मुंबईतील पुलांचे संरक्षण आणि पूल प्राधिकरणाची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2020   
Total Views |


Flyover_1  H x


मुंबई हे उड्डाणपुलांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, सद्यस्थितीत मुंबईतील उड्डाणपुलांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या पुलांच्या एकूणच देखभाल, दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीसाठी गरज आहे ती स्वतंत्र पूल प्राधिकरणाची. त्याचा या लेखात घेतलेला सविस्तर आढावा...



गेल्या चार-पाच वर्षांमध्ये मुंबईत पूल कोसळून अनेक जीवघेण्या दुर्घटना घडल्या. दोन वर्षांपूर्वी दि. ३ जून २०१८ रोजी अंधेरी स्थानकाजवळ गोखले पूल कोसळून एक ठार व व चार जण जखमी झाले. दि. १५ ऑक्टोबर, २०१७ रोजी चर्नी रोड स्थानकाजवळ पादचारी पूल कोसळून एक जण जखमी झाला, तर दि. १३ डिसेंबर, २०१५ मालाडमधील एव्हरशाईन नगरचा पूल कोसळून नऊ जखमी झाले. त्यात गेल्याच वर्षी १४ मार्च, २०१९ ला संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी हिमालय पुलाचा भाग भर गर्दीत कोसळल्याची दुर्घटनाही तितकीच भीषण ठरली. या दुर्घटनेत सात बळी गेले व सुमारे ३२ जण जखमी झाले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार त्यावेळचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या दुर्घटना-प्रकरणाची चौकशी करून त्याचा प्राथमिक अहवालही सादर केला. या अहवालात शहरातील पुलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती. शिवाय हे प्राधिकरण महिनाभरात स्थापन केले जाईल, असेही घोषित केले होते. पण, या घोषणेला आता एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला, तरी या प्राधिकरणाच्या स्थापनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
 

२०१८ मधील अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईतील सर्वच पुलांचे सर्वेक्षण खासगी सल्लागारांकडून करवून घेतले. परंतु, या सल्लागाराला हिमालय पुलाचे योग्य स्थिती-मापन करता आले नाही. पुलाच्या तपासणीवर योग्य लक्ष ठेवले नाही म्हणून तीन अभियंत्यांवर ठपका ठेवून त्यांना अटकही करण्यात आली. मात्र, अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे अभियंत्यांवर जास्त ताण असल्याचे कारण अभियंत्यांनी पुढे केले. या विभागात ३० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे पूल प्राधिकरणासाठी पूल विभागात पुरेसे मनुष्यबळ नाही, असेही सांगण्यात आले. या विभागात ५० सब-इंजिनिअर्स, पाच ते सहा साहाय्यक अभियंते, चार कार्यकारी अभियंते व दोन उपप्रमुख अभियंते एवढे मनुष्यबळ सध्या कार्यरत आहे व प्रमुख पदाचा भार प्रभारी केला आहे. त्यामुळे असली फुटकळ कारणे देऊन मुंबईकरांचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा लवकरात लवकर या प्राधिकरणाची पालिकेने स्थापना करायला हवी.


मार्च महिन्यापासून जरी ‘लॉकडाऊन’ असले आणि कोरोनाकरिता युद्धपातळीवर पालिकेचे प्रयत्न सुरु असले तरी रस्ते बांधणी, पूल दुरुस्तीचे कामे पुढे ढकलणे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे पालिकेने कोरोनाइतकेच हा विषयदेखील गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित एकूण ३१४ पूल असून आणखी ३० पूल एमएमआरडीएने पालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. पावसाळ्यात अतिधोकादायक अशा २९ पुलांची कामे हाती घेण्यात आली असून काही पुलांची दुरुस्तीची कामे अजूनही सुरू आहेत. पादचारी व वाहतूक पुलांपाठोपाठ पुरेशा देखभालीअभावी दुरवस्थेत असणार्‍या ठिकठिकाणच्या ‘स्कायवॉक’चे संरचनात्मक सर्वेक्षण होणार आहे. सध्या हे एमएमआरडीएने बांधलेले ‘स्कायवॉक’ पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. पालिका हे संरचना सर्वेक्षण वीर जिजामाता तंत्रशिक्षण संस्थेतर्फे करवून घेणार आहे. त्याकरिता १.२५ कोटी खर्च येणार आहे. वांद्रे पूर्व स्कायवॉकची पुनर्बांधणी होणार असून इतर २३ स्कायवॉककरिता मोठ्या दुरुस्त्या करणे अपेक्षित आहे.


