कोविड काळात आशेचा ‘किरण’

    09-Dec-2020
Total Views |

Archana Maner _2 &nb
 
 

राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना केवळ समाजसेवेची आवड असल्याने लोकप्रतिनिधी बनलेल्या ठाण्यातील भाजप नगरसेविका अर्चना किरण मणेरा यांनी ‘कोविड’ काळात गोरगरिबांसह उच्चभ्रू नागरिकांसाठी फार मोठे कार्य केले. त्यांच्या या मदतीचा अनेक गरजूंना लाभ झाला. त्यामुळे सर्वांसाठीच त्या आशेचा ‘किरण’ ठरल्या. पती डॉ. किरण मणेरा यांच्या साथीने अर्चना यांनी कोरोना कालावधीत केलेल्या कार्याची घेतलेली ही दखल...
 
 

नाव : अर्चना किरण मणेरा
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेविका, ठाणे मनपा
प्रभाग क्रमांक : २, घोडबंदर रोड, ठाणे (प)
संपर्क क्र. : ९
८९२७७१३४५
कोरोनाचा ठाण्यातील पहिला रुग्ण घोडबंदर रोड येथे सापडला. इतकेच नव्हे, तर ‘क्वारंटाईन सेंटर’ व कोविड हॉस्पिटलही घोडबंदर, पातलीपाडा येथे सुरू झाल्यामुळे अगदी प्रारंभीपासूनच कोरोनाच्या सावटाखाली नगरसेविका अर्चना मणेरा यांची पती डॉ. किरण यांच्यासमवेत समाजसेवा सुरू झाली. लोकांना घरात थांबण्यास सांगितले असताना ‘आपला प्रभाग हेच आपले कुटुंब’ मानणार्‍या अर्चना मणेरा पदर खोचून उभ्या ठाकल्या. घरात वयस्कर सासू-सासरे, दोन लहानगी मुले असतानाही स्वतःचा कुटुंबाचा विचार न करता, प्रभाग आणि नागरिकांची जबाबदारी ओळखून त्यांनी स्वतःला मदतकार्यात झोकून दिले. भीती वाटायची तरीही सुरुवातीचे तब्बल दोन महिने त्या व पती कुटुंबापासून विभक्त राहिल्या. एखादी अडचण किंवा मदतीसाठी फोन आला की, क्षणाचाही विलंब न लावता, कोणी सोबत येण्याची वाट न पाहता, काळ-वेळ ओळखून प्रसंगी स्वत:चे वाहन घेऊन आस्थेने त्या मदतीसाठी धाव घेतात.
 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीला सामोरे जाताना किंबहुना, कोविड काळात केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे गोरगरीब त्याचबरोबर गरजू नागरिकांच्या मदतीसाठी प्रभाग क्र.२च्या नगरसेविका अर्चना आणि त्यांचे पती भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते डॉ. किरण मणेरा या दाम्पत्याचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. आजवर नगरसेविका म्हणून त्यांनी विविध उपक्रम केले, याचेच संचित म्हणून, त्यांचा लोकसंपर्क आता बळकट बनला आहे. उपजत विद्वत्ता आणि वैद्यकीय क्षेत्रातीत पतीची पदोपदी साथ यामुळे अर्चना मणेरा यांचा लौकिक दिवसेंदिवस वाढतच आहे. ठाणे महापालिकेचे अधिकारी असो वा सामान्य नागरिक, सर्व आबालवृद्धांसह तरुण वर्ग, महिला वर्ग, सफाई कामगार, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, भाजीविक्रेते असो की व्यापारी वर्ग... आपल्या उत्साही स्वभावामुळे आणि लोकांना जोडण्याच्या कौशल्यामुळे ‘लॉकडाऊन’ काळातदेखील अर्चना यांनी अत्यंत प्रभावीपणे सेवाकार्य बजावले.
 
 
‘लॉकडाऊन’च्या सुरुवातीला दुकाने-मंडई सर्व काही बंद होते आणि जे उघडत होते, तेथे दुप्पट-तिप्पट दराने विक्री होत होती. अशा परिस्थितीत अर्चना मणेरा यांनी प्रभागातील अनेक इमारती व सोसायट्यांमध्ये वाजवी दरात जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला आणि फळे विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून दिली. शिवाय, हलाखीच्या परिस्थितीतील झोपडपट्टी, वस्त्यांमध्ये डाळ, तांदळासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या हजारो किट्सचे मोफत वाटपही त्यांनी केले. मदतीच्याही एक पाऊल पुढे जाऊन ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आधार देत, वेळप्रसंगी त्यांच्या घरी जाऊन संवाद साधण्यासह ज्येष्ठांना एकटेपणाची जाणीव होऊ दिली नाही, हेच अर्चना व डॉ. किरण यांच्या संवेदनशील नेतृत्वाचे कर्तृत्व असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
 
 
‘लॉकडाऊन’ काळात सर्वसामान्य जनता हतबल झाली होती. या नागरिकांना मदतीचा हात म्हणून कार्डधारकांसह ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशांनाही महिनाभर पुरेल इतक्या धान्याचे मोफत वाटप करण्यात आले. इतकेच नव्हे, तर मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी लागणारा ई-पास व मेडिकल सर्टिफिकेट डॉ. आलोक मोदी व स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने राज्य शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करुन हजारो मजुरांना पास मोफत मिळवून देण्यात मदत केली.
 
