कनेक्शन आफ्रिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


vicharvimarsh_1 &nbs


एकंदर ४८ किमी एवढ्या परिसरात डोरालेहया नावाचं नवं बंदर जिबूती आणि चीन यांच्या संयुक्त सहकार्याने उभारायला सुरुवात झालेली आहे. चिनी बनावटीचे राक्षसी बुलडोझर्स जिबूतीची खडकाळ, रखरखीत भूमी रात्रंदिवस खरवडून काढत आहेत. चीन हा उद्योग का करीत आहे?

जिबूतीहे नाव कधी ऐकलंय तुम्ही? मजबुती, कलाबुती या छापाचं काही तरी वाटतं ना? पण, ते चक्क एका चिमुकल्या देशाचं नाव आहे. त्याचं अरबी नाव आहे जम्हूरिया-अल्-जिबूतीम्हणजेच जिबूती प्रजासत्ताक. त्याचं क्षेत्रफळ आहे साधारण २३ हजार, २०० चौ. किमी आणि लोकसंख्या आहे अवघी ९ लाख, ४२ हजार. आपल्याकडच्या नगरपरिषदाच कशाला, ग्रुप ग्रामपंचायतीसुद्धा यापेक्षा मोठ्या असतात. पण, समजा या ग्रुप ग्रामपंचायतीचा सरपंच किंवा नगरपरिषदेचा अध्यक्ष त्यांच्यापेक्षा किमान १४०० पट मोठ्या असलेल्या देशात गेला तर? आणि त्या बलवान देशाच्या अध्यक्षाने संपूर्ण राजशिष्टाचार पालन करीत याची भेट घेतली तर? आणि अत्यंत गांभीर्याने वाटाघाटी करून, ‘आता उभय देश स्टॅ्रटेजिक पार्टनर आहेत,’ असं घोषित केलं तर? केलं तर, हा आता भविष्यकाळ राहिलेला नाही. नोव्हेंबर २०१७ मध्ये जिबूतीचे राष्ट्राध्यक्ष ईस्माईल उमर ग्विले यांनी चीनला भेट दिली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांचं अत्यंत थाटात स्वागत केलं. उभय राष्ट्राध्यक्षांमधल्या राजकीय आणि व्यापारी वाटाघाटीनंतर असं घोषित करण्यात आलं की, ‘चीन आणि जिबूती हे डावपेचात्मक सहकारी मित्र देश आहेत.आपल्या एखाद्या जिल्ह्याएवढ्या असणार्‍या जिबूती देशाला अवाढव्य आणि सर्वच दृष्टींनी बलवान असलेल्या चीनने समान मित्रदेशाचा सन्मान द्यावा?


याचं कारण आहे जिबूती देशाचं भौगोलिक स्थान. हे नीट समजून घेण्यासाठी आपल्याला जगाचा नकाशा पाहावा लागेल. आपल्या भारत देशाच्या पश्चिम किनार्‍याच्या थेट पश्चिमेला किंवा थोड्या खाली नैऋत्येला आपल्याला दिसतो आफ्रिका खंड.
पराम्हणजे पूर्व आणि अपराम्हणजे पश्चिम. भारताच्या पश्चिमेला असणारी अपरिकाम्हणजेच आधुनिक आफ्रिका. हिंदी महासागराचा एक फाटा आग्नेयेकडून वायव्येकडे आत घुसला आहे, त्यालाच म्हणतात तांबडा समुद्र.आशिया आणि आफ्रिका खंडांना त्यानेच विभागलं आहे. त्याच्या वरच्या बाजूला आहे अरेबियन द्विपकल्प. ते आशिया खंडात येतं, तर खालच्या बाजूला आहेत सोमालिया, इथियोपिया, ईरिट्रिया आणि इजिप्त हे देश; ते आफ्रिका खंडात येतात.


हिंदी महासागर जिथे आशिया आणि आफ्रिका खंडांच्या मधल्या बेचक्यातून आत घुसतो
, तिथे त्याला म्हणतात इडनचं आखात.मूळ अरबी नाव आदन.हेदेखील फार महत्त्वाचं ठिकाण. कारण, पूर्वेकडून येऊन तांबड्या समुद्रात शिरणारं प्रत्येक जहाज इडनच्या किल्ल्यावरच्या तोफांच्या मार्‍यात यायचं. त्यामुळे जगातल्या सगळ्या धूर्तपणाचा अर्क असलेल्या इंग्रजांनी ते आपल्या ताब्यात आणलं. इंग्रज आणि फ्रेंच यांची सत्तास्पर्धा फार तीव्र होती. इडन इंग्रजांनी बळकावलं म्हटल्यावर फ्रेंचांनी जिबूतीवर कब्जा बसवला. इडनचं आखात जिथे संपतं आणि रीतसर तांबडा समुद्र सुरू होतो, त्या अगदी नाक्यावर सोमालिया, इथियोपिया आणि ईरिट्रिया यांच्या अगदी बेचक्यात वसलंय बंदर जिबूती. मुळात हे तिन्ही देश एकत्रच होते. त्यांना इथियोपिया आणि त्याही अगोदरच्या काळात अ‍ॅबिसीनिया असं म्हटलं जात असे. अ‍ॅबिसीनियाचाच अरबी-फारसी-मराठी अपभ्रंश म्हणजे हबसाण!


