लिओनार्दो : एक चिरंतन आकर्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


लिओनार्डो _1  H



‘लुव्र’ या वस्तुसंग्रहालयात चालू असलेले एक प्रदर्शन नुकतेच म्हणजे २४ फेब्रुवारी रोजी संपले. हे प्रदर्शन होतं सर्व कलावंतांचा अनभिषिक्त सम्राट असणार्‍या लिओनार्दो-द-विंची याच्या चित्रांचं आणि वस्तूंचं...


फ्रान्सची राजधानी पॅरिस इथल्या
‘लुव्र’ या वस्तुसंग्रहालयात चालू असलेले एक प्रदर्शन नुकतेच म्हणजे २४ फेब्रुवारी रोजी संपले. २४ ऑक्टोबरपासून हे प्रदर्शन सुरू होते. पहिल्याच दिवशी हे प्रदर्शन पाहायला २ लाख ६० हजार लोक तिकीट काढून आले होते. हे प्रदर्शन कसं भरवावं, त्यात कोणकोणती चित्रं आणि अन्य वस्तू कसकशा मांडाव्यात, याबाबात ‘लुव्र म्युझियम’चे तज्ज्ञ गेली दहा वर्षे विचार करीत होते. कारण, ते प्रदर्शन होतं सर्व कलावंतांचा अनभिषिक्त सम्राट असणार्‍या लिओनार्दो-द-विंची याच्या चित्रांचं आणि वस्तूंचं. प्रयोजन होतं लिओनार्दोच्या पाचशेव्या पुण्यतिथीचं. २ मे, १५१९ या दिवशी लिओनार्दो फ्रान्समध्ये अम्बवाईझ या ठिकाणी मरण पावला. म्हणजे हे प्रदर्शन खरंतर मे २०१९ मध्येच सुरू व्हायला हवं होतं. पण, लिओनार्दोची मूळ चित्रं किंवा वस्तू इतर संग्रहालयं, व्यक्ती यांच्याकडून मिळवणं, यात वेळ गेला. तरी ‘साल्वातोर मुंडी’ हे चित्र खूप प्रयत्न करूनही मिळालं नाही.



तुम्हाला आठवत असेल
, तर हे चित्र २०१७ साली तब्बल ४५० दशलक्ष डॉलर्सना विकलं गेलं होतं. ‘ख्रिस्टीज’ या जगप्रसिद्ध लिलावगृहाच्या न्यूयॉर्कमधल्या लिलावात हे चित्र सौदी अरेबियाचे सांस्कृतिकमंत्री राजपुत्र बद्र-बिन-अब्दुल्ला यांनी घेतलं होतं. सध्या ते सौदी युवराज महंमद-बिन-सलमान यांच्या ताब्यात आहे. त्यांच्याकडून ते प्रदर्शनापुरतं मिळवावं म्हणून बरेच प्रयत्न झाले. पण, सलमान यांनी दाद दिली नाही. ‘चित्रं’ म्हणजे ‘पेंटिंग्ज’पुरतं म्हणायचं तर लिओनार्दोने आपल्या ६७ वर्षांच्या आयुष्यात फक्त २० चित्रं काढली किंवा पूर्ण केली असं म्हणूया. या २० पैकी ११ चित्रं इथे मांडण्यात आली होती. त्यापैकी पाच चित्रं ‘लुव्र म्युझियम’च्या स्वत:च्याच मालकीची आहेत. अन्य चित्रं इटलीतील ‘व्हेनिस म्युझियम’, लंडनचं ‘ब्रिटिश म्युझियम’ आणि खाजगी संग्राहकांकडून मिळवण्यात आली. चित्रं, रेखाटनं, टिपणं अशा लिओनार्दोच्या एकंदर १६२ वस्तू मांडण्यात आल्या होत्या. त्यात ब्रिटनची राणी एलिझाबेथ आणि कॅथलिक संप्रदायाचं सर्वोच्चधर्मपीठ व्हॅटिकन यांच्या खाजगी संग्रहालयातल्या वस्तूसुद्धा होत्या.



