स्वामीजींच्या स्वप्नातील नवा भारत घडवूया...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2021
Total Views |
swami vivekanand 1 _1&nbs
 
 
 
आज, १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती, अर्थात ‘राष्ट्रीय युवा दिवस.’ स्वामी विवेकानंद म्हणजे ऊर्जा, चैतन्य, विचार यांचे तेजस्वी प्रकटीकरण. राष्ट्राच्या शोधासाठी घराबाहेर पडले, निरीक्षण, संवाद, अभ्यास, चिंतन करत करत देश पालथा घातला आणि सरतेशेवटी भारताच्या दक्षिणतम टोकावर जाऊन त्यांनी सर्व अनुभवांचे मनन केले, तेव्हा त्यातून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याचे उद्दिष्ट गवसले आणि स्वामी विवेकानंद जगदवंद्य झाले.
 
 
 
 
आजचा हा दिवस प्रत्येक भारतीय युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. नवे संकल्प हाती घेण्याचा दिवस आहे. आजच्याच दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या रूपाने भारताला अशी ऊर्जा मिळाली होती, जिच्या तेजाने आजही भारत ऊर्जावान आहे. एक अशी ऊर्जा जी सदैव आम्हाला प्रेरणा देत आहे, आम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे. नुकतीच आपल्या पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत’ची हाक दिली आणि आज देशात वेगळं चित्र बघायला मिळत आहे. काही काळ आणि वेळ जाऊ द्यावा लागेल.
 
 
 
 
पण, नव्या भारताची दिशा आणि ध्येय आता सज्ज झाले आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून नागरिकांमध्ये- विशेषकरून तरुणांमध्ये आपले राष्ट्र नव्याने घडविण्याचा प्रबळ उत्साह संचारल्याचे सर्वत्र आढळून येते. ही गोष्ट अर्थातच स्तुत्य आहे. परंतु, हे कार्य हाती घेण्यापूर्वी, भावी भारत कसा घडवायचा, याची स्पष्ट कल्पना आपल्याला असायला हवी. स्वामी विवेकानंद भारताच्या युवकांना आपला गौरवास्पद भूतकाळ आणि वैभवसंपन्न भविष्याला सांधणारा एक भक्कम दुवा समजतात. स्वामीजी म्हणतात, “भारत पुन्हा उठेल यात संदेहच नाही. पण, जडाच्या शक्तीने नव्हे, चैतन्याच्या शक्तीने. ध्वंस-विनाशाचा झेंडा नाचवून नव्हे, शांती-प्रेमाची विजयपताका फडकवीत- संन्याशाच्या काषाय वस्त्राच्या साहाय्याने. धनाच्या बलाने नव्हे, भिक्षापात्राच्या शक्तीने. आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे.
 
 
 
आपली ही भारतमाता हळूहळू नेत्र उघडीत आहे. ती काही काळ अमळ निद्रिस्त झाली होती इतकेच. म्हणून भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे रहस्य संघटना, शक्तिसंचय व इच्छाशक्तींचे परस्पर सहकार्य यांतच साठलेले आहे. याचवेळी ऋग्वेदातील पुढील अपूर्व मंत्र माझ्या मनात येत आहे: ‘सं गच्छध्वं सं वदध्वं सं वो मनांसि जानताम्।’ हा मंत्र आपल्याला सांगतो, तुम्ही सर्व जण मनाने एक व्हा, तुमचे विचार एक असोत, मनाने एक होणे यात समाजाच्या स्थैर्याचे रहस्य आहे. इच्छाशक्तींचे संमिलन, त्यांचे परस्पर सहकार्य व त्यांचे केंद्रीकरण हेच रहस्य होय.”
 