हिमालय पुलाची उभारणी ऑक्टोबरनंतर


हिमालय पुलावरून दररोज हजारोंच्या संख्येने (२५ हजारांहून अधिक) प्रवासी छशिमट रेल्वे स्थानकात ये-जा करत होते. मात्र, हा पूल आता सव्वा वर्षांहून अधिक काळाकरिता रखडल्यामुळे छशिमटच्या एकमेव भुयारी मार्गावर ताण येत आहे. पुलाच्या आजूबाजूला टाईम्स ऑफ इंडिया, अंजुमन इस्लाम शाळा व छशिमट या हेरिटेज वास्तू असल्याने पालिकेला पुलाचे काम सुरू करण्याआधी हेरिटेज समितीची परवानगी घ्यावी लागेल.

हँकॉक पुलाचे काम सुरु


दक्षिण मुंबईतील बहुचर्चित रखडलेल्या हँकॉक पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून जूनमध्ये रेल्वेमार्गावर गर्डर टाकण्यात आले. वर्षभरात मार्च २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होईल. कामासाठी दोन-तीन मुहूर्त करावे लागले. कारण, रेल्वेने ‘ना हरकत’ परवानगी फार उशिराने दिली. या पुलाखालून चार फूट व्यासाची जलवाहिनी जात असल्याचे उशिरा लक्षात आले. पुलाशेजारी अतिक्रमण करणार्‍या झोपडीधारकांनाही हटविणे जिकिरीचे झाले होते. या पुलाच्या कामावर रु. ७७.४३ कोटी इतका खर्च येणार आहे.

चर्नी रोडमधील पादचारी पुलाचे कंत्राट पोहोचले नऊ कोटींवर


हा पूल धोकादायक म्हणून तो रेल्वेने पाडला. पण, तीन वर्षे रखडलेले हे काम दोन कोटी खर्च वाढवून सुरू करण्यात आले. हे काम धिम्या गतीने सुरू असल्याने ते लवकरात लवकर पूर्ण करावे म्हणून गिरगावकरांनी अनेक वेळेला आंदोलने केली. आता फेब्रुवारी २०२१ मध्ये हे काम पूर्ण होण्याची आशा आहे.

ग्रँट रोडचा फेररे पूल बंद


गोखले पूल दुर्घटनेनंतर आयआयटी व रेल्वे पथकानी मुंबई रेल्वेमार्गावरील सर्व पुलांचे सर्वेक्षण केले. त्यावेळी् या ब्रिटिशकालीन फेररे पुलाच्या मुख्य गर्डरवर गंज चढलेला व काही ठिकाणी ‘क्रॅक’ गेलेले आढळले. म्हणून हा पूल ‘धोकादायक’ घोषित करण्यात आला. आता हा पूल पाडण्याच्या आधी पाईप व केबल्स हलवायला हव्यात. पण, तरीही नवीन पूल बांधण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा अवधी लागेल, हे निश्चित.

किंग्ज सर्कल स्थानकाजवळच्या पुलावरील हाईट बॅरिअर कोसळले - पादचारी पुलाचे हाईट बॅरिअर एका ट्रकच्या धडकेमुळे मार्चमध्ये कोसळले. ठाणे पनवेलकडे जाणारी वाहतूक त्यामुळे काही काळासाठी ठप्प झाली होती. हे हाईट बॅरिअर अवजड वाहनांना अटकाव व्हावा म्हणून लावले होते. त्यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
धोकादायक ब्रिटिशकालीन पुलांच्या उभारणीसाठी नवे तंत्रज्ञान


जुना पूल न पाडताच नव्या पुलाची पुनर्बांधणी करता येईल असे हे नवीन तंत्रज्ञान आहे. वाहतुकीला अडसर होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. ही चाचपणी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉ.लितर्फे केली जाणार आहे. या योजनेनुसार दहा उड्डाणपुलांचे काम आगामी काळात करण्यात येणार आहे.

