आॅस्ट्रेलियातील 'स्मूथ हॅण्डफिश' मासा जगातून नामशेष; अधिवास नष्टता-अतिमासेमारी कारणीभूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2020
Total Views |

fish _1  H x W:


'आययूसीएन'ने केले अधिकृतपणे जाहीर


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आॅस्ट्रेलियाच्या सागरी परिक्षेत्रात आढळणारा 'स्मूथ हॅण्डफिश' हा मासा जगातून नामशेष झाला आहे. 'इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर' (आययूसीएन) या परिषदेने यासंबंधीची घोषणा केली आहे. अधिवास नष्टता आणि अनावधतेने झालेल्या मासेमारीमुळे हा मासा जगातून नामशेष झाला. 'आययूसीएन'ने प्रथमच सागरी परिसंस्थेत आढळणारी एखादी प्रजाती नष्ट झाल्याचे अधिकृतपणे सांगितले आहे.

 
 

संयुक्त राष्ट्र परिषदेअंतर्गत संकटग्रस्त प्रजातींच्या संवर्धनासाठी 'आययूसीएन' ही परिषद काम करते. ही परिषद जगामधील संकटग्रस्त प्रजातींची लाल यादी तयार करुन त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करते. 'आययूसीएन'ने स्मूथ हॅण्डफिश हा मासा जगामधून नामशेष झाल्याचे प्रथमच अधिकृतपणे जाहीर केले आहे. आॅस्ट्रेलियामधील तास्मानिया सागरी परिक्षेत्रामध्ये १८०० ते १८०४ सालादरम्यान फ्रेंच प्राणीशास्त्रज्ञ फ्रान्सॉइस पोरॉन यांनी या माशाचा नमुना सर्वप्रथम गोळा केला होता. शास्त्रीय अभ्यासाच्या अनुषंगाने आॅस्ट्रेलियाच्या सागरी परिक्षेत्रातून गोळा केलेला हा सगळ्यात पहिला मासा होता. या माशाचा अधिवास केवळ आॅस्ट्रेलिया खंडाच्या सागरी परिक्षेत्रामध्येच होता. त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक होते.

 
 
 

'स्मूथ हॅण्डफिश' या माशाच्या नामशेष होण्यामागे 'आययूसीएन'ने अनेक कारणे नोंदवली आहेत. अधिवास नष्टता, जल प्रदषूषण, नाॅर्दन पॅसिफिक सीस्टार या प्रजातीचे वाढते आक्रमण, बोटिंग आणि या माशाच्या अंडी घालण्याच्या जागा नष्ट झाल्याचा प्रभाव त्याच्या अस्तित्वावर पडला. याशिवाय दक्षिण तस्मानियाच्या सागरी परिक्षेत्रात स्कॅलाॅप आणि आॅयस्टर मत्स्यपालनासाठी या माशांचा अधिवास असणारा खडकाळ भाग खोदला गेल्यामुळे त्यांचे अधिवास क्षेत्र नष्ट झाल्याचे आययूसीएनने म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@