छाया-प्रकाशाचा उत्तम मेळ साधणारा कॅमेरापटू...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2020
Total Views |

mehata _1  H x
 
 

फोटो काढताना काय टिपावे यापेक्षा काय टाळावे, याचे महत्त्व अचूक हेरलेले डोंबिवलीचे ज्येष्ठ छायाचित्रकार मनोज मेहता आज वयाच्या ६०व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांच्याविषयी...
 
मनोज हे मूळचे डोंबिवलीकर. त्यांचे बंधू क्रांती मेहता यांच्यामुळे त्यांनाही फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना एक कॅमेरा दिला होता. त्यांच्या साहाय्याने ते अनेक गोष्टी आपल्या कॅमेर्‍यात बंदिस्त करीत होते. मनोज यांनी पुढे आपण याच क्षेत्रात करिअर करायचे, हे मनाशी पक्के ठरविले. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी म्हणजेच १५ मे १९७२ साली त्यांनी या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले.
 
मनोज यांनी फोटोग्राफिशी संबंधित अनेक पुस्तके वाचून, त्याचा अवलंब करुन आपल्या करिअरला एका शिखरावर नेवून ठेवले. केवळ पुस्तकेच नव्हे, तर त्यांनी आयुष्यात माणसेदेखील वाचली. एखाद्या सामाजिक संस्थेचा कार्यक्रम असेल, तर त्याठिकाणी अमुक मानधन द्या, असा आग्रहदेखील त्यांनी कधीच धरला नाही. मनोज हे तसे आधीपासूनच एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. पण, त्यांना ‘कलावंत’ म्हणून ओळख मिळवून दिली ती दै. ‘मुंबई तरूण भारत’ने. दै. ‘मुंबई तरूण भारत’मध्येही त्यांनी तब्ब्ल दहा ते बारा वर्षे छायाचित्रणाचे काम केले. सुधीर जोगळेकर संपादक असताना त्यांनी मनोज यांना छायाचित्रणाची संधी दिली. त्यानंतर मनोज यांनी आयुष्यात कधीही मागे वळून पाहिले नाही.
 
मनोज यांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्याकडे काव्यात्मकता आहे. त्या काव्यात्मकतेला न्याय देण्याचे काम मनोज नेहमी करतात. स्वत:ची नाममुद्रा उमटविण्याची ताकद मनोज यांच्यामध्ये आहे. कलावंताला दिव्यदृष्टी असावी लागते. व्यक्तीचित्रणात्मक फोटो काढण्यात तर त्यांचा हातखंडा आहेच. मनोज यांचा फोटो काढताना, कधी उभे राहून, तर प्रसंगी झोपून, तर कधी चक्क उंचावर चढून तो क्षण टिपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि हीच त्यांची खासियत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष वामनराव देशपांडे यांच्या ७५व्या वाढदिवसाला त्यांच्या अनेक भावमुद्रा टिपण्याचे काम मनोज यांनी केले आहे. असे हे मनोज ‘बेस्ट शॉट’ मिळेपर्यंत आजही थकत नाहीत. अशा या आपल्या व्यवसायाशी एकरुप झालेल्या मनोज यांनी पैशांकडे न पाहता, केवळ फोटोग्राफी व्यवसायाशी इमान ठेवला आहे.
 
मनोज एक व्यक्ती म्हणून विन्रम, सज्जन, विवेकी आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत लोभसवाणे असेच. प्रेम हा त्यांच्या जगण्याचा गाभा आहे. पत्नी मधुरा हीच आपली खरी ताकद असल्याचेही ते प्रांजळपणे सांगतात. प्रत्येकाला ज्याचा-त्याचा मान ते देत असतात. मनोज यांच्या वागण्या-बोलण्यातही कुठलाही ‘मीपणा’ नसल्याने ही वृत्ती अध्यात्माकडे जाणारी आहे. प्रज्ञा आणि प्रतिभा यांच्या संगमावर त्यांची फोटोग्राफी उभी आहे. लेखन कौशल्यही त्यांच्याकडे असल्याने, शब्दांशीही ते खेळ करीत असतात.
 
मनोज यांच्या फोटोग्राफी व्यवसायाला २५ वर्षे पूर्ण झाली, त्यावेळी त्यांनी आपले वडील कैलासभाई मेहता आणि आई पुष्पलता मेहता यांच्या नावे पुरस्कार सुरू केले. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात आजतागायत खंड पडला नाही. तसेच मित्रपरिवार हेच आपले धन आहे, असे ते मानतात. मनोज यांचा फोटोग्राफी व्यवसायातील संपूर्ण सहभाग हेच त्यांच्या यशाचे गमक असल्याचे त्यांचे मित्र वामनराव देशपांडे आणि महेश देशपांडे आवर्जून सांगतात. असाच एक प्रसंग. मनोज यांना दत्तात्रय म्हैसकर यांनी पेण रोडवरील खारपारा येथील एका विहिरीचा फोटो काढायला सांगितला होता. त्या विहिरीभोवतीच नदी होती. पण, मनोज यांनी चक्क क्रेनचा वापर करून ते छायाचित्र टिपले.
 
त्यानंतर म्हैसकर यांनी त्यांच्या या कामाचे कौतुक केले. डोंबिवलीत झालेल्या नाट्यसंमेलनाच्या छायाचित्रणाची सर्व जबाबदारी मधुकर चक्रदेव, नकुल पाटील आणि सुरेंद्र वाजपेयी यांनी मनोज यांच्यावर विश्वासाने सोपविली होती. मुकेश अंबानी यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे फोटो काढण्याची संधीही मनोज मेहता यांना मिळाली. जामनगर येथे मनोज यांनी तीन दिवस फोटो काढण्याचे काम केले. तिसर्‍या दिवशी मुकेश अंबानी मनोज यांच्याकडे आले. त्यांनी “तुम्ही तीन दिवस उत्तम फोटो काढत आहात, हे मी पाहत आहे, असे सांगितले. माझी एक इच्छा आहे की, तुम्ही माझ्यासोबत जेवण करा.” त्यांच्या या बोलण्यातूनच मनोज यांना त्यांच्या कामाची खूप मोठी पोचपावती मिळाली होती.
 
 
मुकेश अंबानी यांनी दिलेली ही कौतुकाची थाप त्यांच्या आयुष्याला एक वेगळेच वळण देऊन गेली. मनोज यांच्यासाठी अनुभव हाच मोठा गुरू आहे. दि. ३१ डिसेंबर, १९८३ मध्ये अटल बिहारी वाजपेयी हे विवेकानंद पुतळ्याचे अनावरण करायला डोंबिवलीत आले होते. त्यावेळी त्यांचे भाषण संपल्या संपल्या रंगीत फोटो मनोज यांनी त्यांच्या हातात दिले. त्याकाळात लगेच रंगीत फोटो देणे कठीण होते. त्यामुळे वाजपेयी यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. अशाप्रकारे अनुभवाच्या जोरावर मनोज यांनी यशाची अनेक शिखरे पादांक्रात केली आहेत. आज मेहता यांनी आपल्या छायाचित्रण व्यवसायाची ४८ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’ कडून हार्दिक शुभेच्छा!



- जान्हवी मोर्ये 
@@AUTHORINFO_V1@@