अठराव्या शतकात फ्रेंचांनी तांबड्या समुद्रालगतचा आफ्रिकेचा जवळपास संपूर्ण प्रदेश व्यापला. त्याला त्यांनी नाव दिलं
फ्रेंच सोमालीलॅण्ड.यावर उत्तर म्हणून इंग्रजांनी भूमध्य समुद्रातून तांबड्या समुद्रात प्रवेश करण्याचा मार्ग जो इजिप्त आणि पॅलेस्टाईन, त्यावर प्रभुत्व मिळवलं. पुढे तर इजिप्तमधून इंग्रजांनी सुवेझ कॅनॉल बांधला आणि फ्रेंचांवर कायमची मात केली. दुसर्‍या महायुद्धानंतर इंग्रज आणि फ्रेंचांना जगभरच्या आपल्या वसाहती सोडाव्या लागल्या. इथियोपिया, सोमालिया स्वतंत्र झाले. पण, जिबूतीवरचा फ्रेंच ताबा १९७७ पर्यंत टिकला. त्यावर्षी सार्वमत घेण्यात आलं. जिबूती शहरासह आसपासच्या जिबूतीयाच नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रदेशातले ६० टक्के लोक सोमाली भाषा बोलतात. त्यामुळे जिबूती आपल्यात सामील होईल, असं सोमालियाला वाटत होतं. प्रत्यक्षात जिबूतीच्या नागरिकांनी सिंगापूरप्रमाणे स्वतंत्र राहण्यास बहुमताने पसंती दिली. जिबूतीच्या साडेनऊ लाख लोकसंख्येत ९४ टक्के लोक मुसलमान, सहा टक्के लोक ख्रिश्चन आहेत. बाजूच्या इथियोपियात यादवी होऊन एक भूभाग ईरिट्रियाया नावाने स्वतंत्र झाला. सोमालियातही फार शांतता आहे, असं नाही. पण, मधल्या चिमुकल्या जिबूतीत पूर्ण शांतता आहे. देश प्रजासत्ताक असला आणि अध्यक्ष ईस्माईल उमर ग्विले हे लोकनियुक्त असले तरी त्यांची सत्ता हुकूमशाही छापाचीच आहे.


जिबूती हवेच्या हिशोबात वाळवंटी नसला
, तरी एकंदर रखरखीतच देश आहे. देशाच्या उत्तर भागात थोड्या भाज्या आणि फळं पिकतात. पण, त्यांचं प्रमाण फक्त तीन टक्के आहे. जिबूतीत तेल सापडलेलं नाही. मग हा देश कोणत्या महसुलावर जगतो? पुन्हा नकाशा पाहा. हिंदी महासागरातून दोनच सागरी मार्ग पश्चिमेकडे जातात. एक इराणच्या आखातातून. तो मस्कत, अबुधाबी, दुबई, दोहा, कतार, बहरीन, कुवेत मार्गे बसर्‍यापर्यंत जातो आणि खालचा मार्ग जिबूती, मसावा, पोर्ट सुदान, जेद्दा, सुवेझ, पोर्ट सईद करीत अलेक्झांड्रियापर्यंत जातो. संपूर्ण जगातले हे सर्वाधिक गजबजलेले सागरी मार्ग आहेत. रस्त्यांवरून हजारो चारचाकी नि दुचाकी जाव्यात, तशी दिवसाला शेकडो मालवाहू जहाजं जिबूतीवरून पुढे निघत असतात. त्या जहाजांपासून मिळणारा प्रचंड महसूल हेच जिबूतीचं मुख्य उत्पन्न आहे. शिवाय जिबूतीपासून थेट इथियोपियाची राजधानी आदिस अबाबापर्यंत उत्तम रेल्वेमार्ग आहे.



