मुंबई (अक्षय मांडवकर) - पुण्याहून बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त (नॅशनल पार्क) 'वाघाटी'च्या (रस्टी स्पॉटेड कॅट) दोन पिल्लांना दाखल करण्यात आले आहे. पुण्यात उसाच्या शेतात बेवारस अवस्थेत सापडलेल्या या पिल्लांचे संगोपन आता राष्ट्रीय उद्यानात केले जाईल. दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या या प्रजातीच्या वाढीसाठी उद्यानातर्फे 'वाघाटी प्रजनन प्रकल्प' राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ही पिल्ले याठिकाणी आणण्यात आली असून त्यांच्या आगमनाने प्रजनन प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
मार्जार कुळात समावेश असणाऱ्या 'वाघाटी'ला जंगलातील सर्वात लहान आकाराचे मांजर म्हणून ओळखले जाते. या प्रजातीच्या वाढीकरिता २०१३ पासून नॅशनल पार्क प्रशासनाने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत 'वाघाटी'चा पिंजराबंद प्रजननाचा प्रयत्न केला जात आहे. अशा पद्धतीचा देशातील हा पहिलाच आणि जगातील दुसरा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आता दोन 'वाघाटी' दाखल झाल्या आहेत. पुण्यातील दौंड तालुक्यात २८ आॅगस्ट रोजी उसाच्या शेतात वाघाटाची दोन पिल्ले (नर-मादी) बेवारस अवस्थेत सापडली होती. येथील वन विभागाचे अधिकारी आणि 'रेस्क्यू' नामक वन्यजीव बचाव संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पिल्लांचा त्यांच्या आईशी पुनर्भेटीचा प्रयत्न केला. त्यासाठी पिल्लांना दोन दिवस सापडलेल्या ठिकाणीच ठेवून त्यांची आई येण्याची वाट पाहण्यात आली. मात्र, आई न आल्याने या पिल्लांना मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
After fail attempt of reunion with mother two #rustyspottedcat kittens brought from #Pune to sanjay gandhi national park, #Mumbai. these kittens may boost
— Akshay Mandavkar🌿 (@akshay_journo) September 3, 2020
for #SGNP #rustyspottedcat captive breeding program. @vidyathreya @anishandheria @IfsPatil @SunilLimaye2 @AUThackeray pic.twitter.com/O1yFZB3A4L
राष्ट्रीय उद्यानात पिंजराबंद अधिवासातील 'वाघाटी प्रजनन प्रकल्प' राबविण्यात येत आहे. भविष्यात दौंडहून आणलेल्या पिल्लांचा या प्रजनन प्रकल्पात समावेश करण्यात येईल. युनाइटेड किंडम येथील वन्यजीव तज्ज्ञ नेव्हिले बुक यांनी दिलेल्या सल्लांप्रमाणे प्रजनन प्रकल्पासाठी नवीन पिंजरे उभारण्याचे काम सुरू आहे. - जी. मल्लिकार्जुन, वनसंरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
मांजराची वैशिष्टय़े
* जंगलातील सर्वात लहान मांजराची प्रजात
* मांसभक्षी असून हा प्राणी निशाचर आहे.
* १४ ते १७ इंच रुंद असून सुमारे दीड किलो वजन
* ७० दिवसांचा प्रजननाचा कालावधी