अभिनयातील ‘पद्मश्री’ सरिता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2020
Total Views |

sarita joshi_1  

१९८०मध्ये ‘तितलियां’ या हिंदी मालिकेतून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण करणार्‍या बालकलाकार ते टीव्ही मालिकांमध्ये ‘सासू’च्या भूमिकेतून आपली छाप उमटविणार्‍या पद्मश्री सरिता जोशी यांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.


कलाकार आणि कला यांच्यात एक अतूट नातं आहे. आपल्या कलेतून निखळ मनोरंजन करतो तो कलाकार. त्याची कला पाहून आपल्याला होणारा आनंद हीच त्याच्या कलेसाठी त्याला मिळणारी खरी पावती होय. यावर्षीच्या ‘पद्मश्रीं’ची घोषणा करण्यात आली. त्यात नाव होते ते सरिता जोशी या ज्येष्ठ अभिनेत्रींचे. त्या दृकश्राव्य जगातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, एक लोकप्रिय रंगमंचीय कलाकारदेखील आहेत. सरिता यांचे वडील भीमराव भोसले बॅरिस्टर होते आणि आई कमलाबाई राणे गोव्यातील. सरिता यांचा जन्म पुण्यातील मात्र त्यांचे संगोपन बडोद्यात झाले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी आपली बहिणी पद्माराणीबरोबर कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे पारंपरिक नाट्यगृहापासून सुरुवात केली. काही दिवसांतच त्यांना शांता आपटेंसारख्या नामांकित कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या आजही परंपरागत रंगमंचापासून सुरुवात केल्याचा अभिमान बाळगतात. लाईव्ह आर्ट हे नेहमीची फिल्म आणि टेलिव्हिजनच्या पुढे आहे. आजच्या काळातही त्याचा प्रभाव कमी झालेला नसल्याचे त्या म्हणतात. एका कार्यक्रमादरम्यान आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल त्या सांगतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सांभाळत केवळ आईला हातभार म्हणून नाट्यक्षेत्राकडे वळालेल्या सरिता जोशींना आज त्यांच्या अभिनयासाठी देशातील चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले.


तब्बल सहा वर्षे बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर वयाच्या १६व्या वर्षी त्यांना एका मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी ‘इंडियन नॅशनल थिएटर गुजराती’सोबत अभिनय करण्यास सुरुवात केली. इथेच त्यांची ओळख प्रवीण जोशी यांच्याशी झाली व पुढे दोघांनी विवाह केला. १९८०च्या सुमारास नादिरा बब्बर यांच्या ‘तितलियां’ या मालिकेत त्यांनी भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी ‘झी’वरील अनेक मालिकांतून भूमिका साकारल्या. त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय झाल्या. सासू-सुनांच्या पात्रातील नातं त्यांनी मालिकांमधील भूमिकांमधून जीवंत केले आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले. ‘बा, बहू और बेबी’ या मालिकेतील ‘बा’उर्फ ‘गोदावरी लभशंकर ठक्कर’ हे पात्र घराघरात पोहोचले. या मालिकेत त्यांनी नाट्य, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता अरविंद वैद्य यांच्याबरोबर भूमिका साकारली होती. ‘स्टार प्लस’च्या ‘चांद छुपा बादल में’मध्ये ‘दादी’ची भूमिका साकारली तर त्यांचा ‘गंगुबाई’ हा चित्रपट जानेवारी २०१९मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता ज्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सोनी वाहिनीवरील ‘ब्याह हमारी बहू का’मध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली होती. २०१५मध्ये ‘मेरी आशिकी तुमसे ही’या मालिकेत आजीचे पात्र साकारताना त्या दिसल्या. २०१७मध्ये त्या ‘बकुला बुआ का भूत’ या मालिकेत ‘बकुला’ या प्रमुख भूमिकेत होत्या. त्यांनी ‘स्टार प्लस’च्या ‘खिचडी रिटर्न्स’मध्ये कॉमिक पात्रदेखील साकारले. २०१८मध्ये ‘कलर्स टीव्ही’वरील ‘सिलसिला बदलते रिश्तो का’मध्ये सुभद्राची भूमिका त्यांनी केली, ज्याला नंतर नायिकाची भूमिका मिळाली. अलीकडेच २०१९मध्ये त्या ‘हमारी बहू सिल्क’ या मालिकेतून भूमिका साकारताना दिसल्या. अभिनय क्षेत्रातील त्यांचे कार्य आजतागायत अविरतपणे सुरु आहे. त्या आपल्या नीतिमत्ता व मूल्यावर अतिशय ठाम आहेत. त्या स्पष्ट करतात की, ‘एक कलाकार म्हणून मी नेहमीच स्वतःच्या मूल्यांचे पालन केले आहे. चालू निर्मितीपेक्षा मला जास्त पैशांची ऑफर देण्यात आली असली तरीही मी माझी वचनबद्धता पूर्ण केल्याशिवाय माझे दिग्दर्शक किंवा निर्मितीसंस्था यांची साथ कधीही सोडली नाही.’


आज चित्रपट, मनोरंजन या क्षेत्रात येणार्‍या नवोदित कलाकारांना अल्पावधीतच प्रसिद्ध व्हावं, अशी अपेक्षा असते. मात्र, या क्षेत्रात येण्यासाठी रंगमंच, नाटक हा पाया आहे. त्या म्हणतात, माझा विश्वास आहे की रंगमंचावर अनेक प्रमुख भूमिका साकारल्यामुळे नाटकांतील माझे उच्चार आणि बोलण्याकडे खूप लक्ष दिले गेले. आजकाल नाटक सोपे झाले आहे. मायक्रोफोन, प्रॉम्प्ट्स यासारख्या तांत्रिक गोष्टी आल्या आहेत. परंतु, आजही या अभिव्यक्त्यांवर हालचाल, चालण्याची लकब आणि उच्चार यांचा बारकाईने अभ्यास असणे गरजेचे आहे. रंगभूमीसोबत असणारी नाळ कायम ठेवत चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार्‍या सरिता जोशींना त्यांच्या कामाची पावती म्हणून २०२०च्या देशातील चौथ्या सर्वोच्च ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ७८व्या वर्षीही त्यांनी ‘सिम्बा’, ‘गुरू’, ‘डरना जरुरी है’, ‘नजर’, ‘सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या चित्रपटातून उत्तम भूमिका वठविल्या. ‘पद्मश्री पुरस्कारा’ने सन्मानित झाल्यानंतर सरिता म्हणाल्या, “या सन्मानाने मी खूप आनंदी आहे. मी तरूणपणापासूनच काम करत आहे. पुरस्कारांसाठी मी कधीच काम केलेले नाही, माझ्यासाठी काम करणे म्हणजे पूजा. मी नेहमीच मनापासून काम केले आहे आणि मी जे काही केले त्यात उत्तम प्रयत्न केले आहेत. आता मला ‘पद्मश्री सरिता जोशी’ म्हणून ओळखले जाईल, हा इतका मोठा सन्मान आहे. खरंच मी आनंदी आहे. कारण, माझी मुले आनंदी आहेत.” अशा ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री सरिता जोशी यांना अभिनय क्षेत्रातील अविरत कार्यासाठी खूप शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@