भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या रांगोळीसाठी झटणार्या आणि आता एक कसलेल्या रांगोळी कलाकार अशीच ओळख प्रस्थापित झालेल्या मिताली मिलिंद सुर्वे यांच्याविषयी...
कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या मिताली मिलिंद सुर्वे सध्या सोशल मीडियावर बर्याच चर्चेतआहेत. त्याचे कारण म्हणजे, चित्रकलेचे किंवा रांगोळीचे कुठलेही शास्त्रशुद्ध धडे न घेता, त्यांनी सादर केलेला अद्भुत कलाविष्कार...
कोल्हापूरमधील ‘एमएलजी गर्ल्स हायस्कूल’मध्ये मिताली यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. यादरम्यान आईला रांगोळी काढताना त्या मदत तर करायच्याच, शिवाय इतरही कुणी रांगोळी काढत असेल, तर त्याचे अगदी बारकाईने निरीक्षण करायच्या. पर्यावरणशास्त्रातून ‘एमएससी’चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्राथमिक शिक्षिकेची एक वर्ष नोकरी केली. त्यातच कोल्हापूरमध्ये विमानतळ सुरू झाले आणि अनेक पदांची भरती निघाली. यावेळी मुलाखत दिल्यानंतर त्या विमानतळावर ‘ग्राऊंड स्टाफ’ म्हणून रूजू झाल्या. २००४ साली विमानतळावर एका कार्यक्रमानिमित्त रेखाटलेल्या रांगोळीला अभिनेते मोहनीश बहल आणि त्यांच्या पत्नीनेही कौतुकाची दाद दिली. लग्नानंतर मात्र मिताली यांनी नोकरी सोडली. एक छंद म्हणून त्या दारात रांगोळी काढत. एकदा सोसायटीतील लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ‘गालिचा’ प्रकारातील रांगोळी रेखाटली, ज्याला सोसायटीकडून बक्षीसदेखील प्राप्त झाले.
कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ लागला आणि मिताली यांचा रांगोळीचा छंद अधिकच बहरत गेला. फेसबुकवरील अर्चना शिंदे यांनी नाण्यांच्या साहाय्याने काढलेली रांगोळी ‘व्हायरल’ झाली होती. त्यावेळी मिताली यांच्या मैत्रिणींनी त्यांना याविषयी कल्पना दिली. नाण्यांच्या साहाय्याने तिरूपती बालाजीची काढलेली ती रांगोळी मिताली यांना प्रचंड भावली आणि त्याचक्षणी त्यांनीही भव्यदिव्य रांगोळी रेखाटण्याची इच्छा व्यक्त केली. मिताली यांनी लागलीच शिंदे यांच्याशी संपर्क साधून रांगोळीविषयीची सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी भव्यदिव्य रांगोळ्या काढण्यास सुरूवात केली. गुढीपाडव्याच्या दिवशी पैठणी साडीची, नवरात्रीत महालक्ष्मीची रांगोळी त्यांनी चितारली. विशेष म्हणजे, प्रत्येक दिवशी त्यांनी रांगोळीतील देवीच्या साडीचा रंगही बदलला. सोसायटीतील अनेक अयप्पा भक्तांच्या आग्रहास्तव काढलेल्या भगवान अयप्पांची रांगोळी नंतर सोसायटीच्या मासिकाचा ‘कव्हर फोटो’ म्हणून छापूनही आली. गणेशजयंतीच्या मुहूर्तावर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या रांगोळीचा फोटो ट्रस्टच्या फेसबुक पेजवरही ‘व्हायरल’ झाला आणि खुद्द ट्रस्टच्या सचिवांनी फोन करून मिताली यांचे कौतुक केले. पुढे नवी मुंबई मनपाच्या रांगोळी स्पर्धेत ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावरील रांगोळी रेखाटत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. दरम्यान, या काळात त्यांच्या वडिलांना अगदी शेवटच्या टप्प्यातील कॅन्सरचे निदान झाले. त्यावेळी “मी जिवंत आहे, तोपर्यंत तुझी कला बघू दे,” असे वडिलांनी मिताली यांना सांगितले. खास वडिलांच्या आग्रहास्तव त्यांनी स्वामी समर्थ आणि आई तुळजाभवानीची रांगोळी रेखाटली. त्या व्हिडिओ कॉल करत वडिलांना रांगोळी दाखवत. याचकाळात मयुर शेळके या युवकाने एका अंध मुलाला रेल्वेखाली येण्यापासून वाचवले. त्यावेळी त्याच्या कार्याला सलाम म्हणून मिताली यांनी काढलेली रांगोळी पाहायला स्वतः मयुर मिताली यांच्या घरी आला. यावेळी त्याला रांगोळी पाहून भावनाही अनावर झाल्या.
दरम्यान, वडिलांच्या निधनाने मिताली यांना मोठा धक्का बसला. नंतर काही काळ त्यांनी हे काम थांबवले. काही दिवसांनंतर सोसायटीतील गुजराती बांधवांच्या आग्रहास्तव भगवान श्रीनाथांची रांगोळी रेखाटली. आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांनी विठ्ठलाची सुबक रांगोळी काढली, जी नंतर प्रचंड ‘व्हायरल’ झाली. त्याचदरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडूनही रांगोळी काढण्यासाठी त्यांना विचारणा झाली. मिताली यांनी होकार देत मंदिरात रांगोळी काढली, यावेळी त्यांचा मंदिर समितीतर्फे सत्कारही करण्यात आला. लालबागच्या राजाची रांगोळी ‘व्हायरल’ झाल्यानंतर गणेशमूर्तीचे मूर्तिकार संतोष कांबळी यांनी मिताली यांच्या घरी भेट देत त्यांचे कौतुकही केले. नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावल्यानंतर त्याला सलामी म्हणून दोघा सहकार्यांच्या मदतीने त्यांनी रांगोळी रेखाटली होती.
महान रांगोळी कलाकार महादेव गोपाळे आणि श्रीहरी पवळे यांनीही मिताली यांच्या कलाकारीचे कौतुक केले आहे. यापुढील सर्व रांगोळ्या मिताली आई-वडिलांना समर्पित करणार असून पती मिलिंद यांचाही त्यांना याकामी भक्कम पाठिंबा आहेच.“रांगोळी काढल्यानंतर अनेकांना अक्षरशः माझ्यासमोरच रडू कोसळले. तसेच तुमच्या रांगोळीमुळे आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले, अशा शब्दांत लोकं माझ्या रांगोळीचे कौतुक करतात. म्हणूनच या रांगोळीतून मला आदर, सन्मान प्राप्त झाला. माझ्यासाठी कौतुकाचे बोल हीच माझ्या कामाची खरी पोचपावती आहे” असे सांगत रांगोळी ही एक तपस्या आहे, त्यासाठी सराव अतिशय महत्त्वाचा असल्याचेही मिताली प्रकर्षाने अधोरेखित करतात. दारात रांगोळी असेल, तर मन प्रसन्न होते. रांगोळी ही आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यामुळे ही कला जोपासणे गरजेचे असल्याचेही मिताली सांगतात. त्यांना या कार्यात रोशन पाटील, अक्षय शहापूरकर यांचेही सहकार्य लाभते. रांगोळी रेखाटण्याचा छंद जपत आपल्यासह इतरांच्याही आयुष्यात रंग भरणार्या मिताली सुर्वे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!
पवन बोरस्ते