हे सगळं अद्भुत वाटावं असं आहे
. शहर पॅरिस, तिथलं ‘लुव्र म्युझियम’, त्यातल्या लिओनार्दोसह जगभरच्या कलावंतांच्या हजारो कलाकृती आणि स्वत: लिओनार्दो हे सगळ अविश्वसनीय, अद्भुत वाटावं, असं आहे. सर्व प्रकारच्या कलांची पॅरिस ही जागतिक राजधानी आहे, असं म्हणायला हरकत नाही. चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट, साहित्य यांच्याशी संबंधित कार्यक्रम पॅरिसमध्ये अखंड सुरू असतात. त्यात जगभरचे कलावंत हजेरी लावत असतात. आणि हे सगळं गेली ५०० वर्षं किंवा त्याहूनही अधिक काळ सतत सुरू आहे. विविध क्षेत्रातल्या कलावंतांना आदरपूर्वक आपल्या राज्यात आमंत्रित करणं आणि त्यांना आश्रम देणं, हे कार्य फ्रान्सचे राजे गेली पाचशेहून अधिक वर्षे करीत आहेत. इ.स.१५१५ साली फ्रान्सचा सम्राट फ्रान्सिस पहिला याने इटलीतील मिलान शहर जिंकलं. लिओनार्दो मिलानचाच रहिवासी होता. आता ख्रिश्चन राजे आणि मुसलमान सुलतान यातला फरक पाहा. कोणतंही शहर जिंकलं की, ते मनसोक्त लुटायचं. तिथल्या प्रतिष्ठित नागरिकांना कैद करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करायची किंवा त्यांना ठार करायचं. शक्य तितक्या स्त्री-पुरुषांना पकडून गुलाम बनवायचं किंवा सरसकट सर्वांचीच कत्तल उडवायची, याला ‘कत्ल-ए-आम’ असा सुलतानांचा लाडका शब्द होता. सरतेशेवटी आग लावून ते शहर पार बेचिराख करून टाकायचं, असा सुलतानी खाक्या होता. फ्रान्सिसने लिओनार्दोचं डोकं न उडवता उलट त्याला राजश्रय दिला. लिओनार्दो फ्रान्समध्ये अम्बवाईझ या शहरामध्ये राहू लागला.



लिओनार्दो
-द-विंची हे विधात्याला पडलेलं एक अद्भुत स्वप्न होतं, असं म्हटलं पाहिजे. असा ‘पुरुषोत्तम’ शतकाशतकातून एखादाच जन्मतो. इटली देशातल्या फ्लोरेन्स राज्यातल्या विंची या गावी एका वकिलाच्या घरात सन १४५२ साली लिओनार्दो जन्मला. साधारणपणे कलावंतांचं गणित, विज्ञान अशा विषयांशी वाकडं असतं. पण, लिओनार्दोच्या बाबतीत दैव इतकं मेहेरबान होतं की, तो म्हणेल त्या क्षेत्रातलं ज्ञान त्याला सहजपणे आत्मसात होत असे. लिओनार्दो शरीरसौष्ठव आणि मर्दानी देखणेपणासाठी प्रसिद्ध होता. तो शिल्पकार होता, चित्रकार होता, आर्किटेक्ट होता, इंजिनिअर होता, भौतिकशास्त्रज्ञ होता आणि गणिततज्ज्ञही होता. गॅलिलिओ, बेकन आणि देकार्ते या प्रख्यात तत्त्वज्ञ, वैज्ञानिकांनी त्याच्या नंतरच्या काळात जे काही वैज्ञानिक चिंतन मांडलं, त्याचा पाया लिओनार्दोने तयार करून ठेवला होता.



