शैक्षणिक सेवेचा नंदादिप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2020
Total Views |
Chandrakant Sawant_3 


मी एकटा काही करू शकत नाही, पण म्हणून मी करूच नये असे काही आहे का? मी सुरूवात तर करेन. माझ्यापरीने सत्कार्याची ज्योत प्रज्वलित करेन. एक ज्योत लाखो ज्योती निर्माण करून अंधकाराला पराभूत करू शकते, असा विचार करून चंद्रकांत सावंत या शिक्षकाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात सेवाकार्य करण्यास सुरूवात केली. सेवाकार्याचे बिज रोवताना या माणसाने कोणत्याच प्रसिद्धीचा, लाभाचा विचार केला नाही. हे सेवाकार्य जणू त्यांच्या जीवनाचे लक्ष्य होते आणि आहे. या लेखामध्ये त्यांच्या सेवाकार्याचा घेतलेला हा मागोवा...


माजात अशा काही व्यक्ती आहेत, ज्या वेगवेगळ्या पद्धतीने निःस्वार्थी पणाने समाजसेवा करतात, ज्यामुळे अनेक गरजूंना त्यांच्या मदतीचा हातभार लागतो आणि त्यांचे आयुष्य सुकर होते. यातच शिक्षण व आरोग्य या माध्यमातून पोहोचवलेली मदत ही तर त्यांच्या आयुष्यात वर्तमानाबरोबरच, भविष्यासाठीही मोठी उपयुक्त ठरत असते. असेच काही ध्येय समोर ठेवत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. २ (ता. वेंगुर्ले) येथे सध्या कार्यरत असलेले शिक्षक चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी समाजासमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे.
 
सामाजिक कार्यासह शैक्षणिकदृष्ट्या मुली योग्य शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी स्व:खर्चाने ’सावित्रीबाई फुले दत्तक पालक’ योजना सुरू करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ४६ विविध शाळांमधील गरजू तसेच परिस्थितीने बिकट असलेल्या मुलींना जिल्ह्यातील शाळांमध्ये फिरून टप्प्या-टप्प्याने शैक्षणिक कारणासाठी दत्तक घेतले आहे. यात आजवर त्यांनी सुमारे ६६ हुषार व होतकरू मुलींना शालेय शिक्षणात सहकार्य करण्यासाठी ‘शैक्षणिक दत्तक’ घेतले असून याच योजने अंतर्गत सुमारे १०१ विद्यार्थिनींना ‘शैक्षणिक दत्तक’ घेण्याचा त्यांचा मानस आहे. आजवरचे त्यांचे सामाजिक कार्य बघता २५ पेक्षा जास्त वेळा त्यांना ‘ग्लोबल शिक्षक पुरस्कारा’सह विविध राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
शैक्षणिक क्षेत्रात चंद्रकांत तुकाराम सावंत हे गेली २३ वर्षे कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजपर्यंत त्यांनी ज्या-ज्या भागात शैक्षणिक सेवा दिली त्या-त्या अतिदुर्गम, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या व शाळेशी संबंधित घटकांच्या विविध समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण केले. त्यांच्यातील चांगल्या प्रवृत्तीचा शालेय कार्यातउपयोग करुन घेत आपल्या कार्यक्षेत्रातल्या शाळांनाही विविध क्षेत्रांत पुढे आणले आहे. तसेच विद्यार्थी, पालक व स्थानिक ग्रामस्थ यांच्या चांगल्या प्रवृत्तींचा उपयोग शालेय कार्यात केला आहे. सामाजिक सुधारणाही त्यांनी करत शिक्षणाचे महत्त्व अतिदुर्गम तसेच ग्रामीण भागातील स्थानिकांच्या मनात रुजवले. तसेच सामाजिक व विविध शैक्षणिक कार्यातदेखील सहभाग घेत समाज सुधारण्याचेही कार्य त्यांनी आजवर केले आहे. चंद्रकांत सावंत यांची सावंतवाडी तालुक्यातील त्यावेळीच्या अतिदुर्गम फणसवडेसारख्या गावात प्रथम शैक्षणिक सेवेत रूजू झाल्यावर सर्वप्रथम तेथील असलेल्या अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागले होते.
 
 

Chandrakant Sawant_2  
 
 
अतिदुर्गम परिसर सोबत विविध समस्या आणि सुविधा अभाव पाहता चंद्रकांत सावंत यांनी तर शिक्षणाचे महत्त्व त्या परिसरातील विद्यार्थ्यांना व पालकांना पटवून दिलेच, सोबत तेथील विविध सामाजिक समस्या तसेच आर्थिक परिस्थितीचा विचार करुन त्यांना सोडवण्याच्या दृष्टीने आपल्या परीने अनेक प्रयत्न केलेत. या कार्यात त्यांना अपेक्षेपेक्षा जास्तच यश मिळाले. त्यांनी तेथील शालेय विकासात पालकांना व ग्रामस्थांना सोबत तर घेतलेच. तसेच तेथील महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी एक पाऊल म्हणून श्री देव मल्नाथ वनश्री, तेजश्री, यशश्री, राजश्री, भाग्यश्री, दीपश्री, तेजश्री व आदी असे विविध स्वतः नियोजनबद्ध महिला बचत गट स्थापन केलेत. सुरुवातीला बचत २५ रुपयांपासून सुरू केली.
 
