मालाडमधील 'एमटीडीसी'च्या कांदळवन आच्छादित जमिनीवर भराव
मुंबई (प्रतिनिधी) - मालाड पश्चिमेकडील एरंगळ आणि भाटी गावामधील कांदळवनांवर राजरोजपणे भराव टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील कांदळवनांचे जंगल संकटात सापडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही जागा 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा'च्या (एमटीडीसी) ताब्यात आहे.
मुंबई महानगर परिक्षेत्रातील कांदळवनांमध्ये दिवसागणिक अतिक्रमण वाढते आहे. ही बाब लक्षात घेऊन आता वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या मालकीच्या कांदळवन आच्छादित जमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत पश्चिम उपनगरामधील मढ परिसरातील कांदळवने संकाटात सापडली आहेत. याठिकाणी एरंगळ आणि भाटी गावामधील कांदळवनांवर भराव टाकण्याचे काम सुरू आहे. एरगंळमध्ये कांदळवन जमिनींवर मातीचा भराव टाकल्याने येथील सोनचिप्पी प्रजातीची झाडे भरावाखाली आली आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही जमीन 'एमटीडीसी'च्या ताब्यातील असून विभागाकडूनच हा भराव सुरू आहे.
दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सप्टेंबर महिन्यात कांदळवन संवर्धनासंदर्भात 'एमटीडीसी' आणि वन विभागाची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये गोराई, मनोरी आणि त्या परिसरातील 'एमटीडीसी'च्या मालकीच्या कांदळवन आच्छादित जमिनी 'कांदळवन कक्षा'च्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला होता. 'एमटीडीसी'च्या संचालक मंडळाच्या बैठकीतील अंतिम परवानगीनंतर या परिसरातील एकूण ५०० एकर जमीन 'कांदळवन कक्षा'च्या ताब्यात देण्यात येणार होती. मात्र, त्याबाबत अजून काही निर्णय झालेला नाही. शिवाय, ठाकरे यांनी कांदळवनांवर भराव टाकणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. असे असताना एरंगळ आणि भाटे गावातील कांदळवनांवर आपल्या विभागाकडूनच सुरू असलेल्या भरावावर ठाकरेंकडून कारवाई होणार का ? हे पाहावे लागेल.