सुन्नी-शिया वादात पाकिस्तान दोलायमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020   
Total Views |


Pakistan_1  H x

यावर्षी मोहरमपासून पाकिस्तानात सुन्नी आणि शियांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला असून महिना झाला तरी तो शांत होताना दिसत नाही.



पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेपुढे केलेल्या २५ मिनिटांच्या भाषणात सुमारे दहा मिनिटं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खर्च केली. जगभरात पसरत असलेल्या ‘इस्लामोफोबिया’वर चिंता व्यक्त करताना इमरानने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर आज ‘कुराणा’च्या प्रती जाळल्या जात आहेत; प्रेषित महंमदांचा अपमान केला जात आहे; आमच्या प्रार्थनास्थळांचा विध्वंस केला जात आहे आणि मुसलमानांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचे सांगितले. राज्यपुरस्कृत ‘इस्लामोफोबिया’साठी इमरानने भारताला आणि त्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला जबाबदार धरले. १९२०च्या दशकात जन्म झालेला संघ नाझी विचारसरणीला आपला आदर्श मानतो. संघाने नाझींची वंशशुद्धीची संकल्पना उचलून धरली असून, नाझींनी ज्याप्रमाणे ज्यूंना लक्ष्य केले, त्याचप्रमाणे संघविचारांवर चाललेल्या भारत सरकारने मुस्लीम आणि ख्रिस्ती लोकांना लक्ष्य केले आहे, वगैरे विधानं करून झाल्यावर इमरानची गाडी ‘बाबरी ढाँचा’चे पतन, गुजरात दंगे, समझौता एक्सप्रेसमधील स्फोट, गोहत्येवरून उसळलेला हिंसाचार, आसाममधील एनआरसी ते या वर्षीच्या सुरुवातीला दिल्लीमध्ये झालेले दंगे असे थांबे घेत काश्मीरप्रश्नाकडे वळली. इमरानच्या भाषणाचा हा भाग मणिशंकर अय्यर किंवा राहुल गांधींच्या भाषणातून उचलला आहे का, असं वाटावं एवढं त्यांच्यात साधर्म्य होते. भारताने या भागात नऊ लाख सैन्य तैनात करून ८० लाख काश्मिरींना बुटाच्या टाचेखाली ठेवले आहे. काश्मीरमध्ये १३ हजारांहून अधिक तरुणांना बेकायदेशीररीत्या बंदी बनवले आहे. आंदोलकांविरुद्ध पॅलेट गनचा वापर केला जात आहे, खोट्या चकमकींत आंदोलकांना ठार मारण्यात येत आहेत, वस्त्याच्या वस्त्या उद्ध्वस्त करण्यात येत आहेत, असे भयकारी वर्णन करून झाल्यानंतर इमरानने भारत आणि पाकिस्तान हे अण्वस्त्रधारी देश असून, भारताने आगळीक केली तर पाकिस्तानने आजवर राखलेला संयम संपेल. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू वगैरे विधानं करून एका प्रकारे अण्वस्त्र युद्धाची धमकी दिली. संभाव्य युद्ध टाळण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या गळ्यात घातली. एवढे नाट्यमय भाषण करूनही इमरानच्या भाषणाची कोणीही दखल घेतली नाही. याचे कारण म्हणजे लाखो मुस्लीमधर्मीय उघूर लोकांना तुरुंगात डांबून, त्यांना डिजिटली ट्रॅक करणार्‍या आणि त्यांना सांस्कृतिकदृष्ट्या हान वंशीयांसारखे बनवणार्‍या चीनविरुद्ध इमरानने एक शब्दही काढला नाही. दुसरे म्हणजे, ज्या विद्वेशाच्या विचारसरणीतून पाकिस्तानचा जन्म झाला ती अहमदियांनंतर आता शिया पंथीयांना लक्ष्य करू लागली असून तिच्या ज्वाळांमध्ये पाकिस्तान होरपळून निघण्याची भीती आहे.

