युद्ध आमुचे सुरू...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2020   
Total Views |

cyber security_1 &nb



सर्व्हर हॅक करुन मोठी रक्कम गिळंकृत करणे, हाच या सायबर हल्ल्यांचा प्रमुख हेतू असला तरी एखाद्या देशाची माहिती-तंत्रज्ञान यंत्रणाच खिळखिळी करण्यासाठीही या सायबर हल्ल्यांचे प्रमाण सध्या वाढले आहे. तेव्हा, आपले युद्ध अजून सुरुच आहे. तेव्हा सतर्क राहा आणि सुरक्षित राहा!


तो काळ आता इतिहासजमा झाला, जेव्हा एखाद्या राष्ट्राबरोबर युद्ध हे केवळ रणांगणात लढले जायचे. आज मुत्सद्देगिरीची चाल, व्यापारी ध्येयधोरणे आणि सायबर हल्ले यांसारख्या माध्यमातूनही एखाद्या देशाला सहज वठणीवर आणता येते. त्यातच चीनसारखेही काही देश आहेत, जे कोरोना आणि इतर घातक जैविक हत्यारांचा प्रयोग करायलाही मागे-पुढे पाहात नाहीत. लडाख सीमेवर भारतीय फौजांशी लढताना गलवान खोर्‍यातील नामुष्की चीनला चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे आता चीन इतर युद्धपर्यायांचा अवलंब करताना दिसतो. त्याचीच परिणती गेल्या काही दिवसांत आली. कारण, एकट्या चीनमधून गेल्या पाच दिवसांत भारतात ४०,३०० सायबर हल्ल्यांचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.



इतकेच नाही तर चीनच्या हॅकर्सनी २० लाख भारतीयांना ई-मेलद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्नही केल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये ncov2019gov.in हा ई-मेल किंवा ‘कोविड टेस्ट’च्या नावाखाली सायबर हल्ले होऊ शकतात, असा इशाराच सुरक्षा यंत्रणांनी जारी केला आहे. तसेच बँका, उद्योगधंदे, सरकारी संकेतस्थळांनाही सतर्क राहण्याच्या सूचना सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी अनोळखी, संशयास्पद ई-मेल्स न उघडता, ती त्वरित डिलिट करावी. चिनी मालावर बहिष्कार घालून आपण चीनची जिरवत आहोतच, पण अशा सायबर हल्ल्यांपासूनही संरक्षण करणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी अशा संशयास्पद ई-मेल्सपासून दूर राहणे, वेळोवेळी आपले पासवर्ड बदलणे, इंटरनेट-फायरवॉल सिक्युरिटीचा आढावा घेणे गरजेचे आहे. चीनचे चेंगडू शहर हे या सायबर हल्ल्यांचे प्रमुख केंद्र असल्याचे समजते. पण, यापूर्वीही भारत सातत्याने सायबर हल्लेखोरांच्या निशाण्यावर राहिला आहे. अमेरिका आणि भारत हे जगातील सर्वाधिक सायबर हल्ल्यांच्या भक्ष्यस्थानी असून चीनबरोबरच स्लोव्हिनिया, झेक प्रजासत्ताक, युक्रेन, मेक्सिको या देशांमधून प्रामुख्यानेे सायबर हल्ले केले जातात. सर्व्हर हॅक करुन मोठी रक्कम गिळंकृत करणे, हाच या सायबर हल्ल्यांचा प्रमुख हेतू असला तरी एखाद्या देशाची माहिती-तंत्रज्ञान यंत्रणाच खिळखिळी करण्यासाठीही या सायबर हल्ल्यांचे प्रमाण सध्या वाढले आहे. तेव्हा, आपले युद्ध अजून सुरुच आहे. तेव्हा सतर्क राहा आणि सुरक्षित राहा!


ममता स्मरे एकता...


राज्याचे वा देशाचे नेतृत्व करताना, सर्वांना सोबत घेऊन निर्णयप्रक्रियेत समाविष्ट करणे हे कधीही हितावह. पण, बरेचदा राजकीय मतभेद, वैयक्तिक हेवेदावे इतके पराकोटीला जातात की, त्यासमोर जनतेच्या हितालाच ग्रहण लागते. पश्चिम बंगालमध्ये तर ही राजकीय चढाओढ सध्या चरम सीमेला आहे. कारण, दिवसेंदिवस प. बंगालमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असताना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मात्र ती आटोक्यात आणता आलेली नाही. त्यातच ‘अम्फान’ चक्रीवादळाच्या तडाख्याने प. बंगालच्या किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले. पण, धक्कादायक बाब म्हणजे, या आपत्ती काळातही ममतादीदींना सर्वपक्षीयांना विश्वासात घ्यावे, त्यांचे सल्ले जाणून घ्यावे, असे एकदाही वाटले नाही. परंतु, भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावल्यानंतर ममतांनाही एकाएकी उपरती झाली आणि बुधवारी त्यांची सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली.



राज्याचा गाडा हाकणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही. प्रशासनाबरोबर विरोधी पक्ष आणि इतर पक्षांच्या अडचणी, त्यांच्या सूचनाही ध्यानात घ्याव्या लागतात. पण, ममतादीदींनी शेवटच्या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते, मार्चमध्ये, म्हणजे ‘लॉकडाऊन’च्या अगदी सुरुवातीला. त्यानंतर एप्रिल, मे आणि जून महिना आता संपायच्या मार्गावर असताना ममतादीदींना एकतेचे एकाएकी स्मरण झाले. खरंतर विरोधी पक्षांनी वारंवार सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली होती. पण, महामारी असो वा चक्रीवादळ, आपण सर्व संकटांचा सामना करण्यासाठी एकखांबी समर्थ आहोत, याच गर्विष्ठ स्वभावामुळे दीदींनी बंगालला आज मृत्यूच्या दरीत लोटले आहे. त्यातच तृणमूलच्या आमदाराचाही कोरोनाने बळी घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. बंगालमध्येही टेस्टिंग कमी असल्यामुळेच रुग्णांची संख्याही आपसुक कमीच दिसते. त्यातही वैद्यकीय सुविधांचा अभाव, केंद्राच्या भरघोस मदतीचा अपुरा आणि गैरवापराचेही कित्येक प्रकार उघडकीस आले आहेत. ममतांच्या नाकर्तेपणाचाच हा परिपाक आहे. त्यातच ‘अम्फान’ चक्रीवादळानंतर केंद्राने बंगालला दीड हजार कोटींची तातडीने मदत जाहीर केली. त्यानंतर केंद्र सरकारवर आसूडही ओढता येत नाही, अशी दीदींची स्थिती. असो. दीदींना उशिरा सूचलेले हे शहाणपण बंगालच्या भल्याचे ठरो, एवढीच अपेक्षा!
--
@@AUTHORINFO_V1@@