लाॅकडाऊनमध्ये आफ्रिकेतून ७ दिवसात 'या' पक्ष्यांनी गाठले भारत; केला इतक्या किलोमीटरचा प्रवास

    07-May-2020   
Total Views | 555
bird_1  H x W:  
 
 
 
 

संशोधकांनी या पक्ष्यांच्या शरीरावर 'रेडिओ ट्रान्समीटर' लावले आहे

 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - आफ्रिकेत हिवाळी स्थलांतरासाठी गेलेल्या 'ओनाॅन' नामक मंगोलियन चातक (Mongolian Cuckoo) पक्ष्याने गेल्या परतीच्या प्रवासात सात दिवसांमध्ये ६ हजार ३०० किमी अंतर कापले आहे. सध्या हा पक्षी बांग्लादेशमध्ये आहे. तर 'बयान' नामक पक्षी ५ हजार ८०० किमी अंतर कापून भारतातील कोलकत्तामध्ये दाखल झाला आहे. मंगोलियामधील आपल्या प्रजनन क्षेत्राकडे या पक्ष्यांचा प्रवास सुरू असून 'बर्डिंग बिजिंग' संस्थेचे संशोधक तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. मंगोलियन चातकांचे स्थंलातर मार्ग जाणून घेण्यासाठी संशोधकांनी या पक्ष्यांच्या शरीरावर 'रेडिओ ट्रान्समीटर' लावले आहेत.
 
 
 
 
 
 
मंगोलियन चातक पक्ष्यांचा स्थलांतर मार्ग जाणून घेण्यासाठी खुर्ख बर्ड रिंगिंग केंद्रामध्ये जून, २०१९ मध्ये दोन पक्ष्यांना 'रेडिओ ट्रान्समीटर' लावण्यात आले. 'बर्डिंग बिजिंग' या संस्थेच्या संशोधकांनी हा उपक्रम राबविला. ट्रान्समीटर लावलेल्या पक्ष्यांची नावे स्थानिक शाळेतील मुलांच्य़ा नावावरुन 'ओनाॅन' आणि 'बयान', अशी ठेवण्यात आली. मंगोलियन चातक पक्षी मंगोलियात प्रजनन करुन हिवाळ्यात आफ्रिकेत स्थलांतर करतात. गेल्यावर्षी मंगोलियात हिवाळी हंगाम सुरू झाल्यानंतर त्यांनी आफ्रिकेत स्थलांतर केले होते. आता या दोन्ही पक्ष्यांनी पुन्हा एकदा मंगोलियातील आपल्या प्रजनन क्षेत्राच्या दिशेने स्थलांतर सुरू केले आहे. 'बर्डिंग बिजिंग'संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी 'ओनाॅन'ने आफ्रिकेतील केनियामधून आणि 'बयान'ने सोमिलियामधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
 
 


bird_1  H x W:
 
 
 
या परतीच्या प्रवासाअंतर्गत गेल्या सात दिवसांमध्ये (६ मार्चपर्यंत) 'ओनाॅन' ६ हजार ३०० किमी अंतर कापून बांग्लादेशमधील राजेशाही वनपरिक्षेत्रात दाखल झाला आहे. तर 'बयान'ने ५ हजार ८०० किमी अंतर कापून कोलकत्तामध्ये शिरकाव केला आहे. या दोन्ही पक्ष्यांचा उडण्याचा वेग साधारण ४० किमी प्रतितास इतका आहे. महत्त्वाचे या संदर्भात 'महा MTB' ने 'बर्डिंग बिजिंग'ला विचारले असता त्यांनी सांगितले की, या दोन्ही पक्ष्यांनी आफ्रिकेवरुन उडाल्यानंतर न थांबता अरबी समुद्रावरुन उड्डाण केले आणि भारतात दाखल झाल्यावर ते काही ठिकाणी थांबून हा परतीचा प्रवास करत आहेत. हे दोन्ही पक्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला खुर्खजवळील त्यांच्या प्रजनन क्षेत्रात परततील. या कामात 'बर्डिंग बिजिंग' संस्थेला 'वाईल्डलाईफ सायन्स अॅण्ड काॅन्झर्वेशन सेंटर आॅफ मंगोलिया' (न्यांबा, तुवशी आणि बॅटमुनख) यांची मदत मिळाली आहे.
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121