इतरांना प्रेरणा देणारे प्रतिभाग्रज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2021   
Total Views |

Manasa 2.jpg_1
वयाच्या ७१ व्या वर्षीदेखील प्रतिभाग्रज रवी पाटील आनंदी जीवन जगत आहेत. तसेच इतरांनाही आनंदी जीवन जगण्यासाठी प्रबोधनार्थ एक आध्यात्मिक संघटन स्थापन करून जागृती अभियान चालवित आहेत. इतरांना आनंदी जीवन जगण्यासाठी अभियान चालविणार्‍या रवी यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया.


रवी पाटील यांचा जन्म दि. ९ ऑक्टोबर, १९५१ रोजी संतकृपेने भरलेल्या खानदेशच्या पवित्र भूमीत विजयादशमीच्या दिवशी एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सोनू पाटील सुसरीकर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध वारकरी शेतकरी पण सुविद्य मार्गदर्शक होते. रवी यांचे संस्कृत व इंग्रजी या विषयावर प्रभुत्व होते. रवी पाटील यांना त्यांच्या वडिलांकडून आपुसकच सुसंस्कृतपणा व समाजसेवेचा वारसा लाभला. त्यांना वडिलांचे गुरूतुल्य मार्गदर्शनसुद्धा लाभले. आईवडिलांच्या प्रेमवर्षावात गुणग्राहकतेने त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे बहीण-भावांचे प्रेमदेखील त्यांना मिळाले. रवी यांचे एम. एस्सीपर्यंत शिक्षण झाले. त्यांचे मूळ गाव जळगावमधील भुसावळ तालुक्यातील सुसरी हे आहे. रवी यांचे शालेय शिक्षण महात्मा गांधी विद्यालय येथून झाले. त्यानंतर खानदेशमधून पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. कीर्ती महाविद्यालयातून त्यांनी बी. एस्सीपर्यंत शिक्षण घेतले. पदवी मिळाल्यानंतर ते फार्मा कंपनीत काम करू लागले. त्याकाळात अनेक नोकरीच्या संधी त्यांच्याकडे चालून येत होत्या. शिक्षण घेत असतानाच ते शिकवणीदेखील घेत होते. त्यामुळे शिक्षक म्हणूनही त्यांना अनेक संधी चालून आल्या होत्या. त्याकाळात शिक्षकांना फारसे वेतन मिळत नव्हते आणि रवी यांना फार्मामध्ये आवड असल्याने त्यांनी त्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. फार्मा कंपनीत काम करीत असतानाच कागदावरील बी. एस्सीची पदवी त्यांच्या प्रगतीत अडथळा ठरणारे होते. त्यामुळे त्यांनी वयाच्या ४६व्या वर्षी एम. एस्सीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. जळगाव येथील बहिणाबाई चौधरी विद्यापीठ म्हणजेच पूर्वीचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. ते सध्या डोंबिवलीतील श्रीखंडेवाडीत राहतात.


रवी पाटील यांना आध्यात्मिक वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. त्यामुळे त्यांना ‘खानदेशभूषण’, ‘महाराष्ट्रभूषण’ हभप वै. जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांचा अनुग्रह आळंदी येथे २००५ ला मिळाला. त्यानंतर कीर्तन, प्रवचन, भजन, प्रबोधन, मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. सोबतच त्यांचे जागृती अभियानदेखील सुरू आहे. तसेच ते संत वाङ्मयांचा अभ्यास करीत असून ते कविता लेखनदेखील करीत आहेत. नित्याचे जीवन जगत असताना संतकृपेने ईश्वराची अनुभूती घेत ‘सारे विश्वची माझे घर!’ या माऊलींच्या उक्तीला जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करीत ते आध्यात्मिक समाजसेवा करीत आहेत. त्यांचे ‘अंतरी लावू ज्ञानदीप’ हे ब्रीदवाक्य आहे. ‘एकी हेच बळ आहे’ असे ते मानतात. कोणतेही काम एकत्र येऊन केले तर ते पटकन होते आणि त्यांचे ध्येय हे ‘भीमाजरून वल्लभ शिवाजी आदिशक्ती घरोघरी, घडविण्या करूनी प्रबोधन सच्चे आनंद निर्मू भूवरी’ हे आहे. त्यांचे कीर्तनाचे अनेक कार्यक्रम डोंबिवलीसह उर्वरित महाराष्ट्रातसुद्धा झाले आहेत.

 
रवी पाटील यांनी २००४ ला मुक्ताई सेवा साहाय्यक संघ, डोंबिवली या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. त्यांचे काम डोंबिवली तसेच संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. रवी यांनी आजवर ३०० हून अधिक कविता लिहिल्या आहेत. त्यामध्ये १२५ भक्तिगीतांचा समावेश आहे. हृदयस्पर्शी आणि प्रबोधनपर १०० हून अधिक गीते आहेत. समाजगीते आणि जागृतीपर ५० गीतांचा समावेश आहे. बहिणाबाईंवर पाच गीते व कविता त्यांनी केल्या आहेत. प्रेमगीतांवर आधारित २० गीते तसेच लेवा गणबोलीत कविता, पोवाडा गीते २५ च्या वर त्यांनी लिहिली आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर पाच पोवाड्यांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांचे जागृतीपर अनेक लेख मासिकातून प्रसिद्ध झाले आहे. त्यांची दोन नाटके ग्रामीण भागातदेखील सादर करण्यात आली आहेत. रवी यांचे ‘प्रतिभाग्रज’ या टोपण नावाने लिखाण सुरू आहे.


रवी पाटील यांनी ९०व्या भारतीय साहित्य संमेलनाच्या चित्ररथामध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी बहिणाबाईंची थीम चित्ररथासाठी वापरण्यात आली होती. २०१९ साली त्यांनी पहिल्या लेवा गणबोली साहित्य संमेलनात नाट्यछटा व समाजगीते सादर केली होती. २०२१ साली दुसर्‍या लेवा गणबोली साहित्य संमेलनात नाट्यछटा सादर करून प्रबोधन केले. अखंड १२१ तास कवीसंमेलनामध्ये कविता सादर करण्यासाठी त्यांची ‘डायमंड बुक ऑफ रेकार्ड’मध्ये नोंद झालेली आहे. ‘भ्रष्टाचार निर्मूलन काळाची गरज’ या निबंधावर राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ‘बहिणाबाईंची गाणी जीवनाचे तरंग’ या विषयावर वक्तृत्त्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक रवी पाटील यांनी प्राप्त केले आहे. तसेच इतरही क्रमांकाची विविध पारितोषिके दरवर्षी ते पटकावित असतात. अशा प्रकारची आध्यात्मिक आणि सामाजिक ईश्वरसेवा शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार असल्याचा संकल्प रवी पाटील यांनी व्यक्त केला आहे. बहुगुणी अशा या कलावंताला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...!



@@AUTHORINFO_V1@@