कोरोना महामारीचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही. परिस्थिती नियंत्रणात असली, तरी अद्यापही समाजजीवन पूर्वीसारखे १०० टक्के पूर्ववत झालेले नाही. अशा परिस्थितीत दि. १५ जानेवारीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान सुरू झाले. या अभियानाबद्दल सांगण्यापुरते हे निधी संकलन अभियान असले, तरी प्रत्यक्षात मात्र ते श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्राचा व्यापक विषय समाजात रुजवण्यासाठीचे जनसंपर्क अभियान होते. श्रीराम मंदिराचा विषय समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून, सकल समाजाला या विषयाशी जोडून, समाजाच्या योगदानातून निर्माण होणार्या श्रीराम मंदिराचे निमित्त साधून ’राम मंदिर ते राष्ट्र मंदिर’ या संकल्पनेचे समाजमनात बीजारोपण करणे, हा त्यामागचा मुख्य हेतू होता. त्यामुळे या निधी समर्पण अभियानाच्या अनुभवावरून श्रीराम मंदिराचे आर्थिक, सामाजिक, राजकीय समीकरण मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न!
गेल्या वर्षी साधारण मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे देशाची आर्थिक घडी विस्कळीत झालेली आहे. या महामारीमुळे अनेकांचे उद्योगधंदे बसले, नोकर्या गेल्या, तर काहींना अद्याप आपल्या कामावर रुजू होता आलेले नाही. अशा चिंताजनक परिस्थितीत श्रीराम मंदिराचे निधी संकलन अभियान सुरू झाले! खरंतर भारतीय समाजाचा चिवटपणा, संघर्ष करण्याची वृत्ती आणि ईश्वराप्रति असलेला श्रद्धाभाव चाचपडून बघण्यासाठी, अनुभवण्यासाठीची ही एक संधीच होती. त्यामुळे या निधी समर्पण अभियानासाठी हाच सर्वोत्तम कालावधी होता, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. आपण वर्षानुवर्षे भारताच्या गौरवशाली इतिहासाबद्दल बोलत-ऐकत आलेलो आहोत. त्यातील प्रसंग आपल्याला वेळोवेळी प्रेरणा देतात.
श्रीराम मंदिर पुनर्निर्माण हा ४७० वर्षांचा संघर्षमय इतिहास असलेला, हिंदू समाजासाठीचा अत्यंत महत्त्वाचा असा व्यापक विषय आहे. त्यामुळे भारतभरामध्ये या मंदिराच्या निर्माणासाठी सुरू असलेल्या निधी समर्पण अभियानालादेखील भविष्यात ऐतिहासिक घटना म्हणून पाहिले जाईल. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमी इतिहासाचे स्मरण केल्याने आपल्याला ज्याप्रमाणे प्रेरणा मिळते अगदी त्याचप्रकारचा प्रेरणादायी असा भारताचा गौरवशाली वर्तमान आहे, याची प्रचिती या अभियानाच्या निमित्ताने रामसेवकांना आली. देश कोरोना महामारीचा सामना करत असताना, या संकटकाळीदेखील भारतीय समाजात टिकून असलेला आत्मविश्वास, परिस्थितीवर मात करण्यासाठी संघर्ष करण्याची मानसिकता, श्रद्धाभाव जपून सांभाळलेली कर्मप्रधानता हे सर्व विलक्षण गुण आजही भारतीय समाजात टिकून आहेत.
भारतीय समाजाच्या याच स्वभावामुळे असंख्य परकीय आक्रमणांना पचवून, प्रवाहाबरोबर वाहत न जाता स्वतःची मूळ ओळख कायम ठेवून, परकीयांना आपलेसे करून, त्यांना आपल्या रंगात रंगवून, आपला मूळ स्वभाव टिकवून आजही आपले राष्ट्र जगासमोर ताठ मानेने उभे आहे. त्यामुळे राष्ट्र विरोधी शक्तींनी, समाजाची एकात्मता भंग करण्यासाठी समाजात तेढ निर्माण करण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी अशा चिवट भारतीय समाजाचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही! हा या अभियानाच्या निमित्ताने झालेला साक्षात्कार, देशाची अखंडता टिकवून ठेवण्यासाठीचा विश्वास मजबूत करण्यास पुरेसा आहे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय समाजाची आर्थिक स्थिती गडबडलेली असताना, अशा विपरीत परिस्थितीत श्रीराम मंदिर निधी संकल अभियान सुरू झाल्यामुळे या अभियानाला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. विपरीत परिस्थितीत सुरू झालेल्या या अभियानास समाजातील प्रत्येक स्तरांतून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानात ज्यांनी घरोघरी जाऊन श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण गोळा केले, अशा रामसेवकांचे या अभियानातील प्रेरणादायी अनुभव हे विलक्षण थक्क करणारे आहेत. ज्यांच्या घरी उद्या चूल पेटेल की नाही? याची भ्रांत असणार्या कुटुंबापासून ते मनात अधिक देण्याची इच्छा असूनसुद्धा ’बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे श्रीराम मंदिरासाठी मनोच्छित निधी समर्पण करता आले नाही’ ही व्यक्त झालेली भावना समाजाची श्रीरामाविषयीची आस्था, किती दृढ आहे, हे स्पष्ट करण्यास पुरेसी आहे.
