मुंबई : राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा १३५वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे ज्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांचा आजार बराही झाला आहे. कोरोना बरा होतो हे लक्षात घेण्याची गरज आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. गुरूवारी झालेल्या बैठकीत आम्ही महत्त्वाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. संकटाच्या काळात डॉक्टरांनी रुग्णालये, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये, अस आवाहनही त्यांनी राज्यातील खासगी डॉक्टरांना केले आहे.
अनेक ठिकाणी अनेक खाजगी रुग्णालये भीतीपोटी बंद केलेत. हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासमान असतात. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी, आपण अशा परिस्थितीत असंवेदनशीलता दाखवली तर सामान्य जनतेने कोणाकडे जावे ? असा सवाल टोपे यांनी केला. आम्ही सर्वांना सुचित केले आहे रूग्णालये सुरू राहतील. कोणालाही त्रास होणार नाही. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी. कोरोना बाजूला ठेवावा. त्याव्यतिरिक्त आणखीही आजार आहेत. काही आपात्कालिन परिस्थितीत जर कोणाला काही मदत हवी असेल तर त्यांनी कोणाकडे जावे. त्यांनी आपली क्लिनिकही सुरू ठेवावी, असे टोपे म्हणाले.