संघ गीतांना होणार शंकर महादेवन यांचा परिसस्पर्श

    11-Jun-2025   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Shankar Mahadevan RSS Geet)
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गाणी नवीन सुर आणि लयीत सादर करणार आहेत. संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त स्वयंसेवकांना त्यांच्याकडून ही एक अनोखी भेट असेल; अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या 'तानसेन का ताना बाणा' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान दिली.

ते म्हणाले की, संघ स्वयंसेवकांसाठी देशभक्तीपर गीते कोणी लिहिली, हा एक इतिहास आहे ज्याचा शोध घेतला पाहिजे. पद्मश्री शंकर महादेवन यांना जेव्हा अशी अनेक गाणी नवीन पिढीसमोर नवीन सूर आणि लयीत सादर करण्याची विनंती करण्यात आली, तेव्हा त्यांनी आनंदाने त्याचा स्वीकार केला. शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त संघ स्वयंसेवकांना नवीन संगीतासह तीच प्रेरणादायी गाणी ऐकायला मिळणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत आणि इतर कार्यक्रमांमध्ये वैयक्तिक गीतापासून ते सांघिक गीतापर्यंत खूप महत्त्व आहे. संघातील गीतरचना आणि गीतकारांबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही अनेक संघ गीते रचली होती, ज्यात ‘कदम मिलाकर चलना होगा’ आणि ‘हिंदू तन मन हिंदू जीवन, राग राग हिंदू मेरा परिचय’ ही गाणी जनमानसाच्या ओठांपर्यंत पोहोचली होती. प्रसिद्ध मराठी गायक सुधीर फडके यांनीही संघासाठी अनेक गाणी लिहिली आणि गायली. संघाच्या गीतांची पुस्तके पाहिली तर तुम्हाला अशी शेकडो गीते सापडतील जी लोकांना जगण्याची आणि देश आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतात

अखंड भारताच्या विचारामागे संघाचे मोठे योगदान
नागपूर येथे दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या विजयादशमी उत्सवात पद्मश्री शंकर महादेवन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा ते म्हणाले होते की, अखंड भारताचा विचार, संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्यात संघाशिवाय कोणाचेच योगदान नाही. ज्याप्रमाणे एखाद्या डिजिटल संगणकामागे बायनरी कोड असतात, त्याप्रमाणे प्रत्येक संगीतामागे काही सरगम असतात. आणि म्हणून देशाला जर एक संगीत म्हणून संबोधले तर रा.स्व.संघाचे स्वयंसेवक हे त्या संगीतामागील सरगम आहेत. कारण देशावर येणाऱ्या कुठल्याही आपत्तीवेळी हेच स्वयंसेवक सायलेंटली उभे राहतात. असे स्वयंसेवक भारताला लाभले आहेत, त्यामुळे जगात कुठेही गेलात तरी आपण भारतीय आहोत याचा अभिमान बाळगा.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121