ‘फॉक्स न्यूज’सोबत नुकताच संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी येत्या दोन ते तीन महिन्यांत डोनाल्ड ट्रम्प हे ‘सोशल मीडिया’त पुनरागमन करीत असल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यासाठी ट्रम्प हे स्वत:चा ‘सोशल प्लॅटफॉर्म’ काढणार असून त्यामध्ये अल्पावधीतच लाखो फॉलोअर्स जोडले जाणार असल्याचाही विश्वास मिलर यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे ट्रम्प यांची लोकप्रियता अमाप आहे, ट्रम्प सध्या काय करतात आणि त्यांची पुढील रणनीती काय असेल हे जाणून घेण्यासाठी अमेरिकी जनता अतिशय उत्सुक आहे. त्यामुळे अमेरिकेत लवकरच नवे युग सुरू होणार असल्याचेही सूतोवाच यानिमित्ताने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अनेक ‘सोशल मीडिया’ कंपन्यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाविषयी उत्सुकता दाखविली असून अनेकांनी त्यांच्याशी संपर्कही साधला आहे. कारण ट्रम्प यांच्यामुळे कदाचित फारशा प्रसिद्ध नसलेल्या कंपन्यांना लोकप्रियतेची लॉटरी लागू शकते. अर्थात, अतिशय चतुर व्यावसायिक असलेले ट्रम्प पूर्वतयारी केल्याशिवाय या नव्या मार्केटमध्ये उतरणार नाहीत. कारण, हा निर्णय चुकला तर होणाऱ्या व्यावसायिक नुकसानापेक्षा राजकीय नुकसान हे कधीही भरून न येणारे असेल. त्यामुळे ट्रम्प सध्या अतिशय सावधानतेने पावले टाकत आहेत. अर्थात, याकडे प्रस्थापित ‘सोशल मीडिया’ कंपन्या-फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूब हेही लक्ष ठेवून आहेतच.
 
 
मात्र, ट्रम्प यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण जगभरात त्याचे पडसाद उमटतीलच. मात्र, अमेरिकेसाठी तो एक क्रांतिकारी प्रयोग असेल. कारण लिबरल झुंडीला शह देण्याचे राजकारण ट्रम्प त्याद्वारे करणार आहेत. त्यासोबतच लिबरल झुंडीच्या दबावाखाली काम करणाऱ्या पारंपरिक माध्यमांनाही आपल्या धोरणांविषयी त्यामुळे नव्याने मांडणी करावी लागू शकते. कारण फेसबुक, ट्विटरसारखे प्रस्थापित मीडिया कशाप्रकारची मनमानी करतात, याविषयी आता भारतासह जगातील देशांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. कारण, ही प्रस्थापित समाजमाध्यमे आता त्या त्या देशातील राजकीय आणि सामाजिक विश्वामध्ये खुलेआम ढवळाढवळ करायला लागली आहेत. त्यामुळे त्यांना रोखणे आणि त्यांच्या मर्यादांची जाणीव करून देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा नवा प्रयोग यशस्वी होतो की कसे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@