मानवी जीवनातले योगायोग किती गंमतीदार असतात पाहा
. लिओनार्दोने अनेक राजे, सरदार यांच्याकडे विविध अधिकारपदांवर नोकर्‍या केल्या. काही काळ तो इटलीच्या ‘बोर्जिया’ नामक सरदार घराण्यात नोकरीला होता. सरदार रॉड्रिगो बोर्जिया हा पुढे ‘सहावा अलेक्झांडर’ या नावाने चक्क ’पोप’ म्हणजे कॅथलिक धर्मपंथाचा सर्वोच्चप्रमुख बनला. हा रॉड्रिगो आणि त्याचा मुलगा सीझर बोर्जिया हे कमालीचे सत्तालोभी, धनलोभी आणि स्त्रीलंपट होते. सत्ता-संपत्ती आणि बायका मिळवण्यासाठी त्यांनी तत्कालीन युरोपात नुसता हैदोस घातला होता. लढाया, कट-कारस्थानं, विषप्रयोग, बोर्जिया पिता-पुत्रांना बायका पुरवून अधिकारपदं मिळवण्याची खटपट, असल्या गलिच्छ प्रकारांनी प्रजा हैराण होऊन गेली होती. या सीझर बोर्जियाने लिओनार्दोला आपल्या सैन्याचा प्रमुख आर्किटेक्ट आणि इंजिनिअर नेमलं होतं. लिओनार्दोने त्या अधिकारात काही उत्कृष्ट लष्करी नकाशे बनवले. ते आजही उपलब्ध आहेत. म्हणजे लिओनार्दोला युद्धशास्त्र या विषयातही उत्कृष्ट गती होती.



आजच्या भाषेत ज्याला
‘सुपर कॉम्प्युटर’ म्हणावं, असा हा लिओनार्दो सन १५१५ साली सम्राट फ्रान्सिसच्या पदरी आला नि मिलान शहर सोडून फ्रान्समध्ये अम्बवाईस शहरात राहायला आला. असं म्हटलं जातं की, ‘मोनालिसा’ हे चित्र त्याने तिथेच सन १५१७ साली पूर्ण केलं. मोनालिसा हे चित्र जगातल्या आज अस्तित्त्वात असलेल्या सर्व चित्रांचा अनभिषेक्त सम्राट समजलं जातं. ते अशा रीतीने आपोआपच फ्रान्सच्या मालकीचं झालं. आता ‘लुव्र’ या अद्भुत म्युझियमच्या उभारणीकडे पाहू. कित्येक जण त्याचा स्पेलिंगनुसार उच्चार ‘लुवर’ असा करतात. पण मूळ फ्रेंच उच्चार ‘लुव्र’ असा आहे. (मराठीत आपण तीव्र शब्द उच्चारतो, त्या चालीवर). बाराव्या शतकात सीन नदीच्या उजव्या काठावर फिलीप या राजाने एक किल्ला बांधला. सन १५४६ साली सम्राट फ्रान्सिस पहिला याने किल्ल्याला राजवाड्याचं रूप दिलं. सन १६८२ साली सम्राट चौदावा लुई याने आपला मुक्काम व्हर्साय इथल्या नव्या राजवाड्यात हलवला.



पण फिलीपच्या वेळेपासूनच्या अनेक राजांनी जमवलेल्या असंख्य कलावस्तू त्याने
‘लुव्र’मध्येच ठेवल्या. सन १६९२ साली शिल्पं, चित्रं आणि हस्तलिखितं यांचा रीतसर अभ्यास करणार्‍या अकादम्या स्थापन झाल्या. सन १६९९ मध्ये या अकादम्यांमधल्या प्रशिक्षित अभ्यासकांनी ‘लुव्र’मधल्या प्रत्येक कलावस्तूंचा पद्धतीशीर अभ्यास सुरू केला. सन १७८९ मध्ये सुप्रसिद्ध फ्रेंच राज्यक्रांती झाली. राजा सोळावा लुई, राणी मारी आंत्वानेत (इंग्रजी उच्चार-मेरी अँटोनिट)यांच्यासह अनेक सरदारांची मुंडकी गिलोटिनखाली छाटली गेली. देशभर क्रांतिकारकांनी धामधूम उसळून दिली. पण, हे क्रांतिकारकदेखील कलेचे रसिक होते. त्यांनी ‘लुव्र’ राजवाडा न लुटता उलट, त्यातल्या कलावस्तूंची नीट मांडणी करून त्याला म्युझियमचं रुप द्यावं आणि आपला हा समृद्ध कलावारसा सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी खुला करावा, असा ठरावच संमत केला. त्यानुसार १० ऑगस्ट १७९३ या दिवशी ‘लुव्र वस्तुसंग्रहालय’ आम जनतेला खुलं झालं. पहिल्याच दिवशी तिथे ५३७ चित्रं आणि अन्य कलावस्तू मांडण्यात आल्या. त्यात सतत भर पडत गेली.



