मनाच्या श्लोकांची वर्गवारी

    16-Dec-2021
Total Views | 381
ramdas swami.jpg_1 &



मनाच्या श्लोकांची पार्श्वभूमी, त्यातील आशय, श्लोकांचे तत्कालीन समाजावर झालेले इष्ट परिणाम, आजच्या संदर्भात मनाच्या श्लोकांची उपयुक्तता, त्यांचे वैयक्तिक, सामाजिक फायदे, त्यांनी मानवी जीवनाच्या विकासाला लावलेला हातभार इत्यादी अनेक दृष्टीने विचारात घेऊन मनाच्या श्लोकांचा अभ्यास करता येतो. थोडक्यात, मनाच्या श्लोकांच्या अंतरंगाचा शोध घेतल्याशिवाय खरा अभ्यास होत नाही.
 
 
आजची तरुणपिढी समर्थांच्या मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाकडे वळली आहे, हे सर्वार्थाने योग्यच म्हणावे लागेल. तथापि, त्यातील कठीण व अपरिचित शब्दांचे अर्थ शोधणे, ओळींचा अन्वयार्थ लावणे किंवा अभ्यासासाठी नेमलेल्या पुस्तकातील प्रश्नांची उत्तरे लिहिणे, एवढ्याने मनाच्या श्लोकांचा अभ्यास पूर्ण झाला, असे होत नाही. कुठल्याही वाड्.मयीन कृतीचा अभ्यास ही मनन-चिंतनाने ज्ञान आत्मसात करण्याची प्रक्रिया आहे. त्यासाठी मनाच्या श्लोकांची पार्श्वभूमी, त्यातील आशय, श्लोकांचे तत्कालीन समाजावर झालेले इष्ट परिणाम, आजच्या संदर्भात मनाच्या श्लोकांची उपयुक्तता, त्यांचे वैयक्तिक, सामाजिक फायदे, त्यांनी मानवी जीवनाच्या विकासाला लावलेला हातभार इत्यादी अनेक दृष्टीने विचारात घेऊन मनाच्या श्लोकांचा अभ्यास करता येतो. थोडक्यात, मनाच्या श्लोकांच्या अंतरंगाचा शोध घेतल्याशिवाय खरा अभ्यास होत नाही. अर्थात, मनाचे श्लोक नीट समजून त्यातील भावार्थाचा, प्रसंगी गूढार्थाचा बोध होणे, ही त्यांचा अभ्यास करण्याची पहिली पायरी होय. तसेच मनाच्या श्लोकांचे महत्त्व मनावर बिंबल्याशिवाय खर्‍या अभ्यासाची प्रेरणा मिळत नाही.




मनाच्या श्लोकांची रचना ‘भुजंगप्रयात’ वृत्तात केलेली आहे. या वृत्तात प्रत्येक ओळीत १२ अक्षरे असून त्यांचा तीन-तीन अक्षरांचा गट केल्यास त्या प्रत्येक गटातील पहिले अक्षर लघु असते. पुढील दोन अक्षरे गुरू असतात. त्यामुळे त्या काव्यातील ओळी म्हणताना ठरावीक आघाताची अनुभूती येते. या वृत्तातील ठेका व ताल त्यामुळे ते श्लोक पाठ करायला सोपे आहेत. भाषेच्या सोपेपणामुळे, साधेपणामुळे ते अनेकांच्या तोंडी आहेत. मनाचे श्लोक २०५ आहेत. त्यातील भावार्थानुसार अभ्यासकांनी त्याची विषयवार वर्गवारी केलेली आहे. ती वाचल्यावर श्लोकांचा आशय लक्षात येतो. समर्थ वाड्.मयाचे थोर अभ्यासक समर्थभक्त शंकरराव देव यांनी केलेली मनाच्या श्लोकांची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे. श्लोक क्र. १ ते ६६ कर्मपर, श्लोक क्र. ६७ ते १३१ हे उपासनापर आणि त्यापैकी श्लोक ११६ ते १३१ भक्तिपर आहेत. श्लोक क्र. १३२ ते २०० ज्ञानपर आहेत, असे त्यांचे मत आहे. मनाच्या श्लोकांबाबत शंकरराव देव यांचे म्हणणे थोडक्यात असे आहे की, कर्म, ज्ञान, उपासना (यात भक्ती समाविष्ट आहे.) या अध्यात्मातील अवस्था किंवा पायर्‍या असून, त्या सामान्य लोकांना समजतील, अशा सोप्या भाषेत समर्थांनी मांडल्या आहेत. त्या अध्यात्म सोपानाने मनाने चिंतन करून कुणालाही अध्यात्ममंदिरात प्रवेश करता येतो, आत्मोन्नती साधता येते. समर्थ वाड्.मयाचे आणखी एक गाढे अभ्यासक ल. रा. पांगारकर यांच्या मते, “मनाच्या श्लोकांच्या प्रारंभी राघवाचा म्हणजे अनंताचा पंथ शोधण्याचा हेतू रामदासस्वामींनी स्पष्ट केला आहे.