 
 
आज नवनवीन संशोधन, इनक्युबेशन आणि स्टार्ट-अप अशा नव्या कंपन्यांचे नेतृत्व आज भारतातील तरुण करत आहेत. आज भारत ‘स्टार्ट अप इकोसिस्टीम’च्या क्रमवारीत जगातील पहिल्या तीन देशांमध्ये समाविष्ट झाला आहे, यामागे तरुणांची मेहनत आहे. आज भारत एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक मूल्यांच्या कंपन्या बनविणारा जगातला तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे. आज हजारो नवे ‘स्टार्ट अप’ सुरू होणे हे जगातील कोणत्याही देशाचे स्वप्न असू शकेल. मात्र, आज भारतात हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं आहे. मग यामागे भारतातील युवकांची शक्तीच आहे, त्यांची स्वप्ने आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारतातील युवकांनी त्यांची स्वप्ने देशाच्या गरजांशी जोडली आहेत, देशाच्या आशा-आकांक्षाशी जोडली आहेत. नवा भारत घडविण्यासाठी आजचा युवक भारलेला आहे. ‘युवा चेतना स्वामी विवेकानंद’ पुस्तकांत छान वाचण्यात आले.
स्वामीजींच्या स्वप्नातला युवक साकार करण्यासाठी दृढतेने उभे राहा! अभ्युदयाच्या प्राचीवर तो युवक उभा आहे, तसे व्हा!! कसा आहे तो युवक? दोपनिषदांचे शिरोभूषण ज्याने धारण केले आहे.ऋषिवाणींची कुंडले ज्याने कानी घातली आहेत. ज्याच्या भाळावर चारित्र्याचा तिलक आहे.
 
 
 
 
ज्याच्या डोळ्यात उत्थानाचे तेज आहे. भगवान बुद्धांचे निगूढ स्मित ओठांवर विलसते आहे. ज्याच्या जिभेवर सरस्वतीचा निवास आहे. हलाहल प्राशिणार्‍या शिवस्तुतीला त्याने कंठात साठवले आहे. हृदयात रामकथेचे, कृष्णकथेचे नित्य अभिसरण आहे. संतसाहित्याच्या वैजयंतीमाला धारण करणार्‍या त्या युवकाने जैन दर्शनाचे उत्तरीय घेतले आहे. त्याच्या छातीवर विजयी योद्ध्यांची स्मृतिपदके आहेत. कमरेला शिवराय - शंभुरायांच्या धैर्याचा शेला बांधला आहे. असा देखणा युवक! असा तगडा युवक ज्याने हाताच्या बोटात पांडवकथांच्या मुद्रिका घातल्या आहेत. ज्याच्या तळहातावर कर्ण - दातृत्वाची रेषा आहे आणि मनगटावर शिख-सामर्थ्याचे कडे घातले आहे.
 
 
 
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या रथावर आरूढ तो युवक राणा प्रतापांच्या प्रखर वाणीत गर्जना करतो आहे.
हातीचे विवेकाचे शस्त्र उंचावत उद्घोषित करतो आहे.
 
 


‘परित्राणाय साधूनां,
विनाशायच दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय
संभवामि युगे युगे॥’
‘असा तो युवक कोण आहे?
दिक्कालाच्या आरशात पडलेले
माझेच प्रतिबिंब तर नव्हे!!’
 
 
 
अशा अनुभूतीपर्यंत जाण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून, चिंतनातून प्रेरणा घेण्याची हीच वेळ आहे. स्वामीजींच्या जीवनज्योतीवर आपल्या वाती उजळवून, भारतमातेची आरती करण्याची हीच वेळ आहे. सार्‍या क्षमता तपःपूर्वक अर्जित करून सुखेनैव त्या मातृचरणी समर्पित करण्याची हीच वेळ आहे. या देवभूमीला, या स्वर्णभूमीला, या वीरप्रसवा माउलीला जगाच्या गुरुपदी बसविण्याची हीच वेळ आहे. चला स्वामीजींच्या स्वप्नातील नवा भारत घडवूया...
 
 
 
 

- सर्वेश फडणवीस (8668541181)
 
@@AUTHORINFO_V1@@