’श्रीराम जन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भव्य अशा मंदिर निर्माणाचे कार्य सुरू झालेले आहे. हे मंदिर सरकारच्या पैशातून नव्हे तर समस्त रामभक्तांच्या समर्पणातूनच निर्माण होणार आहे!’ हा विषय या अभियानायामुळे भारतभरात पोहोचला. या मंदिर निर्माण कार्यासाठीच्या निधी संकलनात भाषा, प्रांत, जातपात किंबहुना धर्मदेखील आडवे आले नाही. या निधी संकलन कार्यात रामसेवकांना आलेल्या छोट्या-मोठ्या समस्या, देशात काही ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटना या सर्वांमुळे मन विचलित होण्यासारखी स्थिती निर्माण झाली असली, तरी एकंदरीत या अभियानाला देशभरातून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाकडे पाहता अभियानातील सकारात्मकता आणि उत्साह निश्चितपणे शेवटपर्यंत टिकून राहील. अर्थात, समस्यांचा बाऊ न करत बसता समस्यांमधून मार्ग काढत आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्यक ती मनाची तयारी असल्याशिवाय महिनाभर राम सेवकांची भूमिका पार पाडणे शक्य नव्हते. खरंतर रामसेवकांनी हाती घेतलेल्या कार्याचा इतिहास, त्यासाठीचा आजवरचा संघर्ष हीच त्यामागची मूळ प्रेरणा होती.
श्रीराम मंदिर निर्माणास लागणारा पुरेसा निधी श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाकडे जमा नसताना, श्रीराम मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमाचा शुभारंभ साधू-संतांच्या उपस्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होऊन मंदिर निर्माण कार्यास प्रारंभ झाला. त्यामागचे मूळ कारण म्हणजे श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी कितीही निधीची आवश्यकता भासली, तरी तो रामभक्तांमार्फत निश्चितपणे जमा होत राहणार, हा विश्वास सुरुवातीपासूनच न्यासाला होता. निधी समर्पण अभियानाच्या सुरुवातीलाच देशभरातून दरदिवशी जमा होणार्या निधीकडे पाहून विरोधकांचे डोळे पिवळे होण्याची वेळ आली आहे. देशात कोरोनाचे सावट असूनसुद्धा या अभियानामुळे महिनाभराच्या कालावधीतच मंदिरासाठी लागणार्या अपेक्षित निधीपेक्षा अधिक निधी जमा झाल्यामुळे, हिंदू समाजात फूट पडणार्या राष्ट्रविरोधी गटाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य अगदी प्रारंभिक अवस्थेत असतानाच देशभरात श्रीरामाच्या नावाने चैतन्याची लाट पसरली आहे. हे मंदिर बांधून पूर्ण होईपर्यंत फक्त देशभरातच नव्हे, तर जगभरात श्रीरामाच्या नावाचा डंका वाजू लागेल. भारतीय संस्कृतीचे, हिंदू अस्मितेचे मानबिंदू मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे अयोध्येतील भव्य दिव्य मंदिर ही भारताची नवी ओळख असणार आहे. त्याअनुषंगाने भविष्यातील भारताच्या पुढील वाटचालीमध्ये हिंदुत्वाचे राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टींना विशेष महत्त्व असणार आहे, याचा अंदाज आजच्या घडीला सहज कोणालाही बांधता येण्यासारखा आहे. श्रीरामाच्या नावानेच देशभरात निर्माण झालेल्या नवचैतन्याने भारलेल्या भारतामध्ये हळूहळू होऊ लागलेले हिंदुत्वाचे जागरण शतकानुशतके टिकून राहणारे आहे, असा विश्वास या अभियानाच्या निमित्ताने पक्का झालेला आहे. असो. ही तर पुनरुत्थानाची सुरुवात आहे फक्त. जय श्रीराम!
- अॅड.प्रसाद शिर्के