मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल जल्लोष साजरा होत असताना त्यात काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट सामील झाले नाहीत. हेच तुमचे छत्रपती शिवरायांवरचे प्रेम आहे का? असा सवाल आमदार राम कदम यांनी केला आहे.
सोमवार, १४ जुलै रोजी सत्ताधारी आमदारांनी विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत जल्लोष साजरा केला. यावेळी विरोधी पक्षातील आमदार सहभागी झाले नाही. यावरून राम कदम यांनी त्यांना खडेबोलसुनावले.
माध्यमांशी संवाद साधताना राम कदम म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला, ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. या घटनेचा जल्लोष साजरा होत असताना त्यात काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट सामील होत नाही. हेच तुमचे छत्रपती शिवरायांवरचे प्रेम आहे का? आम्ही पायऱ्यांवर जल्लोष करत असताना त्यात विरोधी पक्ष सामील झाला नाही. यावरून त्यांचे महाराजांवरील प्रेम स्पष्ट होते."
"आरोप प्रत्यारोप करण्यासाठी अनेक मुद्दे मिळतील. परंतू, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एक आहेत, हा संदेश जाणे गरजेचे होते. पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी ते केले नाही," असे ते म्हणाले.
रोहित पवार लाडक्या बहिणींनाभ्रमित करू पाहतात!
"रोहित पवार हे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनाभ्रमित करू पाहत आहेत. जोपर्यंत आमचे सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. भविष्यात आणखी पैसे वाढवून देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. पण रोहित पवार आणि कंपनी लाडक्या बहिणींना सतत गृहीत धरतात. कुणाचेही पैसे बंद होणार नाहीत. रोहित पवार आणि उबाठा कंपनी लाडक्या बहिणींच्या मनात भ्रम पसरवत आहे. हीच ती वेळ आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना चांगला हिसका दाखवा," असेही राम कदम म्हणाले.