डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, अग्निशामक दलाचे कर्मचारी संमेलनस्थळी असणार कार्यरत
नाशिक: नाशिक येथे दि. २६ ते २८ मार्च दरम्यान ९४ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ संपन्न होणार आहे. यासाठी नाशिक महानगरपालिका सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी सांगितले. आज संमेलनाच्या कार्यालयात आयडिया वस्तू विशारद विद्यालयाच्या विद्यार्थी यांनी आर्किटेक दिनेश जातेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या रचना आराखड्याचे दूरदृश्य माध्यमाद्वारे सादरीकरण दिले.
यावेळी नोडल अधिकारी मुंडावरे यांनी सांगितलेले की, दि. २३ मार्च रोजी सर्व यंत्रणा कार्यरत होतील. त्याचे प्रात्यक्षिक घेतले जाईल, तसेच डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, अग्निशामक दलाचे कर्मचारी तीन दिवस २४ तास उपलब्ध असतील. हॉस्पिटलमध्ये पाच बेड राखीव ठेवण्यात येतील. हे संमेलन निर्विघ्न संपन्न पार पडेल, यासाठी सर्व काळजी घेतली जाईल. सुरुवातीस जयप्रकाश जातेगावकर यांनी स्वागत केले आणि शेवटी आभार व्यक्त केले.
यंदाच्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून छगन भुजबळ यांनी अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांना औपचारिक आमंत्रण दिले आहे. पहिल्यांदाच एका वैज्ञानिक साहित्यिकाला ही अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळत असल्याने अनेकांचं या संमेलनाकडे लक्ष लागलेले आहे.