जीवनात शिक्षक होण्याची संधी मिळणे यासारखे भाग्य नाही: मुकुल कानिटकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2020
Total Views |
News _1  H x W:

मुंबई : ”माणसाचा पुण्यसंचय एकपट असेल तर त्याला मनुष्य म्हणून जन्म मिळतो. तो दुप्पट असेल तर भारतासारख्या पुण्यभूमीमध्ये जन्म होतो आणि तिप्पट असेल तर शिक्षक म्हणून जन्म मिळतो. म्हणूनच शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळणे ही आपल्यासाठी परमभाग्याची गोष्ट आहे“, असे भावपूर्ण प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे संगठनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले.
 
संस्कृति संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने ‘मूल्याधिष्ठित शिक्षण आणि शिक्षकाची भूमिका’ या विषयावर आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत वक्ता या नात्याने ते बोलत होते. या कार्यशाळेत उपस्थित हजारो शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, “शिक्षणाचा मूळ हेतू ‘सा विद्या या विमुक्तये’ असा आहे. सर्व बंधनापासून त्याला मुक्त करणे हाच शिक्षणाचा उद्देश आहे. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या मनात अंतस्थ मूल्य वाढविण्याची गरज आहे. ” आपले म्हणणे स्पष्ट करताना ते म्हणाले, “मूल्याचे दोन अर्थ आहेत, एक आंतरिक मूल्य आणि दुसरे बाह्यमूल्य अथवा फेसव्हॅल्यू. कोणत्याही नोटेवर जे वचन लिहिलेले असते ते त्या नोटेचे बाह्यमूल्य अथवा फेसव्हॅल्यू असते. पण एखादा छोटासा सोन्याचा तुकडा असतो. त्यावर कोणतेही बाह्यमूल्य लिहिलेले नसते तरीही त्याच्या आंतरिक गुणामुळे त्याची किंमत जास्त असते.
 
शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देतात, त्यावेळी ते विद्यार्थ्यांचे आंतरिक मूल्य वाढवत असतात. त्याच आंतरिक मूल्यांचे संवर्धन आणि बिजारोपण करण्याचे कार्य संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान करीत आहे. त्याला आपल्यापैकी प्रत्येक शिक्षकाने साथ दिली पाहिजे.” आपल्या ओघवत्या भाषणात ते पुढे म्हणाले, “शिक्षणामध्ये तीन ‘एच’ महत्त्वाचे आहेत, ‘हेड’, ‘हॅण्ड’ आणि ‘हार्ट’ यांच्या समन्वयाचे नाव म्हणजेच शिक्षण.”
 
 
आपले बोलणे अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले, “एखादा गुन्हेगार निरपराध माणसाला गोळी घालून मारतो, दुसरीकडे सीमेवर लढणारा सैनिक समोरच्या सैनिकाला गोळी मारुन ठार करतो. दोघांची कृती आणि डोक्यातून निघालेला विचार एकच होता. दोघांमध्ये फरक होता तो ह्रदयातील भावामध्ये. गुन्हेगाराच्या हृदयातील भाव स्वार्थाचा होता, तर जवानाच्या हृदयातील भाव देशभक्तीचा होता, त्यामुळे एकाला फाशीची शिक्षा होते तर दुसर्‍याला परमवीर चक्र मिळते. हेच भाव जागरणाचे, हृदयावर, मनावर संस्कार करण्याचे कार्य शिक्षकांना करायचे आहे.
रामायण, महाभारत हे केवळ आपले राष्ट्रीय ग्रंथ नाहीत तर ते जीवन ग्रंथ आहेत. संस्कृति संवर्धन प्रतिष्ठानने नैतिक शिक्षण योजनेमध्ये या ग्रंथांचा केलेला समावेश अत्यंत अभिनंदनीय आहे.” आपल्या प्रास्ताविकपर भाषणात संस्थेचे विश्वस्त मोहन सालेकर म्हणाले की, “गेली १७ वर्षे प्रतिष्ठान नैतिक शिक्षणाच्या प्रचार प्रसाराचे कार्य करीत आहे. त्यासाठी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गोष्टीरुप कथापुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत, शाळांच्या मदतीने दर आठवड्याला या कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या जातात. वर्षअखेर त्यावर आधारित वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाते.
 
 
सध्या ही योजना महाराष्ट्र, गोवा, राजस्थान आणि केरळ या चार राज्यांमधील ९०० शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. गेल्या १७ वर्षांमध्ये १५ लाख विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.” महाराष्ट्र आणि गोव्यातील १० हजार शिक्षक फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून या ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश वाड यांनी केले तर दीपिका गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 
(संकलन : अस्मिता आपटे)
@@AUTHORINFO_V1@@