झाकीर नाईकने तोडले अकलेचे तारे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2020   
Total Views |


Zakir Naik_1  H
 



भारतातील मुस्लीम देशामध्ये अत्यंत सुरक्षित असून त्यांची चिंता झाकीर नाईक याने करण्याचे काही कारण नाही, असे त्यास मुस्लीम समाजाने ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तरच अशा समाजविघातक धर्मांधांची तोंडे बंद होतील!


कट्टर धर्मांध मुस्लीम धर्म प्रसारक झाकीर नाईक याने भारतातून पलायन केल्यानंतर जिभेला लगाम नसल्यासारखी भाषा पाजळण्यास तो मागेपुढे पाहत नाही. भारतातील भारतीय जनता पक्षाची राजवट ही भारतातील मुस्लीम समाजाच्या विरूद्ध असल्याचा अपप्रचार त्याच्याकडून सातत्याने सुरु असतो. भारतातातील मुस्लीम समाजावर जो अन्याय होत आहे किंवा त्या समाजाचा भारतीय जनता पक्षाच्या ‘फॅसिस्ट’ सरकारकडून जो छळ होत आहे तो थांबवायचा असेल तर मुस्लिमांनी एका पक्षाखाली एकत्र येण्याची आवश्यकता आहे. भारतात मुस्लीम समाजाची लोकसंख्या सरकारकडून मुद्दाम कमी सांगितली जात आहे. प्रत्यक्षात भारतात २० कोटी मुस्लीम नसून ते २५ ते ३० कोटी असल्याचा दावा या महाभागाने केला आहे. मुस्लीम समाज एका पक्षाखाली एकत्र आल्यास त्याद्वारे मुस्लिमांना आपली ताकद दाखविता येऊ शकेल, असे झाकीर नाईकचे म्हणणे आहे.
 


मुस्लीम समाजास चिथावणी देणारी बरीच वक्तव्ये या झाकीर नाईकने युट्यूबच्या माध्यमातून अलीकडे केली आहेत. मुस्लीम समाजास आपले नित्य धार्मिक कार्यक्रम करणे अशक्य होत असेल तर त्यांनी आपण जेथे राहत आहोत तेथून स्थलांतर करावे, असा सल्ला मुस्लीम धर्मग्रंथांचा दाखला देऊन त्याने दिला आहे. मुस्लीम समाज असे स्थलांतर अन्य देशामध्ये करु शकतो किंवा केरळसारख्या राज्यात करू शकतो, असे झाकीर नाईकने म्हटले आहे. एवढ्यावरच हा धर्मप्रसारक थांबला नाही, तर भारतातील मुस्लीम समाजाने दलित समाजासमवेत हातमिळवणी करण्याचा सल्ला त्याने दिला आहे. मुस्लीम आणि दलित समाज एकत्र आल्यास त्यांची जबरदस्त शक्ती निर्माण होईल, असेही त्याने म्हटले आहे. मुस्लीम आणि दलित समाज एकत्र आल्यास त्यांची संख्या ६० कोटींच्या आसपास होईल आणि त्या दोन्ही शक्तींपुढे हिंदू समाजाचा टिकाव लागणार नाही, असे त्याला सुचवायचे आहे. आपले म्हणणे ऐकल्यास मुस्लीम समाज नक्की विजयी होऊ शकतो, असा त्याला विश्वास वाटत आहे. मुस्लीम समाज आणि दलित समाज यांनी एकत्र येण्याचे आवाहन करताना, ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यासही त्याने मागेपुढे पाहिले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुस्लीम धर्म स्वीकारण्याची इच्छा होती, पण मुस्लीम धर्मीयांनी त्यांना न स्वीकारल्यामुळे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, असा नवा इतिहास लिहिण्याचा त्याने प्रयत्न करून पाहिला. मुस्लीम समाजासाठी केरळ हे राज्य अत्यंत सुरक्षित असल्याचे झाकीर नाईक म्हणतो. त्याचप्रमाणे मुंबई आणि हैदराबाद ही शहरेदेखील मुस्लीम समाजासाठी सुरक्षित आहेत, असे त्याने म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असल्याने मुंबई शहर हे मुस्लिमांसाठी सुरक्षित आहे. तसेच हैदराबाद शहरामध्ये एमआयएम मुस्लिमांचे ओवेसी असल्याने तेही शहर मुस्लिमांसाठी सुरक्षित असल्याचा त्याचा दावा आहे. एकूणच विदेशात पलायन केल्यानंतरही भारतातील मुस्लीम समाजास चिथविण्याचे धंदे झाकीर नाईक यांच्याकडून सुरूच आहेत. भारतातील मुस्लीम समाजाच्या समस्त नेत्यांनी झाकीर नाईक जी बडबड करीत आहे, त्याचा खरे म्हणजे एकमुखाने निषेध करायला हवा. भारतातील मुस्लीम देशामध्ये अत्यंत सुरक्षित असून त्यांची चिंता झाकीर नाईक याने करण्याचे काही कारण नाही, असे त्यास मुस्लीम समाजाने ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तरच अशा समाजविघातक धर्मांधांची तोंडे बंद होतील!
 