शीव उड्डाणपुलाचे रखडलेले काम सुरू


टाळेबंदीदरम्यान परराज्यातून येणारी सामग्री आता मिळाल्यामुळे या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. ३४ गर्डरच्या मजबुतीकरणाचे काम संपल्यावर ८० बेअरिंग बदलण्याचे काम सुरू होईल. २००० मध्ये बांधल्या गेलेल्या शीव उड्डाणपुलाच्या सांध्यांमध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे ते १६० सांधे बदलण्याची शिफारस २०१८च्या संरचनात्मक अहवालात करण्यात आली होती. सामग्री मिळाल्यावर १४ फेब्रुवारीला ८० सांध्यांचे काम सुरू करण्यात झाले व ८०चे बाकी राहिले आहे.

महालक्ष्मीला रेल्वेमार्गावर दोन पूल बांधणार


सागरी किनारा मार्ग उभारणीनंतर मुंबईतील वाहतुकीचे नियमन सुरळीत व्हावे, यासाठी महालक्ष्मी व डॉ. ई मोझेस व केशवराव खाड्ये मार्ग येथे दोन पूल बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी रु. ७४५.६९ कोटी खर्च करण्यात येणार आहे. ‘सीआरएफजी’ या संयुक्त कंपनीला हे कंत्राट द्यावयाचे ठरले आहे. यातील ‘अ‍ॅप्को’ची भागीदारी कंपनी चीनमधील आहे. त्यामुळे स्थायी समिती या प्रस्तावाला मान्यता कदाचित देणार नाही. या कामाच्या मान्यतेला त्यामुळे रखडण्याची चिन्हे आहेत. टिळक पुलाच्या वॉकवेला पर्यायी कामाची चौकशी सुरू झाली असून हे कामही हँकॉक पुलासारखे रखडण्याच्या स्थितीत येऊ शकते. तसेच कल्याण-डोंबिवलीच्या पत्रीपुलाच्या समस्या लवकरच मार्गी लागणार आहेत. पुलासाठी आवश्यक ते गर्डर कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे दुरुस्तीच्या रखडलेल्या कामाला सुरुवात होईल.


वांद्रे पश्चिम स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या कामासाठी २५० कामगार कार्यरत आहेत. त्यांच्या कामाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर व नियम पाळण्याचे रेल्वेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. दुसरीकडे भायखळ्याचा पूल कोण बांधणार, रेल्वे की महापालिका, यासंबंधीचा करारही अद्याप प्रलंबित आहे. तसेच डिलाईल रोड पुलाचे बांधकाम अजून दीड वर्षे रखडले आहे. जुन्या पुलाचे तोडकाम झाल्यानंतर आता तेथे स्टेनलेस स्टील ८५ मीटर बाय २७.५ मीटरचे गर्डर टाकण्यात येणार आहेत. या पुलाखालून पाच रेल्वेमार्गिका जातात. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खाते, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, रेल्वे व अनेक पालिका पूल बांधण्याचे काम करतात. राज्यात दोन हजारांहून अधिक मोठे व १५ हजारांहून अधिक छोटे पूल बांधलेले आहेत. १०० वर्षांहून अधिक जुने ब्रिटिशकालीन अनेक पूल आता धोक्याचे बनले आहेत. त्यात उड्डाणपूल, नदी वा खाडीवरील पूल, रेल्वेचे पूल, पादचारी पूल, स्कायवॉक इत्यादी पुलाचे प्रकार आहेत. पुलाकरिता पोलाद धातू महत्त्वाचा ठरतो. गर्डर वा खांबांकरिता वा काँक्रिटमध्ये पोलादी सळ्या वापरल्या जातात. हे पोलाद गंजू नये म्हणून त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पोलाद गंजले की त्याची दाब सहन करण्याची क्षमता कमी होते. पोलाद गंजले तर देखभालीनंतर त्यावर गंज जाण्याकरिता रस्टोलिन लावावे व पोलादी सळ्यांवर एपोक्सी मिश्रण लावावे. मुंबईत एवढी मोठी पुलाची कामे असल्याने पूल प्राधिकरण स्थापणे हिताचे ठरेल. त्यामुळे मुंबईकरांवरील पूल अपघाताचे विघ्न टळेल.

@@AUTHORINFO_V1@@