आयुष मंत्रालयाने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी किंबहुना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रतिबंधात्मक औषध ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक औषधी गोळ्यांचे वाटप करण्याचे सुचवले होते. त्यानुसार, मणेरा दाम्पत्याने आपल्या संपूर्ण प्रभागातील ब्रह्मांड, विजयनगरी, विजय अनेक्स, वसंतलीला, वाघबीळ, डोंगरीपाडा, पातलीपाडा येथील झोपडपट्टी परिसर तसेच सोसायट्यांमधील घराघरात डॉ. अंजली चंदनानी व डॉ. हेमंत वानखेडे आदींना सोबत घेत स्वखर्चाने तब्बल ७५ हजार ‘आर्सेनिक अल्बम’च्या बाटल्या मोफत वाटल्या.

Archana Maner _1 &nb 
 
 
”माझ्या मोठ्या नणंद नगरसेविका होत्या. त्यामुळे लग्नानंतर सासरी आपसुकच राजकारणाचे बाळकडू मिळाले. तसेच, आगरी विकास सामाजिक संस्थेमध्ये दहा वर्षे कार्यरत असल्याने सामाजिक कार्याची आवड होतीच. त्यानंतर मी व पती डॉ. किरण आम्ही भाजपमध्ये सामील झालो. मतदारांनी विश्वास दाखवल्याने २०१७च्या ठाणे पालिकेच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधी पदाची जबाबदारी मिळाली.“
 
कोरोनाच्या संसर्गाचा धोका असल्यामुळे दवाखाने बंद होते. त्यामुळे प्रभागातील रुग्णांची हेळसांड होऊन त्रास सहन करावा लागत होता. याची जाणीव होताच अर्चना तसेच डॉ. किरण मणेरा यांनी आपल्या परिसरातील दवाखान्यातील डॉक्टरना पीपीई किट पुरवून सुरक्षेची काळजी घेत रुग्णांना अविरत सेवा देण्यास मदत केली. ऐन पावसाळ्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रभागात घरोघरी जाऊन प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली. कोरोना कालावधीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून प्रभागातील नालेसफाईची, गटारांची आणि सार्वजनिक शौचालये व मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई मोहीम राविवली. आजतागायत हा शिरस्ता सुरूच आहे.
 
राजकीय जबाबदारीतून सामाजिक कार्य करत असताना, पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचे सहकार्यही तितकेच मोलाचे असते. भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य अर्चना मणेरा यांना लाभलेच. किंबहुना, भाजपच्या इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नेहमीच सहकार्य होत असल्याचे त्या सांगतात. विशेष म्हणजे, प्रकाश पाटील, वसंत खटनार, प्रदीप सिंग, प्रदीप आहुजा, वंदना नरे, दामिनी पाटील, जागृती तरे, गणपती हणगार्गे, सुनील नरे आणि संतोष भोईर आदी कार्यकर्त्यांनीही या कोविड काळात मोलाचे सहकार्य केल्याचे अर्चना यांनी सांगितले. याच माध्यमातून पंतप्रधान आत्मसन्मान योजनेच्या अंमलबजावणीत तसेच, ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजने’च्या नोंदणी अभियानात प्रभागातील गरजूंना आर्थिक साहाय्ययोजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीही त्यांची महत्त्वपूर्ण मदत झाली.
 
पावसाळी परिस्थितीत कोरोनासह साथीच्या आजारांची भीती होती. या पार्श्वभूमीवर प्रभागामध्ये स्वच्छतेसह प्रभागातील झोपडपट्टी व सोसायटीतील प्रत्येक भागात अत्याधुनिक निर्जंतुकीकरण मशीनने औषध फवारणी आणि धूर फवारणी केली. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी प्रभागातील प्रत्येक कानाकोपर्‍यात सातत्याने औषध फवारणी, निर्जंतुकीकरण करण्याचा अर्चना मणेरा यांचा आग्रह राहिला आहे. त्यामुळे नागरिकांकडूनदेखील याबाबत नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्या सांगतात.




गणेशोत्सव काळात प्रभागतील अनेक मंडळांचे सेवेकरी, गणेशभक्त तसेच कार्यकर्त्यांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी मास्क, ऑक्सिमीटर आणि टेंपरेचर स्कॅनिंग गन (थर्मल गन) वाटप केले. तसेच, वारंवार प्रत्यक्ष भेटीतून अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छता, मास्क तसेच सॅनिटायझरचा योग्य वापर, सामाजिक अंतर, ‘आरोग्यसेतू’ अ‍ॅपचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगून आगळीवेगळी आरोग्यविषयक जनजागृती केली. कोविड काळातील त्यांच्या या समाजकार्यामुळेच नगरसेविका अर्चना मणेरा समाजासाठी आशेचा ’किरण’ ठरल्या आहेत.
 
- दीपक शेलार
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.