जम्मू : दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी दोन सरकारी कर्मचाऱ्यांना जम्मू-काश्मीर प्रशाशनाने दणका दिला आहे. कारागृह उपाधिक्षक फिरोज अहमद लोन आणि बीजबेहाडाच्या गर्ल्स हायर सेकंडरी शाळेचे मुख्याध्याक जावेद अहमद शाह,यांना दहशतवाद्यांशी संबंध ठेवल्याबद्दल बडतर्फ करण्यात आली असून कलम ३११(२) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
जावेद शाह विद्यार्थिनींना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत होता. विद्यार्थिनींमध्ये जिहादी वृत्तीचे धडे या ठिकाणी दिले जात होते. २०१६मध्ये आतंकवादी बुर्हाण वाणीला भारतीय सेनेने ठार केल्याच्या विरोधात त्याने खोऱ्यात दंगली उसळून आणल्या. तो दहशतवाद्यांचा ओव्हरग्राऊंड वर्कर म्हणून काम पाहत असे. शाह याची नियुक्ती फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना झाल्याची माहिती आहे.
फिरोज अहमद लोन हा हिजबुल मुजाहिद्दीनचा सक्रिय कार्यकर्ता होता. २०१२ पासून तो कारागृह विभागचा उपाधिक्षक होता. तेव्हापासून तो कारागृहात अटकेतील दहशतवाद्यांच्या बैठका घेत असे. त्याच्या मदतीसाठीही माणसे होती. लोन याचीही नियुक्ती उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना झाली. या वर्षात एकूण २९ सरकारी कर्मचाऱ्यांचे दहशतवादी कृत्यांशी संबंध असल्याचे लक्षात आल्याचे कळताच जम्मू-काश्मीर सरकारने तडक कारवाई केली आहे.