मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य तसेच केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर सर्व प्रकारच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर काही महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता या पार्श्वभूमीवर एमपीएससीचा पेपर लांबणीवर पडला आहे. एमपीएससीची परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
६ एप्रिल आणि १० मे रोजी रोजी होणाऱ्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या दोन्ही परीक्षा आता लॉकडाऊन स्थिती आणि एकूणच करोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे पुढे ढकलण्यात येत असल्याचे आयोगाने आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. या दोन्ही परीक्षांच्या सुधारित तारखा परिस्थिती नियंत्रित आल्यावर पुढच्या काही काळात आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येतील. तसेच परीक्षेच्या तारखा निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर एस.एम.एस. द्वारे अवगत करण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.