अडथळ्यांपलीकडे शाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2021   
Total Views |

School _1  H x

कोरोनाच्या चक्रव्यूहात अत्यंत घट्टपणे अडकलेल्या महाराष्ट्रातील शाळा अखेर दीड वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर नुकत्याच सुरू झाल्या. मुंबई महापालिका क्षेत्रातही शाळा सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने काही मार्गदर्शक सूचना आणि नियमांसह परवानगी देण्यात आली. शाळा सुरू होत असल्या, तरीही कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळला नसल्याने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र, महापालिकेने परवानगी दिल्यानंतर शाळा सुरू होऊनही विद्यार्थी आणि पालकांचा म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीवरून स्पष्ट होते. महापालिका क्षेत्रातील काही विभागांमधील शाळांचा आढावा घेतला असता, वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची टक्केवारी ही केवळ २९ टक्के असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनंतर सुरू झालेल्या शाळांना ग्रामीण भागात जरी सकारात्मक प्रतिसाद मिळत असला, तरी मुंबईत मात्र अद्याप पालक आणि पाल्य त्याबाबत साशंकच दिसतात. पालकांचा पाल्यांना शाळेत पाठविण्याबाबतचा काहीसा नकारात्मक प्रतिसाद असण्यामागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे असू शकतात. एकतर इतक्या मोठ्या कालावधीपासून शाळा बंद ठेवण्यामागे कारणीभूत ठरलेल्या कोरोनाचा धोका पूर्णपणे दूर झाला नसल्याची भीती अजूनही सर्वसामान्यांच्या मनात घर करून आहे, त्यामुळे मुंबईच्या लाखोंच्या गर्दीत आपल्या मुलांना पाठविण्यासाठी अनेक मुंबईकर असमर्थता दाखवत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ‘लॉकडाऊन’मुळे मुंबई सोडून मूळ गावी स्थलांतर केलेले अनेक लोक अद्याप कोरोनाच्या भीतीने गावातच राहणे पसंत करत आहेत. त्याचा परिणाम पटसंख्येवर दिसून आला. मुंबईतील शाळा सुरू झाल्या असल्या, तरी शेकडो विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या लोकलसेवेचा वापर अपरिहार्य आहे, त्या लोकलप्रवासापासून अद्याप मुलांना वंचित ठेवण्यात आलेले आहे. शाळकरी मुलांच्या लसीकरणाला अजून परवानगी नाही, त्यामुळे लसीकरणापासून वंचित असलेल्या लहान मुलांना शाळेत पाठवावे तरी कसे, असा सवाल पालकवर्गातून विचारला जात आहे. त्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी पालक आणि बालकांसमोर असलेली ही अडथळ्यांची शर्यत कधी संपणार, हाच महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.


सावधान! धोका बळावतोय...

 
दीड वर्षांच्या कठोर निर्बंधांची शर्यत पार करत अखेर महाराष्ट्र ‘पुनश्च हरिओम’ करत पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील आकडेवारीकडे लक्ष दिले, तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या मागील सात दिवसांपासून २,४०० ते ३,१०० यादरम्यान आढळून आली. यावरून राज्यातील कोरोनाची तीव्रता कमी होत असल्याचे चित्र दिसून असले तरी मुंबईत काही प्रमाणात हा धोका कायम राहण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. गणेशोत्सवानंतर मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती काही माध्यमं आणि ‘कोविड’विषयी भविष्यकथन करणार्‍या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली होती. त्यानंतरच्या आकडेवारीवरून तिसर्‍या लाटेची शक्यता धुसर असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, मुंबईतील काही वसाहतींमध्ये वाढत असलेल्या आकडेवारीवरून कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही, याची जाणीव मुंबईकरांना होणं अत्यावश्यक आहे. मुंबईच्या काही उच्चभ्रू भागांमध्ये होणारी कोरोनाबाधितांची वाढ प्रशासन आणि शहरवासीयांच्या काळजीत नक्कीच भर पाडणारी ठरते आहे. विशेषत: महापालिका क्षेत्राच्या ‘डी‘ विभागातील काही वस्त्यांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे नेमक्या या उच्चभ्रू वस्त्यांमध्येच कोरोना संसर्ग बळावण्यामागची कारणं शोधणं हे प्रशासनासमोरील आव्हान ठरत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या परस्पर सहयोगाने मुंबईसह देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात वेगाने करण्यात आली होती. देशभरातील सुमारे ९० कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे, तर मुंबईतील ४२ लाखांहून अधिक शहरवासीयांचे लसीकरण झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे. या माध्यमातून देशात लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या सुरू असल्याचे सिद्ध होते. मात्र, लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा विपरीत परिणाम होताना झालेला दिसतो. तेव्हा लसीकरण पूर्ण झाले, तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला आहे, असा गैरसमज करून घेणार्‍यांनी ‘सावधान! कोरोनाचा धोका पुन्हा बळावतोय...‘ हा इशारा समजणे गरजेचे आहे.





@@AUTHORINFO_V1@@