 
यावर्षी मोहरमपासून पाकिस्तानात सुन्नी आणि शियांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला असून महिना झाला तरी तो शांत होताना दिसत नाही. भारतातील मुसलमान हिंदूंपासून वेगळे असून ते सांस्कृतिकदृष्ट्या एक राष्ट्र असल्याचा दावा करून आणि त्याला हिंसाचाराची जोड देऊन महंमद अली जिनांनी पाकिस्तान मिळवला. पण, अर्थातच या दाव्यात तथ्य नसल्याने अवघ्या २५ वर्षांमध्ये भाषेच्या आधारावर पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेश स्वतंत्र झाला. बलुचिस्तानची लोकसंख्या कमी असल्यामुळे पाकिस्तानने बलुची लोकांच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षांना लष्करी बुटाच्या टाचेखाली ठेवले आहे. फाळणीपूर्वी भारतीय उपखंडातील मुसलमानांमध्ये सुमारे ८० टक्के सुन्नी आणि २० टक्के शिया पंथाचे लोक होते. तीच विभागणी पुढे पाकिस्तानात झाली. त्यांच्यात मतभेद असले तरी दंगे होत नव्हते.
 
स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने स्वतःला अन्य देशांचे हस्तक म्हणून पुढे केले. सुरुवातीला ब्रिटन, अमेरिका, अरब राष्ट्रवादी देश असे करत १९७०च्या दशकात पाकिस्तान सुन्नी वहाबी विचारसरणीच्या देशांचे हस्तक बनले. पश्चिम अशियात सुन्नी-शिया वाद इस्लामच्या स्थापनेच्या काळापासून आहे. त्याची सुरुवात प्रेषित महंमदांचे उत्तराधिकारी किंवा खलिफ म्हणून त्यांचे सासरे अबु बक्र अल सिद्दिक, जे त्यांच्या कुरेश जमातीचे होते, यांची निवड करावी का त्यांचे चुलते आणि जावई इमाम अली, जे त्यांनी प्रेषितांचा वंश पुढे वाढवला, यातून झाली. यात अबु बक्र यांची सरशी झाली. कालांतराने उमर आणि उस्मान यांच्यानंतर इमाम अली हे चौथे खलिफ झाले. पण, तोवर प्रेषितांच्या कुटुंबीयांना आणि पाठीराख्यांना दुहीचा शाप लागला होता. अलींनी इस्लामी राज्याची राजधानी मदिनेहून इराकमधील कुफा येथे हलवली. अलींनी आपल्या शत्रूंशी कठोरता न दाखवल्यामुळे त्यांच्या पाठीराख्यांमध्ये नाराजी पसरून त्यांनी ६६१ साली अलींची हत्या केली आणि आपल्यातील याझिद यांची खलिफपदी नेमणूक केली. ६८० साली इमाम अलींचे पुत्र इमाम हुसैन यांनी याझिदविरुद्ध बंडाचा झेंडा उभारून मदिनेहून कुफासाठी प्रयाण केले असता त्यांना करबला येथे त्यांच्या कुटुंबीयांसह मारण्यात आले. इमाम अली आणि इमाम हुसैन यांच्या पाठीराख्यांनी शिया पंथाची स्थापना केली. सुन्नी लोकही इमाम अलींना खलिफ मानत असले तरी कालांतराने त्यांच्या उपासना पद्धतीत अनेक भेद निर्माण झाले. काही ठिकाणी ते इतके विकोपाला गेले की, सुन्नी मुसलमानांनी शियांना ‘काफिर’ म्हणजे धर्मद्रोही घोषित केले. अरब आणि पर्शियन यांच्यातील मतभेद इस्लामच्या स्थापनेहून जुने आहेत. आज इराक आणि बहरिनसारखे एखाद दोन अपवाद वगळता सर्व अरब देश सुन्नीबहुल असून, पर्शियन इराण शिया आहे. त्यामुळे सुन्नी-शिया वाद अधिक तीव्र झाला.
 
