सामान्यांतला असामान्य ‘अजिंक्य’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2020   
Total Views |
ainkjya rahane_1 &nb

 
 


मुंबईसह देशाची शान असलेला अजिंक्य रहाणे इंग्रजी शिकवणार्‍या एका जागतिक कंपनीचा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर’ झाला आहे. त्यानिमित्ताने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा...
 
 
 
सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशामध्ये अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण, या ‘लॉकडाऊन’च्या काळात बुधवारी सर्वांनाच एक आनंदाची बातमी मिळाली. ती म्हणजे, भारतीय क्रिकेटपटू आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला इंग्रजी भाषा शिकवणार्‍या ‘एल्सा’ या जागतिक मोबाईल अ‍ॅपचा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर’ घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे, तेव्हा अजिंक्यने स्वतः कबूल केले की, त्याची सुरुवातीला इंग्रजी भाषेवर तितकीशी चांगली पकड नव्हती. मात्र, त्याने त्याच्या या न्यूनगंडावर मात केली. यावरून त्याच्या मेहनती आणि जिद्दी स्वभावाचे दर्शन होतेच. शिवाय मैदानावरही त्याच्या संयमी खेळामुळे अनेकवेळा भारताला त्याने जिंकून दिले आहे. त्याचा मैदानाबाहेरील हा प्रवासही नक्कीच प्रेरणादायी आहे. तेव्हा, मुंबईतील गल्लीबोळातून सर्व जगामध्ये नाव गाजवणार्‍या अजिंक्य रहाणेचा हा प्रवास आज जाणून घेऊया...
 
 
 
अजिंक्य मधुकर रहाणे याचा जन्म एका सामान्य मराठी कुटुंबात झाला. दि. ६ जून १९८८ रोजी आश्वी खुर्द या अहमदनगर जिल्ह्यातील गावामध्ये त्याचा जन्म झाला. त्याचे वडील मधुकर रहाणे आणि आई सुजाता रहाणे यांचे हे कुटुंब संगमनेर तालुक्याच्या चंदनपुरी खेड्यातून डोंबिवलीमध्ये स्थायिक झाले. विशेष म्हणजे, त्याचे वडील हे सचिन तेंडुलकरचे मोठे चाहते. त्यांनी अजिंक्यला वयाच्या सातव्या वर्षीपासूनच क्रिकेटची गोडी लावली. पुढे त्याचेही यामध्ये कुतूहल वाढत गेले. पण, मोठ्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, म्हणून त्यांनी डोंबिवली येथे मॅट विकेटच्या प्रशिक्षण केंद्रात भरती केले. पण, अजिंक्यला योग्य असे प्रशिक्षण तिथे मिळाले नाही.
 
त्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी अजिंक्यला आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रवीण आमरे यांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेण्याचा योग आला आणि तिथून त्याचा खरा प्रवास सुरु झाला. याचदरम्यान त्याने डोंबिवली येथील एस. व्ही. जोशी हायस्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. स्थानिक स्पर्धांमध्ये त्याने चांगली फलंदाजी केली. काही क्लब आणि शाळेच्या स्पर्धांमधील कामगिरी पाहून २००७ मध्ये १९ वर्षांखालील भारतीय संघात त्याची निवड झाली. १९ वर्षांखालील भारतीय संघासाठी हा न्यूझीलंड दौरा विशेष होता. कारण, त्याच्यासोबतच विराट कोहली, इशांत शर्मा, केन विलीयमसन्स, टीम साउदी, ट्रेंट बोल्ट आणि रवींद्र जडेजा हेदेखील पदार्पण करत होते. यांच्यामधूनही अजिंक्यने दोन शतके करून सर्व क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेतले. पुढे २००७ मध्ये मुंबईचा संघ आणि कराचीचा संघ यांच्यामध्ये प्रथम श्रेणीतील सामना खेळवला जाणार होता. योगायोगाने यामध्ये मुंबईचे नेहमीचे खेळाडू नसल्याने अजिंक्य रहाणेची वर्णी लागली. त्याने या संधीचे सोने करत ‘सलामीवीर’ म्हणून उतरत एक शतकदेखील झळकावले. त्याच्या याचा कामगिरीवर या वर्षात ‘इराणी चषक’ आणि ‘लिस्ट ए’मध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्वतःचा एक वेगळाच दबदबा निर्माण केला. २००७-२००८मध्ये त्याने रणजी स्पर्धेत पदार्पण केले.
 
 
 
२००८-२००९चा रणजी स्पर्धेचा हंगाम त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या हंगामामध्ये त्याने तब्बल १०८९ धावा केल्या. याशिवाय त्याच्या या योगदानामुळे मुंबईचा संघ रणजी चषकदेखील जिंकला. सलग पाच रणजी हंगामामध्ये त्याने तीनवेळा हजारांहून अधिक धावा करण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. २०११ मध्ये इराणी चषकमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीवरून त्याची निवड भारताच्या कसोटी संघासाठी करण्यात आली. मात्र, अद्याप त्याचा संघर्ष संपला नव्हता. कारण, त्याला मैदानात उतरवले नव्हते. त्याचवर्षी त्याने एकदिवसीय संघातही पदार्पण केले. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध पदार्पण करत पहिल्या सामन्यामध्ये ४० धावा केल्या, तर याच कामगिरीवर त्याने टी-२०मध्येही पदार्पण केले. पुढे एकदिवसीय आणि टी-२०मध्ये त्याच्या कारकिर्दीमध्ये चढउतार चालू राहिले. इकडे कसोटीमध्ये अखेर १६ महिन्यानंतर २०१३मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले.
 
 
 
निवड केल्यानंतर १६ महिन्यांनी त्याचे सचिन तेंडुलकरसोबत खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले. पण, इतरवेळी प्रथम श्रेणीमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही कसोटीमध्ये मात्र त्याची कामगिरी सुमार राहिली. पहिल्या कसोटी दौरा जरी अपयशी ठरला असला, तरी त्याला पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात संधी देण्यात आली. मात्र, यावेळी त्याने चांगली कामगिरी करत चांगल्या धावा केल्या. पुढे त्याने २०१४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिले शतक झळकावले. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. २०१६मध्ये बीसीसीआयने त्याचे नाव ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी सुचवले होते. एवढेच नव्हे तर कोरोनाच्या प्रादुर्भावातही त्याने गोरगरिबांना मदतीचा हात दिला. त्याच्या खेळाची तुलना ही राहुल द्रविड, सचिन तेंडुलकरसारख्या महान खेळाडूंसोबत नेहमी केली जाते. मैदानाबाहेरही त्याच्या माणुसकीचे आणि सध्या स्वभावाचे अनेकवेळा लोकांना दर्शन घडले आहे. त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा... 

@@AUTHORINFO_V1@@