 
महिला बचत गटांत शिक्षक चंद्रकांत सावंत यंनी फणसवडे (ता.सावंतवाडी) येथे १४ वर्षे कार्यरत असताना सुमारे पाच लाख रूपये जमा केले. त्यानंतर व्यवस्थापक, मार्गदर्शक अशी भूमिका शिक्षक चंद्रकांत सावंत या महिला बचत गटांमध्ये बजावत असून आजवर याच महिला बचत गटांंतर्गत फणसवडे येथील महिलांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे २५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम सध्या कर्ज व आदी स्वरुपात वापरत आहेत. तसेच त्यावेळीच्या अतिदुर्गम फणसवडे गावात सुमारे १४ वर्षे शिक्षक म्हणून सेवा देत असताना चंद्रकांत सावंत यांची तेथील ग्रामस्थांना मुख्य प्रवाहातदेखील आणण्यात मोठी भूमिका निभावली होती.
 
 
तसेच शिक्षक चंद्रकांत सावंत हे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मठ नं २ (ता. वेंगुर्ल) येथे गेली आठ वर्षं सेवा बजावत असून जिल्ह्यातील लोकांच्या गरिबीमुळे मुलींच्या शिक्षणात आर्थिकदृष्ट्या कोणतीही कमी राहू नये तसेच आजच्या युगात शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी त्यांनी स्व-खर्चाने ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक’ योजनेची सुरुवात केली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ४२ जिल्हा परिषदांच्या विविध शाळांमधून ४७ विद्यार्थिनी व चार माध्यमिक विद्यालयातील १९ विद्यार्थिनी अशा 46 शाळांमधील गरजू तसेच परिस्थितीने बिकट असलेल्या सुमारे ६६ गरीब मुलींना या योजनेअंतर्गत दत्तक घेत त्यांचा आर्थिक शैक्षणिक खर्च उचलेला आहे.
 
 
 
येत्या काही महिन्यात त्यांचा एकूण १०१ विद्यार्थिनी दत्तक घेण्याचा मानस आहे. याशिवाय जिल्ह्यातील गरजू शाळांना डिजिटल करण्यासाठी तसेच इतर साहित्यासाठी ही स्वखर्चाने शिक्षक चंद्रकांत सावंत हे आर्थिक व सामाजिक मदत करत आहेत. आजवर त्यांनी विविध कल्याणकारी उपक्रम स्वतः राबवत असून आपल्या शैक्षणिक सेवेमध्ये गेली २३ वर्ष चालू ठेवलेले आहेत. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नुकताच ‘जागतिक शिक्षक पुरस्कार २०१९’ ने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले तसेच ‘महात्मा जोतिराव फुले नागरिक रत्न’, ‘शिक्षक रत्न’, ‘गुरू सेवा रत्न’, ‘आदर्श शिक्षक’ व इत्यादी विविध जागतिक, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्ह्यास्तरीय व इतर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
 
 
आजच्या काळात शिक्षक चंद्रकांत सावंत यांच्यासारखे समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करणारे हिरे खूपच कमी आहेत. शिक्षक चंद्रकांत सावंत यांच्या शिक्षण व सामाजिक कार्यपद्धती व पॅटर्न ठिकठिकाणी राबविल्यास दुर्गम, ग्रामीण व इतर भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. शाळांदेखील आपल्या गुणवत्तेत उल्लेखनीय उंची गाठतील. त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल शासनाने वेळीच घेणे व त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. असे झाल्यास अनेक शिक्षक व व्यक्ती अशा शैक्षणिक व सामाजिक कार्यात आपले मोलाचे योगदान देतील, यात शंका नाही.
 
- निर्णय राऊत, 8208543776
 
 
आपल्याला, आपल्या शाळेला, आपल्या कार्याला मिळालेला सन्मान हा आयुष्यातील यश ठरविण्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. आपल्या कार्यातील प्रावीण्य, आपले समाजाशी असलेले नातेसंबंध, शिक्षक म्हणून असलेली जबाबदारी पार पाडण्यात असलेली भूमिका यावरच हा सन्मान होत असतो. याच जाणिवेतून गेली २३ वर्षे हातून शैक्षणिक व सामाजिक कार्य घडत आहे. या कार्यातूनच हुशार व होतकरू मुलींना शालेय शिक्षणात सहकार्य करण्यासाठी ‘शैक्षणिक दत्तक’ घेण्याचे कार्य करत आहेत. शाळेमध्ये कायमस्वरूपी देणगी रक्कम देऊन सहकार्य करणे तसेच महिलांसाठी महिला बचत गटांची स्थापना करणे व व्यवस्थापक, मार्गदर्शक म्हणून सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्याची आवड जोपासणे हे चंद्रकांत सावंत यांचं वैशिष्ट्य आहे. या कार्याचा लाभ घेऊन शैक्षणिक यशस्विता विद्यार्थ्यांनी प्राप्त करत राहावे
 
 
- चंद्रकांत सावंत 917350680890
 
 

Chandrakant Sawant_1  
@@AUTHORINFO_V1@@