‘शार्ली हेब्दो’चे अभिव्यक्तिस्वातंत्र्य!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2020   
Total Views |
Charlie Hebdo_1 &nbs





‘शार्ली हेब्दो’ मासिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तसे ते नेहमीच अनेकदा चर्चेत असते. २०११ अणि २०१५ साली फ्रान्समधील या मासिकाच्या कार्यालयावर अतिरेक्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. २०१५ सालच्या हल्ल्यात तर संपादकीय विभागावर बेछुट गोळीबार अतिरेक्यांनी केला होता. त्यात संपादक, लेखक, संपादकीय विभागातील अन्य असे १२ जण जागीच ठार झाले होते, तर याच वेळी फ्रान्समधील ज्युईश मार्केटमध्येही अतिरेक्यांनी हल्ला केला होता. कारण होते, ‘शार्ली हेब्दो’ या मासिकामध्ये मोहम्मद पैगंबरांचे विवादित कार्टून प्रसिद्ध करण्यात आले होते. धर्मभावना दुखावल्या, ईशनिंदा केली म्हणून म्हणे हा हल्ला दहशतवाद्यांनी केला होता. ‘शार्ली हेब्दो’च्या कार्यालयावरचा हल्ला हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचाच हल्ला होता. पण, अल्लाहापुढे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नाही, ‘हम सब बंदे हैं’ हे स्वीकारल्यावर आपल्याला अल्लाहावर कोणतीही टीका-टिप्पणी करण्याचा अधिकार नाही, अशी कट्टर इस्लामवाद्यांची मानसिकता असल्यामुळे त्यांना हा हल्ला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हल्ला वाटलाच नाही.

असो, मात्र सप्टेंबर २०२० साली पुन्हा ‘शार्ली हेब्दो’ने २०१५ सालचे मोहम्मदांचे विवादित कार्टून प्रकाशित केले आहे. ‘शार्ली हेब्दो’चे संचालक लॉरेंट रिस सौरीस्ये यांचे म्हणणे आहे की, “आमच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही पुन्हा भरारी घेतली. इतिहास कधीही पुसला जात नाही आणि पुन्हा पुन्हा लिहिला जात नाही. आम्ही कधीही विचारांची हार पत्करणार नाही. कधी दहशतवादी विचारांसमोर झुकणार नाही.” ‘शार्ली हेब्दो’ मासिकाने आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा जागर कायम राखण्याचा पण केला आहे. दर बुधवारी प्रकाशित होणारे हे साप्ताहिक, यामध्ये व्यक्त होणारे सर्जनशील लेखक, कलाकार किंवा सर्वच सदस्य यांचे म्हणणे आहे की, ‘ते कुणा एका धर्माच्या विरोधात नाहीत. तसेच मोहम्मद पैगंबर यांच्याही विरोधात नाही, तर प्रत्येक धर्मसमुदायामध्ये काही ना काही तरी मानवासाठी प्रतिकुल असतेच. त्याबद्दल जनजागृती करणे हे आमचे कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या भावनेला पैगंबरांचा अपमान का समजावा?’

तरीही ‘शार्ली हेब्दो’ने विवादित चित्र पुन्हा प्रकाशित करणे याला आजच्या घडीला वेगळे आयाम आहेत. कारण, ‘शार्ली हेब्दो’वर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या १५ जणांची न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. ‘शार्ली हेब्दो’वर हल्ला आम्ही केल्याची जबाबदारी ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने घेतलीच होती. हल्ला करणारे दहशतवादी पोलिसांच्या चकमकीत मारले गेले. पण, या दहशतवाद्यांना रसद पुरवणारे मदत करणारे मात्र फ्रान्सने शोधून काढले. त्या आरोपींवर सध्या कोर्टात खटला सुरू आहे. तसेच अशाच प्रकारच्या विवादात सध्या स्वीडनही पूर्णत: जळतो आहे.

अशावेळी साधकबाधक विवेकपूर्ण विचार करणारे कुणीही विचार करेल की, देव आणि धर्म कशात आहे? मुळात प्रश्न नाजूक आणि खूप गुंतागुंतीचा आहे. माणसाच्या श्रद्धा-अंधश्रद्धेचा आहे. हा तिढा पुरातन आहे. या तिढ्यासाठी न जाणे कैक युगे संघर्ष पेटले आहेत. भावना दुखणे, श्रद्धांना ठेच पोहोचणे वगैरेवरून जगभरात सर्वत्रच कलह माजलेला आहे. मुळात ‘मी अमुक एक धर्म, जातीमध्ये जन्म घेतला, त्यामुळे तो धर्म, त्या धर्मातील सर्वच अधिष्ठान सर्वश्रेष्ठ बाकी सगळे तुच्छ’ ही भावनाच माणसाला ‘धर्म’ नामक पवित्र संकल्पनेचा अपमान करायला शिकवते.

‘आमच्या बायबलमध्ये पृथ्वी गोल नाही म्हणून ती गोल नाहीच’ किंवा ‘आमच्या कुराणामध्ये मंगळ ग्रहाचा उल्लेख नाही, त्यामुळे त्या ग्रहासंबंधी काहीही बोलणे करणे हराम आहे,’ असेही बोलणारे-लिहिणारे काही जण आजही आहेत. माणसाच्या विचारांच्या कक्षा कशावर अवंबलूबन असतात? धर्मग्रंथांवर? धार्मिक रितीरिवाजांवर? धर्माच्या चौकटीत राहून आलेल्या स्वानुभवांवर? की आणखी कशावर? काहीही असले तरी जी संकल्पना माणसाच्या जगण्यावर, अभिव्यक्तीवर निर्बंध आणते, त्या संकल्पनेचा पुनर्विचार करणे आवश्यकच आहे. पण, ‘पुनर्रचना’ हा शब्दही काही परंपरावादी वैचारिक दहशतवाद्यांना पचत नाही. ठीक आहे. ईश्वर सर्वशक्तिमान आहे. तो परमेश्वर असेल, अल्लाह असेल किंवा येशूही असेल. त्याच्या मर्जीशिवाय झाडाचे पान हलत नाही. ही सृष्टी त्याची निर्मिती आहे. मग त्या सर्वशक्तिमानासाठी त्याच्याच निर्मितीचा खून करणे ही क्रिया कोणत्या धर्माचे तत्त्व आहे, यावर जगभरात मिमांसा सुरू आहे.



@@AUTHORINFO_V1@@