नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंढे यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खुद्द तुकाराम मुंढे यांनी स्वतःहून ट्विट करून कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती मंगळवार २५ रोजी सकाळी दिली आहे. मात्र त्यांना अन्य कोणतीही लक्षण नाही. तरीही जे कोणी तुकाराम मुंढे यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतः पुढे येऊन कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन मुंढे यांनी केले आहे.
तुकाराम मुंढे यांनी ट्विट करत करोना विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली. ‘मला करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:ला अलगीकरण (आयसोलेट) केले आहे. मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण लवकरच ही लढाई जिंकू’, असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान नागपुरातील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचे गठन केले आहे. नागपुरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूरमधील खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर हे विशेष पथक लक्ष ठेवणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने हे विषेश पथक गठन करण्यात आले. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लागणार असल्याचे दिसत आहे. मनपाचे हे विशेष पथक रुग्णालयांची अचानकपणे पाहणी करणार आहे. तसेच काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ कारवाईचा बडगाही उगारणार आहे.