कर्तबगार श्रेयस अय्यर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2020
Total Views |


shreyas iyer_1  



भारतीय संघाची मधली फळी मजबूत करून संघाला संकटसमयी तारणार्‍या मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरच्या आयुष्याची संघर्षमय कहाणी सांगणारा हा लेख...

 



भारतीय संघ हा क्रिकेट विश्वात सध्याच्या घडीला सर्वात बलवान आणि तगडा संघ म्हणून ओळखला जातो. क्रिकेटमधील तीन्ही प्रकारांत मजबूत संघ असणारा भारतीय संघ विश्वचषकाचा प्रमुख दावेदार मानला जातो. आगामी ‘टी-२०’ विश्वचषकासाठी भारतीय संघही कसून तयारी करत आहे. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेतून भारताला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीत संघाला सावरण्यासाठी एक मजबूत फलंदाज नसल्याने न्यूझीलंडविरूद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. विश्वचषक स्पर्धेला आता जवळपास वर्ष उलटत आले आहे. मधली फळी मजबूत करण्यासाठी भारताने आत्तापर्यंत अनेक फलंदाजांना संधी दिली. मात्र, सरासरीने खेळण्यात अनेक जण अपयशी ठरले. त्यामुळे भारतीय संघाने मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरला आपल्या संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला. भारताच हा प्रयोग यशस्वीही ठरला. मुंबईकर खेळाडू असणार्‍या या श्रेयसने स्वतःचे अस्तित्व तर सिद्ध केलेच. मात्र, संघालाही अनेकदा संकटसमयी तारले. अनेक क्रिकेट समीक्षकांनीही मधल्या फळीत श्रेयसच यौग्य असल्याचा निर्वाळा दिला. श्रेयसचे करावे तितुके कमीच असे मत अनेकांनी व्यक्त केले. भारतीय संघाची मधली फळी मजबूत करणार्‍या या श्रेयसची ख्याती सर्वत्र जगभर पसरली आहे. आजच्या घडीला भारतीय संघातील एक उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू म्हणून तो प्रसिद्ध असला तरी येथपर्यंत पोहोचण्यासाठी श्रेयसने आपल्या जीवनात जीवापाड मेहनत केली आहे.
 

श्रेयस संतोष अय्यर याचा जन्म ६ डिसेंबर १९९४ रोजी मुंबईत झाला. मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. येथील प्रत्येक गल्लीबोळात हा खेळ आवर्जून खेळला जातो. श्रेयसलाही अगदी लहानपणापासूनच खेळाची आवड होती. क्रिकेट, फुटबॉल आदी मैदानी खेळ खेळण्यासाठी तो लहानपणापासूनच मुलांसोबत जाई. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच श्रेयसने खेळण्यास सुरुवात केली. श्रेयसचे वडील संतोष अय्यर हे क्रिकेटशौकीन होते. श्रेयसची खेळातील आवड पाहून त्यांनी यासाठी त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. उद्योजक असणारे हे संतोष श्रेयसला मैदानावर नित्यनियमाने स्वतः घेऊन जात असत. उद्योजक असल्याने यासाठी स्वतंत्र वेळ काढणे हे कठीण जात असे. मात्र त्यानंतरही त्यांनी याकडे दुर्लक्ष न करता श्रेयसला सरावासाठी मैदानावर घेऊन जाण्याकडे अधिक प्राधान्य दिले. श्रेयस लहानपणापासूनच क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही खेळाचा सराव करत असे. वयाच्या अकराव्या वर्षीच श्रेयस अय्यरला माजी क्रिकेटपटू आणि वरिष्ठ क्रिकेट प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांचे मार्गदर्शन लाभले. श्रेयसची क्रिकेट खेळण्याची अनोखी शैली पाहून अनेक प्रशिक्षकांनी संतोष अय्यर यांना श्रेयसला क्रिकेटमध्येच करिअर घडविण्याचा सल्ला दिला. श्रेयस दोन्ही खेळ खेळत असल्यामुळे क्रिकेटमध्ये करिअर घडवायचे की फुटबॉलमध्ये करिअर घडवायचे, हा प्रश्न सध्या त्याच्यापुढे होता. मात्र, अनेकांनी त्याला क्रिकेटचा सल्ला दिल्याने त्याने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.
 
 
अनेकांच्या सांगण्यावरून क्रिकेटमध्ये करिअऱ घडविण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रेयसने मागे वळून पाहिले नाही. यासाठी दिवस-रात्र कसून सराव केला. दिवस, रात्र ऊन पाऊस आदी कसलीही तमा न बाळगता श्रेयसने कसून क्रिकेटचा सराव करण्यास सुरुवात केली. क्रिकेटचा सराव सुरु असला तरी श्रेयसने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही त्याने यशस्वीरित्या सुरु ठेवले. मुंबईत एका सरावसामन्यादरम्यान अनेक प्रशिक्षकांवर श्रेयसने आपली छाप पाडली. त्याचे कौशल्य पाहून त्याला रणजी क्रिकेटमध्ये स्थान देण्यात आले. रणजी सामन्यामध्येही त्याच्या उत्तम कामगिरीचा धडाका सुरु राहिल्यानंतर त्यांला ‘अंडर-1’ संघात स्थान देण्यात आले. येथे लगातार पाच अर्धशतक ठोकण्याची कामगिरी केल्यानंतर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिअल्स संघाकडून खेळताना श्रेयसने चांगली कामगिरी केल्यानंतर संघाचे नेतृत्वही त्याच्याकडे सोपविण्यात आले. यानंतर कर्णधार विराट कोहलीने त्याची निवड भारतीय संघात केली आणि श्रेयस आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू म्हणून जगभरात प्रसिद्धीस आला. श्रेयस हा सध्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असून अनेकदा त्याने भारतीय संघाला संकटसमयी तारण्याची किमया केली आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रेयस उत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा सर्व भारतीयांना असून पुढील वाटचालीसाठी श्रेयसला दै, मुंबई तरुण भारतकडून शुभेच्छा.
 

 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@