दुर्लभ साधकपद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2020
Total Views |
2_1  H x W: 0 x





दासबोधात स्वामींनी साधकाची लक्षणे (५.९ या समासात) सविस्तरपणे सांगितली आहेत. हा साधक सत्संगतीत राहून आपल्या संशयांचे निराकरण करुन घेण्याचा प्रयत्न करतो. श्रवणाकडे तो अधिक लक्ष देता. शास्त्रग्रंथांचे वाचन करुन आपल्या मनातील संशय त्यात कसा सोडवला आहे, हे तो पाहतो.



बद्ध मनुष्य अवगुण, स्वार्थ, अहंकार आणि देहबुद्धी यांच्या वेढ्यात गुरफटलेला असतो. समर्थांनी त्याला ‘अंधारीचा अंध’ म्हटले आहे. कारण, त्याच्या आता आणि बाहेर अज्ञानाचा अंध:कार असतो, संसारातील फटके खाऊन व चटके सहन करुन उपरती झाल्यावर त्याला पूर्वायुष्यातील चुकांची, कुकर्मांची आठवण येते. सत्संग मिळाला आणि संतांनी त्याला ‘आपला’ म्हटले की, सद्बुद्धीने वागण्याची त्याला प्रेरणा मिळते. परमार्थाची वाटचाल करुन खरे समाधान मिळवावे असे त्याला वाटू लागते. हे आपण मागील लेखात पाहिले. थोडक्यात,




स्वार्थ सांडून प्रपंचाचा। हव्यास धरिला परमार्थाचा।
अंकित होईन सज्जनांचा। म्हणेतो मुमुक्षू॥




पूर्वायुष्यातील कुकर्मे आठवून रडत बसण्यात काही अर्थ नसतो. त्यातून बाहेर येण्यासाठी काही तरी केले पाहिजे, असे मुमुक्षूला वाटू लागते. तेथून पुढे ‘साधक’ व ‘{सद्ध’ दशेकडे जाण्याचा त्याचा मार्ग त्याला दिसू लागतो. या मार्गातील घटनांचा क्रम समर्थांनी दासबोधात सांगितला आहे. थोडक्यात, तो असा आहे. पश्चात्ताप झाल्याने तो आपल्या अवगुणांचा त्याग करतो. अवगुण अहंकार सोडून दिल्याने त्याला रितेपण जाणवते. ती पोकळी भरुन काढण्यासाठी तो सत्संग करतो. सत्संगाला धरुन ठेवतो. संतसज्जन गुरुंचा तो शोध घेतो. पूर्वपुण्याईने श्रीगुरु भेटल्यावर तो त्यांना अनन्यभावे शरण जातो. त्यावर प्रसन्न होऊन श्रीगुरु त्याला आपला म्हणतात व आपलेपणाने आश्वासित करतात. नंतर श्रीगुरु त्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतात. त्या उपदेशाने आपण संसारतापातून मुक्त झालो, असे साधकाला वाटेत. परंतु, ही अवस्था फार काळ टिकत नाही. पुन्हा संसारात आल्यावर साधक त्रस्त होतो. त्यातून मुक्त होण्यासाठी श्रीगुरुंकडून मिळालेले ज्ञान दृढ होण्यासाठी त्याला साधना करावी लागते. म्हणून त्याला ‘साधक’ असे म्हणतात. साधकाला परमार्थदशेतील अभ्यास कठीण वाटला तरी, तो ज्याचा त्यालाच करावा लागतो. आपल्या अपूर्णतेची त्याला जाणीव होते. ही जाणीव अभ्यासाने दूर करुन आपल्या अंतरंगातील आत्मस्वरुपाच्या पूर्णतेची ओळख करुन घेण्यासाठी त्याला साधना करावी लागते. आत्मस्वरुपाचे अनुसंधान कायम टिकवून ठेवण्याची विद्या त्याला शिकावी लागते. यासाठी साधकाच्या ठिकाणी आमूलाग्र बदल घडून येतो. हा बदल त्याला जाणीवपूर्वक करावा लागतो. आपल्या जुन्या आवडी-निवडी आपले पूर्व आचारविचार सगळे सोडून देऊन आत्मज्ञानासाठी आवश्यक अशा आवडीनिवडीचा अभ्यास करावा लागतो. आत्मज्ञान मिळवण्यासाठी अनुकूल असे आचार विचार आत्मसात करावे लागतात.