नेपोलियन बोनापार्ट हा सुरुवातीला या क्रांतिकारक किंवा लोकशाही सरकारच्या म्हणजे लोकनियुक्त फ्रेंच सरकारच्या सैन्यातला तोफखान्यावरचा अधिकारी होता
. १७९४ पासून फ्रान्सने युरोपियन लढाया सुरू केल्या. जिंकलेल्या प्रदेशांतल्या कलावस्तू नेपोलियन काळजीपूर्वक हस्तगत करून ‘लुव्र’मध्ये आणून जमा करीत असे. १७९८ मध्ये नेपोलियन फ्रान्सचा सर्वोच्च सेनापती बनला. त्याने इजिप्तवर मोहीम काढली. जनरल नेपोलियन स्वारीवर जाताना सैन्य, तोफा, बंदुका यांबरोबरच इतिहासतज्ज्ञ आणि कलातज्ज्ञ यांची एक मोठी टोळीही घेऊन गेला. या लोकांनी असंख्य कलावस्तू तुर्कस्तान आणि इजिप्तमधून आणून ‘लुव्र’मध्ये दाखल केल्या. ही एकप्रकारे चोरी किंवा लूटच होती. पण, तरी मुसलमान सुलतानांच्या सगळ्याचा विद्ध्वंस करण्यापेक्षा हे बरं म्हणायचं. ही चोरी पूर्ण पचली नाही. सन १८१५ साली वॉटर्लूच्या रणमैदानावर नेपोलियनचा पूर्ण पराभव झाल्यावर अनेक कलावस्तू फ्रान्सला झक्कत परत कराव्या लागल्या.



पण
, तरीही आज ‘लुव्र’मध्ये असंख्य कलावस्तू आहेत, त्यांची ते उत्तम काळजी घेतात. सुमारे ७ लाख, ८२ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भूमीवर उभ्या असलेल्या ‘लुव्र म्युझियम’ला दरवर्षी सुमारे ९० लाख, ६० हजार प्रेक्षक भेट देतात. २००४ साली ‘लुव्र म्युझियम’च्या संचालकांनी ‘सॅटेलाईट म्युझियम’ ही एक अभिनव कल्पना राबवली. पॅरिसमधल्या मुख्य म्युझियमसह आणखी सात फ्रेंच शहरांमध्ये ‘लुव्र’च्या शाखा सुरू करण्यात आल्या. २०१७ साली अबुधाबी शहरात आणि २०१८ मध्ये इराणची राजधानी तेहरान शहरात ‘लुव्र’च्या शाखा सुरू झाल्या. जगभरचे कला रसिक ‘लुव्र’च्या या नवनवीन उपक्रमांवर खूश आहेत. आपल्याला याबाबतीत बरीच मजल मारायची आहे. संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट या संदर्भात आपल्याकडे बरी जाणकारी आहे. पण, चित्रकला आणि शिल्पकला यांचा आस्वाद कसा घ्यायचा असतो, हेच आपल्याकडे लोकांना समजत नाही. जाण वाढवायला भरपूर वाव आहे.

@@AUTHORINFO_V1@@