राहुल गांधी आणि कमलनाथ एका माळेचे मणी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2020   
Total Views |
vv2_1  H x W: 0





राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याचा नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतलाच. असभ्य भाषेमध्ये पंतप्रधानपदावर टीका करणार्‍या राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या संयमित भाषेत उत्तर दिले, त्याबद्दल काही माध्यमांनीही त्यांचे कौतुक केले.


ष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात केलेल्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन करणार्‍या प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचे जे आरोप होते, त्यांना सडतोड उत्तरे तर दिलीच पण त्याचबरोबर आपल्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करीत आहेत, त्याचा अत्यंत कडक शब्दांमध्ये समाचार घेतला. काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविलेली व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊन भाष्य करते, त्याचा अत्यंत संयमित भाषेत त्यांनी धिक्कार केला.


अलीकडील एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी हे सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडून बोलले. खरे म्हणजे देशाच्या पंतप्रधानांबद्दल प्रत्येकाने आदरपूर्वक बोलायलाच हवे. कितीही राजकीय मतभेद असले तरी पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा पंतप्रधान असतो, याचे भान ठेवणे अत्यावश्यक असते. राजकारणी नेत्यांनी तर ते भान ठेवायलाच हवे, पण योग्य संस्कारांचा अभाव आणि राजकीय परिपक्वता नसली की अशी खालच्या पातळीवरील वक्तव्ये केली जातात. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यातून तेच दाखवून दिले. एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी देशातील बेकारीच्या प्रश्नावर विद्यमान सरकार काहीच करीत नसल्याचा आरोप केला. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्याही पुढे जाऊन अत्यंत असभ्य भाषेत राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी यांचा त्यांनी एकेरी उल्लेख तर केलाच पण सहा महिन्यांनंतर मोदी यांना लाठ्याकाठ्यांनी युवक मारतील, असे वक्तव्य केले. हे सर्व अगदी एकेरी भाषेत! घटनेने भाषणस्वातंत्र्याचा अधिकार दिला, याचा अर्थ कोणीही ताळतंत्र सोडून बोलावे, असा मुळीच होत नाही. राजकीय नेत्यांनी तर हे पथ्य आवर्जून पाळायला हवे, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असते. लोकशाहीमध्ये विरोधकांवर टीका करण्यामध्ये चुकीचे काहीच नाही. पण आपली पातळी सोडून पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीवर टीका करायची? हे म्हणजे अतीच झाले!


राहुल गांधी हे त्यांच्या बालिश वक्तव्याबद्दल तसे प्रसिद्ध आहेतच. पण पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल त्यांनी ज्या भाषेत टीका केली, त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याचा नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतलाच. असल्या राजकीय टीकेची आपणास सवय झाली असल्याचे स्पष्ट करतानाच, अधिक सूर्यनमस्कार घालून हे काठ्यांचे प्रहार झेलण्यासाठी मी माझी पाठ आणखी मजबूत करीन, असे सांगून राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याची रेवडी उडवली. असभ्य भाषेमध्ये पंतप्रधानपदावर टीका करणार्‍या राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या संयमित भाषेत उत्तर दिले, त्याबद्दल काही माध्यमांनीही त्यांचे कौतुक केले. काहींनी राहुल गांधी यांच्या भाषणाचा ‘सडकछाप’ असा उल्लेख केला!


राहुल गांधी यांचा दरवेळी असा तोल सुटतोच कसा? त्यांनी आपल्या जिभेला लगाम घालायला हवा, असे कोणी त्यांना सांगत नाही का? काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी, राहुल गांधी यांना ‘पोलिटिकल प्ले स्कूल’ मध्ये पाठवावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि भाजपनेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिला आहे. तसे केल्याने सभ्य आणि शिष्टाचारयुक्त भाषा वापरण्याचे धडे त्यांना मिळतील, असे त्यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी, आपल्या लेकास काही चांगले धडे द्या!


काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वाभाडे काढतानाच, पंतप्रधान मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून विरोधक देशामध्ये जे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यावर सडकून टीका केली. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, राम मनोहर लोहिया यांची वक्तव्ये सादर करून, या कायद्यास जो विरोध होत आहे, तो किती बिनबुडाचा आहे आणि राजकीय हेतूने भरलेला आहे, हे त्यांनी दाखवून दिले. त्याचप्रमाणे राज्यसभेमध्ये, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीस जो विरोध होत आहे, त्याचाही पर्दाफाश केला. राष्ट्रीय लोकसंख्या सूची काँग्रेस राजवटीत अस्तित्वात आल्याचे त्यांनी दाखवून दिले. विरोधक जे आकांडतांडव करीत आहेत, त्यावरून त्यांचेच दात त्यांनी त्यांच्या घशात घातले!


अल्पसंख्याक समाजाबद्दल काँग्रेस नेते कसे वागले, हे १९८४ साली शीख समाजाविरुद्ध ज्या दंगली झाल्या, त्याचा दाखला पंतप्रधान मोदी दाखवून दिले. शीख दंगलीला जबाबदार असलेले राजकारणी अजून कसे मोकाट आहेत हे सांगताना, एका नेत्यास काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावर बसविले असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे पंतप्रधान मोदी यांच्या बोलण्याचा रोख होता, हे स्पष्टच होते. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या खणखणीत भाषणात विरोधकांचे आरोप कसे राजकीय स्वार्थाने प्रेरित आहेत, हे देशाला दाखवून दिले.



कमलनाथ यांची दमबाजी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा उल्लेख वर आला आहे, तर त्या कमलनाथ यांनी नुकतेच एक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. २०२१ च्या जनगणनेची तयारी सुरू आहे. मध्य प्रदेशमध्ये वनवासी समाज मोठ्या संख्येने आहे. या वनवासी समाजाने जनगणनेमध्ये आपली स्वत:ची हिंदू म्हणून नोंद करण्यास कमलनाथ यांनी विरोध दर्शविला आहे. वनवासी समाजास त्यासाठी प्रवृत्त केल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. खरे म्हणजे, वनवासी बांधवांना प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे, त्यांच्यात फुटीरतेची बिजे रोवण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत, पण त्याकडे कमलनाथ यांचे लक्ष नाही. वनवासी बांधवांमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यास मात्र कमलनाथ यांचा आक्षेप आहे. जनगणनेमध्ये जी नोंद होते, ती अत्यंत महत्त्वाची असते. ते लक्षात घेऊन वनवासी बांधवांनी आपली ‘हिंदू’ म्हणून नोंद करावी, असा आग्रह धरला तर त्यात गैर वाटण्याचे काहीच कारण नाही. त्यासाठी जे प्रयत्न करीत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची भाषा करायची म्हणजे अतिच झाले! मध्य प्रदेश सरकारने एका अधिकृत पत्रकाद्वारे असा इशारा दिला आहे. पापभिरू आदिवासी समाजामध्ये विष कालविण्याचे प्रयत्न आम्ही सफल होऊ देणार नाही, असा इशारा कमलनाथ सरकारने दिला आहे.


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांची ही दमदाटीची भाषा लोकशाहीस न शोभणारी आहे. वनवासी समाजास, तुम्ही हिंदू म्हणून तुमची जणगणनेत नोंद करा, असे सांगितले म्हणून बिघडले कोठे? वनवासी बांधवांना आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न होत आहेत. ते रोखण्यासाठी कमलनाथ यांनी काही घोषणा केल्याचे ऐकिवात नाही. मात्र, वनवासी समाजास तुमची हिंदू म्हणून नोंद करा, असे सांगणे कमलनाथ यांना आक्षेपार्ह वाटत आहे. कमलनाथ, कशाला संघ स्वयंसेवकावर कायदेशीर कारवाई करण्याची भाषा करताय? अशी भाषा केल्याबद्दल वनवासी बांधवांसह हिंदू समाज आज ना उद्या, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही!

@@AUTHORINFO_V1@@