पाकिस्तानमध्ये जनरल झिया उल हकच्या काळात धर्मांधतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. १९७९ साली सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानवर हल्ला केला असता जगभरातून त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी आलेल्या ‘मुजाहिद्दीन’ म्हणजेच धर्मयोद्ध्यांसाठी पाकिस्तान हे लाँचपॅड बनले. ‘सीआयए’कडून पुरवली जाणारी शस्त्रास्त्रं आणि आखाती अरब देशांकडून मिळालेले पेट्रो डॉलरच्या मदतीने सोव्हिएत रशियाचा पराभव झाला असला, तरी त्यातून पाकिस्तानात सुन्नी मूलतत्त्ववादाने थैमान घातले. २००१ ते २०१८ या कालावधीत झालेल्या सुन्नी-शिया दंग्यांमध्ये ४,८४७ शिया मारले गेले आहेत. ही संख्या भारतात हिंदू-मुस्लीम दंग्यांमध्ये मारल्या गेलेल्या मुसलमानांच्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक आहे. शियांना असलेला विरोध पूर्वी देवबंदींच्यात आणि अरेबियातून आलेल्या वहाबी विचारसरणीच्या संघटनांमध्ये होता. पण, गेल्या काही वर्षांत बरेलवी पंथीयांमध्येही त्याचे लोण पसरले आहेत. पाकिस्तानमध्ये प्रचलित धर्मनिंदा कायद्यांतील तरतुदींचा वापर प्रामुख्याने हिंदू आणि ख्रिस्ती धर्मीयांविरुद्ध केला जायचा. पण, आता शिया पंथीयांना छळण्यासाठीही त्यांचा वापर होऊ लागला आहे. ‘जैश-ए-मुहंमद’सारख्या संघटना, ज्या पूर्वी केवळ भारतविरोधी कारवायात गुंतलेल्या असायच्या, त्या आता शियाविरोधी भूमिका घेऊ लागल्या आहेत. मोहरमला स्वतःला आसुडांनी तसेच धारदार शस्त्रांनी रक्तबंबाळ करून शियापंथीय इमाम हुसैन आणि इमाम अलींच्या शहादतीचे स्मरण करतात. या वर्षी मोहरमच्या प्रदर्शनात दिल्या गेलेल्या घोषणांत सुन्नी पंथीयांचा अपमान झाला म्हणून पाकिस्तानातील सुन्नी लोकांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. नजीकच्या भविष्यकाळात या आंदोलनाची परिणती हिंसाचारात होण्याची दाट शक्यता आहे.
 
असे म्हटले जात आहे की, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच माहिती आणि प्रसारण क्षेत्रात पंतप्रधानांचे विशेष सल्लागार असलेले लेप्टनंट जनरल असिम बाजवा यांच्या भ्रष्टाचाराची आणि अवैध संपत्तीच्या साम्राज्याच्या कहाण्यांवर जनतेचे लक्ष हटवण्यासाठी हे आंदोलन धगधगत ठेवले आहे. आणखी एक संभाव्य कारण म्हणजे सौदी अरेबिया आणि तुर्की यांच्या शीतयुद्धात पाकिस्तानची अवस्था ‘गेला माधव कुणीकडे’ अशी झाली आहे. गेल्या दशकात पाकिस्तान तुर्कीकडे मोठ्या प्रमाणावर झुकल्याने त्यास सौदीचे युवराज महंमद बिन सलमान यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. शियांविरोधी आंदोलनांतून इराणविरुद्ध जनभावना तीव्र होत असल्याने त्यातून कदाचित सौदीचा राग शांत होईल, अशी पाकिस्तानी नेतृत्त्वाला आशा वाटत असावी. पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनासाठी भारताला जबाबदार धरले आहे, जे त्यांच्या आजवरच्या वागणुकीस साजेसेच आहे.
 
पाकिस्तानातील घटनांचे भारतावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. आंदोलनाचे हे लोण भारतातही पोहोचू शकते. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामींनी ट्विट करून पाकिस्तान त्यांच्याकडे शियांची हत्याकांडं घडवून आणून, आंदोलनाचे लोण भारतात पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याने, हिंदूंनी शियांच्या रक्षणासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन करताना शियांनी अयोध्येतील राम मंदिराला पाठिंबा दिल्याचा दाखला दिला आहे. मानवतेच्या दृष्टीने अशा कृत्यांचे समर्थन केले जाऊ शकते. पण, आजच्या तारखेला तरी पाकिस्तानात हिंसाचाराला सुरुवात झाली नाही. दुसरे म्हणजे, या प्रकरणाला जागतिक राजकारणातील सुन्नी-शिया संघर्षाचे संदर्भ आहेत. गेल्या काही वर्षांत भारताचे शिया इराण आणि सुन्नी आखाती अरब देशांशी संबंध अधिक मजबूत झाले असल्याने कोणतेही धोरण पूर्ण विचारांती अंगीकारायला हवे.
 
 

@@AUTHORINFO_V1@@