हा हेतू मनात ठेवून सर्व ग्रंथभर ‘राघवाचा पंथ’ दर्शविण्याचा प्रयत्न समर्थांनी केला आहे.” पांगारकरांनी मनाच्या श्लोकांची वर्गवारी पुढीलप्रमाणे केली आहे - मनाचे श्लोक क्र. २ ते २७ यात आपली भूमिका तयार करण्यासाठी स्वामींनी विवेक वैराग्याचे उद्बोधन केले आहे. श्लोेक क्र. २८ ते १३५ या श्लोकांतून सगुणोपासनाकरून ‘राघवाचा पंथ’ कसा साधता येईल, हे स्पष्ट केले आहे. श्लोक क्र. १३६ ते १७४ या श्लोकात निगुर्णबोधाचे दिग्दर्शन स्वामींनी केले आहे. पुढे श्लोक क्र. १७५ ते २०२ यातून सगुण-निर्गुणातील शुद्ध स्वरुपाचे वर्णन केलेले आहे. श्लोक क्र. २०३ व २०४ यामध्ये सांगितले आहे की, आत्मसिद्धी प्राप्त झाल्यानंतरही साधकाने साधन सोडता उपयोगाचे नाही. त्यानंतरही साधन आवश्यक चालू ठेवावे. श्लोक क्र. २०५ मध्ये मनाच्या श्लोकांची फलश्रुती सांगितली आहे. पांगारकरांनी त्यांच्या ‘समर्थ संजीवनी’ या ग्रंथात विवेचनासाठी निवडक श्लोेकांचा उल्लेख करून मनाच्या श्लोकांचा आशय पुढीलप्रमाणे सांगितला आहे. मनाच्या श्लोकांत विवेक-वैराग्याचा बोध सांगितला आहे. देव कधीही अनन्य भक्तांची उपेक्षा करीत नाही. सर्वोत्तमाचा दास असतो.




तो वागतो कसा, त्यांची लक्षणे कोणती, हेही स्वामींनी त्यात स्पष्ट केले आहे. पुढे सांगितले आहे की, परमार्थी माणसांनी श्लोकांत नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. नामस्मरणाची गोडी कशी लागेल, हेही स्पष्ट केले आहे. शेवटी ज्ञानबोध ज्यांना झाला आहे, त्या साधकांच्या अंगी निरंहकारता असली पाहिजे. त्यांना आपल्या ज्ञानाचा गर्व नसावा, असे सांगितले आहे. थोर विचारवंत आणि अभ्यासक विनोबा भावे यांनीही त्यांच्या ग्रंथातील ‘मनाची शते’ या प्रकरणात मनाच्या श्लोकांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केलेले आहे, तेही थोडक्यात पाहू. श्लोक क्र. १ मंगलाचरण, श्लोक क्र. २ ते २१ सदाचाराचे महत्त्व सांगितले आहे. श्लोक क्र. २३ ते ४६ ईश्वरनिष्ठा स्पष्ट केली आहे. श्लोक क्र. ४७ ते ६६ यात भक्त आणि अभक्त यांची लक्षणे सांगितली आहेत. श्लोक क्र. ६७ ते १०१ नामस्मरणाचे महत्त्व विशद केले आहे. श्लोक क्र. ६७ ते १०१ नामस्मरणाचे महत्त्व विशद केले आहे. श्लोक क्र. १०२ ते १३५ यात कीर्तनभक्ती सांगितली आहे. श्लोेक क्र. १३६ ते १७० यातून सत्यशोधन यात काय ते स्पष्ट केले आहे. श्लोक क्र. १७१ ते २०१ यात गुरुकृपालब्धी सांगितली आहे. श्लोक क्र. २०२ ते २०५ हे उपसंहारात्मक असून त्यात फलश्रुती सांगितली आहे. विनोबा भावे लिहितात, “ ‘दासबोध’ व ‘मनाचे श्लोक’ हे दोन शिरोमणी ग्रंथ आहेत.





