पंतप्रधानांनी घेतला कृषीक्षेत्राचा आढावा, व्यापक बदलांचे संकेत

    02-May-2020
Total Views | 50

PM Modi_1  H x

पंतप्रधानांनी घेतला कृषीक्षेत्राचा आढावा, व्यापक बदलांचे संकेत


नवी दिल्ली: देशातील कृषीक्षेत्रात व्यापक प्रमाणात बदल करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीमध्ये कृषी विपणन क्षेत्रातील सुधारणा, कृषीव्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना सुलभ पतपुरवठा आदी विषयांवर चर्चा झाली. त्याचप्रमाणे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या अन्य बैठकीत आणखी एक आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.

कोरोना संकटानंतरच्या अर्थव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध मंत्रालयांसमवेत आढावा बैठका घेत आहेत. कृषीक्षेत्राविषयीच्या बैठकीस कृषीमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीत शेतीसाठी देशव्यापी एकाच प्रकारचा चौकटीबद्ध कार्यक्रम तयार करण्याविषयी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यामुळे शेतीक्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे शक्य होणार आहे. जैवतंत्रज्ञान, त्याच्या वापराचे फायदे आणि तोटे, उत्पादनवार होणारा परिणाम अभ्यासणे. छोट्या शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतीक्षेत्रास खासगी गुंतवणूक आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये कृषी विपणन क्षेत्रातील सुधारणा, कृषीव्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना सुलभ पतपुरवठा आदी विषयांवरही सविस्तर चर्चा झाली.

 
 

बैठकीचा मुख्य जोर हा विद्यमान कृषी विपणन क्षेत्रात रणनितीपूर्वक गुंतवणूक करणे आणि वेगवान सुधारणा घडविणे यावर होता. कृषीक्षेत्राच्या पायाभूत चौकटीस मजबूत करण्यासाठी पतपुरवठा वाढविणे, किसान क्रेडीट कार्ड लाभधारकांना नियमित पतपुरवठा सुरु ठेवणे. आंतरराज्य व राज्यांतर्गत कृषी व्यापारात सुलभता आणणे, इ – नामसारख्या ऑनलाईन व्यवस्थांचा विस्तार करण्यावर पुढील काळात भऱ देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भारताच्या विशेष नाममुद्रा (ब्रँड) निर्माण करण्यासाठी आवश्यक ती महामंडळे स्थापन करणे, कृषी क्लस्टर्स, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आदी विषयांवरही चर्चा करण्यात आली. कृषी आणि कृषीआधारीत उद्योगांना नवे स्वरूप देण्यासाठी मोदी सरकारतर्फे आगामी काळात विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.

 

आणखी एक आर्थिक पॅकेज जाहिर होण्याची शक्यता

पंतप्रधानांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत घेतलेल्या अन्य एका बैठकीत देशातील उद्योग क्षेत्राच्या स्थितीविषयी चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते. टाळेबंदीचा फटका अनेक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे, त्यामुळे सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी विविध क्षेत्रांकडून होत आहे. बैठकीमध्ये त्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे येत्या काही दिवसात मोदी सरकारकडून आणखी एक आर्थिक पॅकेज जाहिर केले जाऊ शकते.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121