आदिस अबाबा हे पूर्व आफ्रिकेतून केनिया
, युगांडा, सोमालिया अशा फार मोठ्या भूभागाला जोडणारं एक फारच महत्त्वाचं शहर आहे. आता एवढे सगळे व्यापारी मार्ग जिथून पुढे जातात, ते ठिकाण व्यापाराइतकंच किंवा व्यापारामुळेच महत्त्वाचं लष्करी केंद्रही आपोआपच बनणार. जिबूती फ्रान्सच्या पंजाखालून स्वतंत्र झाला असला तरी फ्रान्सचे आणि त्याचे राजनैतिक संबंध अगदी उत्तम आहेत. जिबूतीचं स्वतःचं सेनादल छोटं असलं तरी अत्याधुनिक आहे. शिवाय आजही फ्रेंच लष्कराचा एक स्वतंत्र तळ तिथे आहेच. कॅम्प लेमोनिएनावाचा एक फ्रेंचांनी सोडून दिलेला जुना लष्करी तळ आहे. सन २००२ पासून अमेरिकन सेनेने जिबूती सरकार आणि फ्रान्स सरकार दोघांशीही सल्लामसलत करून तो आपल्या ताब्यात घेतला आहे. अमेरिकन सैन्याच्या गुप्त कमांडो कामगिर्‍या इथून चालतात. त्याचप्रमाणे सोमालियन चाचे आणि येमेनी अरब अतिरेकी यांच्यावर हल्ले करणारी मानवविरहीत ड्रोन विमानं याच तळावरून उडवली जातात. याबरोबरच युरोपियन व्यापारी महासंघाबरोबर जिबूतीच्या झालेल्या करारानुसार इथे जर्मन आणि स्पॅनिश सेनेच्या काही तुकड्याही आहेत. समुद्रातल्या सोमालियन चाचेगिरीच्या बंदोबस्तासाठी त्या सदैव टेहळणी करत असतात.


अशा प्रकारे ज्या जिबूती बंदरात आणि परिसरात फ्रेंच
, अमेरिकन, जर्मन आणि स्पॅनिश सेना तैनात आहेत, तिथेच अगदी त्यांच्या नाकाखाली चीन आता एक प्रचंड, अत्याधुनिक मालवाहू बंदर उभं करीत आहे. एकंदर ४८ किमी एवढ्या परिसरात डोरालेहया नावाचं नवं बंदर जिबूती आणि चीन यांच्या संयुक्त सहकार्याने उभारायला सुरुवात झालेली आहे. स्थानिक कामगार आणि मुख्यतः ब्रिटनमधून प्रशिक्षित होऊन आलेले चिनी इंजिनिअर्स जिबूतीमध्ये राबत आहेत. चिनी बनावटीचे राक्षसी बुलडोझर्स जिबूतीची खडकाळ, रखरखीत भूमी रात्रंदिवस खरवडून काढत आहेत. चीन हा उद्योग का करीत आहे? सुमारे एक हजार कोटी डॉलर्स एवढ्या खर्चाचा डोरालेह प्रकल्प चीन का उभारत आहे? हे समजून घेण्यासाठी पुन्हा जगाचा नकाशा पाहा. पाकिस्तानात कराचीच्या शेजारी ग्वादार हे अवाढव्य बंदर उभारून चीनने हिंदी महासागरात तर प्रवेश मिळवलाच आहे; शिवाय इराणच्या आखाताकडे जाणार्‍या सागरी मार्गावरही त्याचा थेट संपर्क निर्माण झाला आहे. याला शह म्हणून भारताने ग्वादारच्या शेजारीच, पण इराणच्या प्रदेशात नि इराणच्या सहकार्याने चाबहार बंदर योजना कार्यान्वित केली आहे.


आता तांबड्या समुद्राकडून जाणार्‍या व्यापारी मार्गावर ताबा असावा किंवा सभ्य भाषेत आफ्रिकेमार्फत अरब देश आणि भूमध्य समुद्राशी संपर्क असावा म्हणून चीन डोरालेह बंदर उभारतोय. आता ज्या मार्गाने मालवाहू जहाजं जातात
, त्या मार्गाने सैनिकी जहाजं जाऊ नयेत, अशी काही त्याला कुणी शपथ घातलेली नाही. मग आता ड्रॅगनच्या या नव्या चालीला पश्चिमी देश आणि भारतदेखील कसं उत्तर देणार? विना उद्योग घरी बसलेल्या आणि एकमेकांची मुलाखत घेऊन शिळ्या कढीला ऊत आणण्याचा विफल प्रयत्न करणार्‍या नेत्यांचा कार्यक्रम बघत वेळ वाया घालवण्यापेक्षा, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा हा विशाल पट समजून घ्या. तुमची समजूत आणि जाणीव समृद्ध होईल.


@@AUTHORINFO_V1@@