‘दासबोध’ ही सोन्याची खाण आहे, तर ‘मनाचे श्लोक’ ही मात्र शुद्ध सोन्याची तिजोरी आहे. खाणीमध्ये अशोधित धातू पडलेला असतो. तो शोधून निवडून घ्यावा लागतो. तिजोरीत मात्र निखळ सोने साठवलेले असते.” विनोबा भावे यांच्या मते, ‘मनाचे श्लोक’ ही रामदासांची अपौरुषेय वाणी आहे. अभ्यासकांनी केलेली ही मनाच्या श्लोकांची वर्गवारी विस्ताराने दिली. कारण, त्याने मनाच्या श्लोकांच्या अंतरंगाचा अंदाज घेता येईल. मनाच्या श्लोकांबाबत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा अभिप्राय मोठा उद्बोधक आहे. महाराज म्हणतात, ‘’सामान्य माणसानेमोठमोठाले ग्रंथ वाचण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांनी मनाचे श्लोक पाठ करावेत व त्यात सांगितल्याप्रमाणे साधन करावे. त्यांना खात्रीने भगवंताचे दर्शन होईल.” महाराजांचे हे विचार स्तुत्य आहेत.
आध्यात्मिक ग्रंथ भांडार एवढे प्रचंड आहे की, ते नुसते वाचायचे तरी आयुष्य पुरणार नाही. तथापि समर्थांनी सांगितलेले २०५ मनाचे श्लोक पाठ करून त्याप्रमाणे आचरणसुधारणे सहज शक्य आहे. समर्थांची दृष्टी सारा हिंदुस्थान बलशाही करण्याची पापमुक्त करण्याची आहे. ‘बुडाले सर्वही पापी। हिंदुस्थान बळावो।’ ही त्यांची उक्ती प्रसिद्ध आहे. मनाच्या श्लोकांतील सोपे विचार हिंदुस्थानभर पोहोचवायचे, तर त्याची प्रादेशिक भाषेत भाषांतरे होणे जरुरीचे आहे. पूर्वीच्या निजामाबाद जिल्ह्यातील डोमकुडा जवळच्या जवळगाव येथील रामदासीमठाच्या संचालकांनी मनाचे श्लोक तेलुगू भाषेत अनुवादितकेले आहेत. त्यांना ‘तेलंगणचे रामदास’ म्हणून ओळखतात. आजही निजामाबाद जिल्ह्यात तेलुगू भाषेत लिहिलेल्या दासबोधाचे पारायण करण्याची प्रथा आहे. त्यावेळी तेलुगू भाषेतील मनाचे श्लोकम्हणतात, असे ऐकले आहे. मनाचे श्लोक म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाची, पारमार्थिक ज्ञानाची, समाजसुधारणेची संपुटिका आहे. आमचे भाग्य थोर म्हणून समर्थांनी ते श्लोक मराठीतून लिहिले. मराठी भाषेचे ते वैभव आहे.





हा वैभवशाली ठेवा आपण जतन करून हिंदुस्थानभर राहू द्या, पण निदान मराठी जाणणार्‍या सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे. समर्थांच्या विचारांचा आवाका प्रचंड आहे. ‘निर्मळ जाहली पृथ्वी’ असे त्यांचे स्वप्न आहे. आपण निदान मराठी भाषा जाणणार्‍या महाराष्ट्रीयन लोकांना मनाच्या श्लोकांद्वारा निर्मळ झालेले पाहण्याचे स्वप्न पाहू. या मनाच्या श्लोकांचे परभाषिकांनीही कौतुक केले आहे. कसे ते पुढील लेखात पाहू. (क्रमश:)






- सुरेश जाखडी

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121