दासबोधात स्वामींनी साधकाची लक्षणे (५.९ या समासात) सविस्तरपणे सांगितली आहेत. हा साधक सत्संगतीत राहून आपल्या संशयांचे निराकरण करुन घेण्याचा प्रयत्न करतो. श्रवणाकडे तो अधिक लक्ष देता. शास्त्रग्रंथांचे वाचन करुन आपल्या मनातील संशय त्यात कसा सोडवला आहे, हे तो पाहतो. याला ‘शास्त्रप्रचिती’ असे म्हणतात. तसेच श्रीगुरुंना आपल्या मनातील शंका विचारुन ते काय उत्तर देतात, तेही ऐकतो. ते आत्मसात करतो. याला ‘गुरुप्रचिती’ असे म्हणतात, तसेच आत्मचिंतन करुन स्वत:ला काय वाटते याचा अंदाज घेतो. सापडलेली उत्तरे तो बुद्धिनिष्ठ विचारातून तपासून बघतो. त्यात भोळसरपणा अंधविश्वास यांना थारा नसतो. आपले समाधान झालेल्या या स्थितीला ‘आत्मप्रचिती’ असे म्हणतात. अशा रितीने शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती यांचा तो मेळ घालतो. त्यातील एकवाक्यता अनुभवतो. त्याला ‘साधक’ म्हणतात.




नानासंदेहनिवृत्ती। व्हावया धरी सत्संगती।
आत्मशास्त्रगुरु प्रचिती। ऐक्यतेसी आणी॥




साधकाच्या असे लक्षात येत की, सभोवतालचे जग दृश्यज्ञानाच्या मागे लागले आहे. मानवाने आपल्या बुद्धिसामर्थ्यावर दृश्य क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. भोवतालची सर्व माणसे या दृश्यज्ञानाच्या मागे लागलेली असल्याने त्या लोकांनी आत्मज्ञानाची हेळसांड केली. त्यांनी असा समज करुन घेतला की, आजच्या काळात आत्मज्ञान ‘जीर्ण जर्जर’ झालेले आहे. आता आत्मज्ञान जुने पुराणे झाले, मोडकळीस आले आहे, असे या लोकांना वाटते. थोडक्यात, आत्मज्ञान कालबाह्य झाले असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, असा त्यांनी समज करुन घेतलेला असतो. ही अशी भोवतालची विचारधारा जोर धरत असताना साधक महत्प्रयासाने आत्मसाक्षात्कार करुन घेतो. भोवतालचे लोक काहीही म्हणोत त्याकडे तो दुर्लक्ष करतो आणि एक प्रकारे तो आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करतो, त्याचे पुनरुत्थान करतो. आत्मानात्म विवेक जाणून तो मिथ्या प्रपंचाच्या सुखदु:खातून सुटका करुन घेतो. त्याला ‘साधक’ म्हणावे.




