विविधतेत एकतेची भावना भारताला मजबूत बनवते : बौद्ध भिक्षु जाम्यांग

    20-Jun-2025   
Total Views | 15

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : "भारत हा सर्वांचा आदर करणारा देश आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन किंवा बौद्ध - सर्वांना स्वीकारले असून आपापल्या धर्माचे पालन करण्यास स्वातंत्र्य आहेत. विविधतेत एकतेची भावना भारताला मजबूत आणि विशेष बनवते. म्हणूनच तिबेटी लोक या भूमीवर त्यांचा धर्म आणि संस्कृती जपू शकले आहेत", असे प्रतिपादन बौद्ध भिक्षु व टॉन्गलेन चैरिटेबल ट्रस्ट धर्मशाळेचे संचालक भिक्षु जाम्यांग यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उत्तर क्षेत्रचा 'कार्यकर्ता विकास वर्ग - प्रथम'चा समारोप गुरुवार, दि. १९ जून रोजी झाला. त्यावेळी ते बोलत होते.

उपस्थित स्वयंसेवकांना संबोधत पुढे ते म्हणाले, आज जेव्हा मी तुमच्यासारख्या बलवान आणि शिस्तबद्ध तरुणांसमोर उभा आहे, तेव्हा मला एक वेगळाच अभिमान वाटतो. मला विश्वास आहे की भारताचे भविष्य तुमच्या हातात सुरक्षित आहे. तुमचे समर्पण, शिस्त आणि देशावरील प्रेम भारताला अधिक उंचीवर घेऊन जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या १०० वर्षांत लोकांना अनेक प्रकारे मदत केली आहे. संघाने आरोग्य सुधारण्यासाठी, शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि भारताची समृद्ध संस्कृती जपण्यासाठी काम केले आहे. संघ तरुणांना शिस्त, दयाळूपणा आणि आपल्या देशावर प्रेम करायला शिकवतो. संघाचे कार्य दाखवते की, चांगले संस्कार असलेले साधे लोक समाजात किती मोठे बदल घडवून आणू शकतात.

प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-प्रचार प्रमुख प्रदीप जोशी यावेळी म्हणाले की, भारत आता जागा झाला आहे आणि त्याच्याकडे आता आपल्या शत्रूंवर निर्णायक हल्ला करून त्यांना कमकुवत करण्याचे प्रचंड धैर्य आणि अधिकार आहे. ऑपरेशन सिंदूर हे याचे जिवंत उदाहरण होते आणि जगाला प्रभावी संदेश देण्यासाठी ते एक पाऊल होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, याने व्यापक, आशादायक आणि दूरगामी परिणाम आणले आहेत. यामुळे आज देशाला अभिमान वाटतोय.

पुढे ते म्हणाले की समाजात अशी शक्ती आणि श्रद्धा जागृत होण्याचे कारण संघ साधना प्रवासाची शंभर वर्षे आहे. आज अशी वेळ आली आहे की सामाजिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला, अगदी समाजातील शेवटच्या व्यक्तीलाही, देशाच्या हितासाठी सक्रिय व्हावे लागेल. हा संघाचा संकल्प आहे. संघाच्या शताब्दी वर्षात, संघ प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि पंच परिवर्तनाच्या माध्यमातून समाजात व्यापक बदलाचे संकेत देणारा ठरेल.

सुमारे २० दिवस चाललेल्या या वर्गात उत्तर क्षेत्रातील पाच प्रांत हरियाणा, दिल्ली, पंजाब, जम्मू, काश्मीर आणि हिमाचल प्रदेश यांसह तेलंगणा, सौराष्ट्र आणि कोकण प्रांतातील एकूण २१२ शिक्षार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षणासाठी संपूर्ण वेळ ३० शिक्षक आणि ४० प्रबंधक वर्गात उपस्थित राहिले.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121