अशी वक्तव्ये फक्त भारतातच केली जाऊ शकतात!


 
भारतात केंद्रामध्ये आणि अन्य अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्या सरकारांना लोकशाही मार्गाने दूर करता येणे शक्य नसल्याने अन्य मार्गांचा वापर करून भाजप सत्तेवरून दूर झाला तर किती बरे होईल, असे काही लोकांना वाटत आहे. हे लोक भाजपला सातत्याने पाण्यात पाहत असतात. त्यामुळे भाजप सरकार काही चांगले कार्य करीत आहे ते त्यांना दिसतच नाही. ‘हिंदू’ हे दैनिक असेच भाजपवर आगपाखड करीत असते. वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे म्हटले जात असले तरी सर्वच वृत्तपत्रे वा त्यात काम करणारे सर्व पत्रकार यांचा व्यवहार तसा असतोच असे नाही. त्याचे एक उदाहरण नुकतेच सर्वांसमोर आले आहे. ‘हिंदू’ या दैनिकात ‘असोसिएट एडिटर’ या पदावर काम करणार्‍या वैष्णा रॉय नावाच्या महिलेने, भारतातील केंद्रीय मंत्रिमंडळ सत्तेवरून जायचे असेल तर भारतातही बैरुतमध्ये जसा भीषण स्फोट झाला तसा व्हायला हवा, असे भाष्य समाजमाध्यमावर केले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्याबद्दल इतका टोकाचा दुस्वास? बैरुतमध्ये झालेल्या प्रचंड स्फोटामुळे प्रचंड नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. तेथील जनतेने सरकारविरुद्ध हिंसक निदर्शने केली. त्यातून लेबनीज सरकारने राजीनामा दिला. बैरुतमध्ये झालेल्या स्फोटानंतर लेबनीज सरकारला जावे लागले. भारतातही तशाच प्रकारचा स्फोट झाला तर केंद्र सरकार पायउतार होईल, असे ही महिला पत्रकार म्हणते! भारतात लोकशाही असल्यामुळे ती असे काही बोलू शकली! अन्य देशामध्ये तिने असे धाडस केले असते का? नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवरून जावे यासाठी असा अभद्र विचार कसा काय केला जाऊ शकतो? लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेद्वारे आपणास जे सरकार हवे ते निवडून देण्याचा किंवा नापसंत सरकारला सत्तेवरून दूर करण्याचा अधिकार असतो. भारतातील जनतेने आतापर्यंत अनेकवेळा तो अधिकार बजावून अकार्यक्षम राजकीय पक्षांना आणि त्या पक्षांच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. वैष्णा रॉय यांनी जो मार्ग सुचविला तो विचार आतापर्यंत कोणाच्याही डोक्यात कधी आला नाही! पण, त्या महिला पत्रकाराच्या डोक्यात आला. याला विकृती नाही तर काय म्हणायचे? बैरुतसारखा स्फोट भारतात व्हावा, त्यामध्ये प्रचंड जीवितहानी, वित्तहानी व्हावी आणि त्यातून जी स्थिती निर्माण होईल, त्यामुळे केंद्र सरकार सत्तेवरून दूर होईल, असे तर्क त्या बाईने लढविले! इतका भयानक विचार एखाद्या पत्रकाराने आतापर्यंत केला असेल असे वाटत नाही. आपल्या देशाबद्दल, देशातील लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारबद्दल असा विचार करणार्‍या या वैष्णा रॉयचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे! आपण जे भाष्य केले ते अत्यंत चुकीचे असल्याच्या ‘साक्षात्कार’ही त्या महिलेस अजून झाला नाही! माफी मागणे तर दूरच! अशा व्यक्तींना वाचकच त्यांची जागा दाखवून देतील हे निश्चित!

 
@@AUTHORINFO_V1@@