आत्मज्ञान जीर्ण जर्जर। त्याचा करी जीर्णोद्धार।
विवेकके पावे पैलपार। या नाव साधक॥




‘मी देह आहे’ ही कल्पना म्हणजे देहबुद्धी, साधक विवेकाने देहबुद्धी बाजूला सारतो. तसेच, ‘मी आत्मा आहे’ ही आत्मबुद्धी तो अभ्यासाने पक्की करतो. श्रवण-मनन तो कधी सोडत नाही. श्रवण-मनन चालू असते. तो आपल्या ठिकाणी असलेल्या दुर्गुणांचा त्याग करतो. सतत उत्तम गुणांचा अभ्यास करुन ते अंगी बाणण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर अखंड आत्मस्वरुपाचे त्याचे चिंतन चालू असते. त्याला ‘साधक’ म्हणावे. आत्मस्वरुप अर्थात स्वस्वरुप पाहण्याचा अनेक लोक प्रयत्न करतात. पण, ते त्यांना दिसत नाही. कारण, आत्मस्वरुप म्हणजे आकार रंगरुप असणारी अशी ती दृश्य वस्तू नव्हे. अनेकांना ते स्वरुप दिसले नाही, हा अनुभव माहीत असूनही साधक स्वप्रयत्नाने आत्मस्वरुप आपल्या आतमध्ये अनुभवतो व ते मनात साठवतो, तो खरा साधक. तसे पाहिले, तर मनाने स्वस्वरुपाची कल्पना करता येत नाही मन तेथे अस्त पावते. तेथे तर्कही चालत नाही.




जेथे मनचि मावळे। जेथे तर्कचि पांगुळे।
तेचि अनुभवा आणि बळे। या नाव साधक॥




आपल्या अभ्यासाच्या बळावर साधक त्या आत्मस्वरुपाचा आतल्या आत अनुभव घेतो, म्हणून तो साधक. हे दृश्य जगत बाजूला सारुन तो हा अनुभव घेत असतो.


समर्थांनी दासबोधात साधकाची लक्षणे विस्तारपूर्वक सांगितली आहेत. ती वाचताना लक्षात येते की, साधकपदाला पोहोचणे अतिशय अवघड आहे. आपल्या देहावर आपले खूप प्रेम असते. देहप्रीती व अहंकाराने आपण आत्मकेंद्रित, स्वार्थी, आसक्त व भोगलंपट झालेले असतो. दृश्य जगतातील वासनातृप्तीसाठी आपण आपली बुद्धी, मन, तर्क यांचा वापर करीत असतो. या जन्मभरातील आपल्या सवयी मोडीत काढून सवर्र् ठिकाणी विरक्ती अनुभवण्यासाठी साधकाला एखाद्या योद्ध्याप्रमाणे स्वत:शीच लढावे लागते. मोह, दु:ख व शोक हे साधकाचे शत्रू या शत्रूंशी तो कसा लढतो, तर त्याने मोहाला उभा चिरला. दु:खाचे दोन तुकडे केले आणि शोकाचे तुकडे तुकडे करुन फेकून दिले.




मोहासी मधेंचि तोडिलें। दु:खासि दुधडचि केले।
शोकास खंडून सांडिले। येकीकडे ॥




तिरस्कार, द्वेष, मत्सर, निराशा, दु:ख या मानसिक विकारांना त्याने मारुन टाकलेले असते.




तिरस्कार तो चिरडिला। द्वेष खिरडून सांहिला।
विषाद अविषादे घातला। पायांतळी॥




शूर योद्ध्याप्रमाणे साधक सार्‍या दुर्गणांवर तसेच दुष्पप्रवृत्तींवर मात करतो. संत तुकाराम महाराज उगीच नाही म्हणत, ‘रात्रंदिन आम्हा युद्धांचा प्रसंग!’ अत्यंत धैर्याने, चिकाटीने, सतत अभ्यासाने साधक सर्वकाळ स्वरुपस्थिती अनुभवत असतो. हे अवघड आहे. साधकाला देहाभिमान उरत नाही. त्याचे सारे संशय नाश पावलेले असतात.




जयास अखंड स्वरुपस्थिती। नाही देहाची अहंकृती।
सकल संदेह निवृत्ती। या नाव साधक॥




जन्मजन्मांतरीच्या सवयी मोडून आत्मस्वरुपाला आत्मसात करणारे साधकपद सहजासहजी मिळत नाही. ते कष्टसाध्य व दुर्लभ असते.
- सुरेश जाखडी



@@AUTHORINFO_V1@@